युपीसारख्या मागास राज्यातसुद्धा आता ब्राम्होस मिसाईल बनणार आहे
ब्राम्होस मिसाईल हे जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाईल आहे. सुपरसोनिक म्हणजे ज्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. भारताची डिफेन्स संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची ‘एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया’ संस्था यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.
या दोन्ही संस्थांच्या उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. ज्याची रेंज ३०० किलोमीटरपर्यंत आहे.
आता या मिसाईलला ब्राम्होस हे नाव भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या नद्यांच्या नावावरून देण्यात आलेय.
मूळची रशियन टेक्नॉलॉजी आधारित असलेलं हे मिसाईल गेल्या केल्येत वर्षांपासून भारताच्या ताफ्यात आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशात त्याच्या मोठ्या प्रमाणत निर्मितीवरही भर दिला जाणारे.
ब्राम्होस एरोस्पेसचे प्रमुख सुधीर मिश्रा यांनी यूपी एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (UPEIDA) आणि यूपी सरकारला ब्राम्होस निर्मितीच्या सुविधेसाठी २०० एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विनंती पत्र लिहिले. यासंदर्भात ब्राम्होस एरोस्पेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
ब्राम्होस क्रूझ मिसाईलचे सध्याचे व्हर्जन हैदराबादमधील तयार केले जातेय. परंतु UPEIDA ने नवीन, सुधारित ब्राम्होस क्रूझ मिसाईल तयार करण्याचं लक्ष्य ठेवलंय. यासाठी युपी सरकारची मदत घेतली जाणारे.
उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी जाहीर केले कि,
‘युपी सरकार लवकरच नेक्स्ट-जनरेशनचं अत्याधुनिक ब्राम्होस मिसाईलचे उत्पादन सुरू करू शकते. पुढील तीन वर्षांत १०० हून अधिक ब्राम्होस मिसाईल तयार करण्याची योजना आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून लखनऊमध्ये तीन महिन्यात ब्राम्होस उत्पादन केंद्र उभारले जाईल. या सेंटरच्या माध्यमांतून सुमारे ५०० इंजिनियर आणि टेक्निकल लोकांना थेट रोजगार मिळणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे DefExpo २०१८ दरम्यान उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक “संरक्षण उत्पादन कॉरिडॉर” तयार करण्याची घोषणा केली होती. यांनतर गेल्या वर्षी लखनऊ येथे आयोजित DefExpo २०२० दरम्यान या प्रकल्पाला भरघोस चालना मिळाली.
हे पाहता संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) घोषित केले आहे की, असंख्य संरक्षण उत्पादक कॉरिडॉरच्या गुंतवणुकीसाठी ५०,००० कोटी रुपयांचा करार केला. यापैकी बहुतेक संरक्षण कॉरिडॉर अलीगढच्या आसपास बांधण्यात येणार आहेत.
यासंदर्भात युपी सरकारनं म्हंटल कि, ‘लखनऊ नोडमधील ११, झाशी नोडमधील सहा आणि कानपूर नोडमधील आठ कंपन्यांनी कारखाने उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केलीये. विविध कंपन्यांकडून मिळालेल्या प्रस्तावांवर विचार करत, UPEIDA ने आतापर्यंत १९ आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अलीगढ नोडमधील ५५.४ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिलीये.’
कानपूर नोडमधील दोन कंपन्यांना सुमारे चार एकर जमीन आणि झाशीमधील एका कंपनीला १५ एकर जमीन देण्यात आली आहे. तर लखनऊ नोडमध्ये ब्रह्मोस उत्पादन केंद्र बांधण्यासाठी २०० एकर जमीन देण्याचे मान्य केलेय.
यूपी कॉरिडॉरमधील जमीन अशा कंपन्यांना वाटप केलीये, ज्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिलेय.
अलीगढ नोडमध्ये १९ कंपन्यांपैकी दोन कंपन्या ज्यांना जमीन देण्यात आली आ,हे त्यांनी ड्रोन बनवण्यासाठी ५८१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिलेय. यातील एक अँकर रिसर्च लॅब LLP, ज्याने ५५० कोटी रुपये गुंतवण्याचे काम हाती घेतले आहे, त्याला UPEIDA ने १० हेक्टर जमीन दिली आहे. आणखी एक फर्म, अॅलन आणि अल्वन, ज्यांनी ३०.७५ कोटी रुपये गुंतवण्याचे आश्वासन दिले आहे, त्यांना आठ एकर जमीन देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, ब्राम्होस उत्पादन केंद्रामुळे आता यूपी डिफेन्स कॉरिडॉरमध्ये संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या इतर अनेक नामांकित कंपन्या राज्यात येतील. तसेच, ब्राम्होस क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेश संरक्षण उत्पादन निर्मितीचे केंद्र बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार असल्याचे बोलले जातेय.
हे ही वाच भिडू :
- घरच्यांना वाटत होतं मुलीने डॉक्टर इंजिनियर व्हावं, पण ती बनली देशाची पहिली मिसाईल वूमन
- चीन आणि पाकिस्तानचे पुंग्या टाईट करणारे काली मिसाईल खरंच अस्तित्वात आहे कि नाही ?
- राजीव गांधींना मारणारा प्रभाकरन हा एकमेव अतिरेकी होता ज्याच्याकडे स्वतःची लढाऊ विमाने होती