युपी ३७ वर्षांची परंपरा राखणार यंदासुद्धा मुख्यमंत्री मिळणार तो बिना मिशीवालाचं…
आजकाल बिअर्ड आणि मिशी ठेवण्याचा एक वेगळाच ट्रेंड आहे. म्हणजे पोरींना जरी विचारलं कि, तुम्हाला क्लीन शेव्ह वाला आवडतो कि ढाढी – मिशीवाला. तर वोटिंग दाढी मिशीवाल्यानाचं मिळलं एवढं फिक्स. त्यात पिक्चरमधले हिरोसुद्धा आता बिअर्ड आणि मिशीच्या वेगवगेळ्या स्टाईल आणतायेत. पण भिडू यूपीतल्या मुख्यमंत्र्यांमध्ये मात्र क्लीन शेव्हचा ट्रेंड सुरु आहे. तो गेली ३७ वर्षे कोणीच तोडला नाहीये.
आता साहजिकचं विषय निघालाय तो निवडणुकीच्या धामधुमीतचं. पण खरंच जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला सुद्धा पटेल कि युपीचे मुख्यमंत्री मिशीच ठेवत नाहीये. आता तो योगायोग म्हणा कि काही और… पण असं म्हणतात कि, १९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांचा शराबी चित्रपट आलेला, ज्यातला त्यांचा एक डायलॉग लयचं फेमस झालेला,
मूंछें हो तो नत्थूलाल जी जैसी, वरना न हों,
बहुदा त्या चित्रपटनंतरच सगळीकडे मिशीचा ट्रेंड आलेला, पण उत्तर प्रदेशात मात्र त्यानंतर आजपर्यंत मिशी असलेला कोणताही मुख्यमंत्री झाला नाही. आणि आत्ताच्या उमेदवारांवरून असं चित्र दिसतंय कि, यावर्षी सुद्धा हा बिना मिशीवालाच मुख्यमंत्री बघायला मिळेल.
पण आपण काही वर्ष मागे गेलो तर पाहायला मिळेल कि, युपी वालों को भी बहोत शौक था मुछो का… म्हणजे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत यांच्याबद्दल एक किस्सा फेमस आहे. असं म्हणतात कि, नेताजी जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या मिश्या सुद्धा बोलायच्या. त्यांना मोठ्या आणि जाड मिश्या ठेवायचा शौक होता. १९४६ ते १९५४ पर्यंत यूपीचे मुख्यमंत्री होते.
त्यांच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री असलेले संपूर्णानंद यांनी १९५४ ते १९६० पर्यंत उत्तर प्रदेशची सत्ता सांभाळली. पण ते दोन गोष्टींसाठी फेमस होते. पहिली म्हणजे ते शब्दांचे जादूगार होते, तर दुसरी म्हणजे त्यांचा जाड फ्रेमचा चष्मा आणि चेहऱ्यावरची मिशी. तरुणपणापासून वय होईपर्यंत त्यांनी आपल्या मिश्या ठेवल्या.
पुढे १९६७ ते ६८ आणि १९७० पर्यंत चौधरी चरण सिंह यूपीचे मुख्यमंत्री राहिले. आता चौधरी म्हंटल कि आपल्यासमोर जाडजूड खंडणी मिश्या असणारा चेहरा येतो. पण या चौधरींची मिशी हलकी असायची. आजही अनेक राजकीय पंडित मानतात कि, राजकारणात हलक्या मिशा ठेवण्याची फॅशन त्यांनी सुरू केली. नंतर अनेकांनी त्यांची कॉपी केली.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात हेमवती नंदन बहुगुणा यांना खूप लोकप्रियता मिळालेली. ज्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना जिवंत नाहीतर मुडदा पकडण्यासाठी ५ हजारांचा बक्षीस जाहीर केलेलं. तेव्हा इंग्रज त्यांना गांधी टोपी आणि मुच्छड म्हणून ओळखायचे. पुढे ८ नोव्हेंबर १९७३ ते २९ नोव्हेंबर १९७५ पर्यंत ते युपीचे मुख्यमंत्री होते.
१९७० च्या दशकात रामनरेश यादव हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून समोर आले होते. असं म्हणतात कि मुलायम यांच्यापेक्षा ते मोठे नेते मानले जायचे. १९७७ मध्ये सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या मुलायमसिंह यादव यांना डावलून चौधरी चरणसिंग यांनी राम नरेश यांना मुख्यमंत्री केले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मिशी जपली. ते मिशा कापायचे, पण पूर्णपणे कधी हटवायचे नाही.
यूपीच्या सीएम ते पीएम असा प्रवास करणाऱ्या विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या मिश्यांचा एक अनोखा प्रवास आहे. म्हणजे आधी त्यांच्या मिशा फार आलिशान आणि स्टायलिश असायच्या. म्हणतात कि, त्यांनी काही फॉरेनच्या नेत्यांची स्टाईल पाहून तशा मिशा ठेवलेल्या, पण नंतर त्यांनी मिशा काढायला सुरुवात केली. ९ जून १९८० ते १८ जुलै १९८२ पर्यंत यूपीचे मुख्यमंत्री होते.
पुढे १९ जुलै १९८२ ते २ ऑगस्ट १९८४ पर्यंत श्रीपती मिश्रा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मिशीचा वारसा असलेले ते शेवटचे यूपीचे मुख्यमंत्री होते. त्यांची मिशी खालच्या बाजूने झुकलेली आणि पातळ असायची. अंदाजे त्यांची रुंदी १० ते १५ मिमी असायची.
आता या मुख्यमंत्र्यांनंतर ट्रेंड आला तो बिना मिशीवाल्या मुख्यमंत्र्यांचा.
वीर बहादूर सिंग २४ सप्टेंबर १९८५ ते २४ जून १९८८ या काळात यूपीचे मुख्यमंत्री होते. त्यांना मिशी अजिबात नव्हती. त्यांच्या आधीही बनारसी दास, त्रिभुवन नारायण सिंह, चंद्र भानू गुप्ता यांच्यासारखे मिशी नसलेले मुख्यमंत्री होते, पण असा ट्रेंड सुरू झाला नाही की, संपूर्ण ३७ वर्षे कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिशी ठेवली नसावी. या ट्रेंडची सुरुवात वीर बहादूर सिंग यांच्यापासूनच झाली.
एनडी तिवारी हे याआधीही युपीचे मुख्यमंत्री होते, पण २५ जून १९८८ ते ५ डिसेंबर १९८९ दरम्यान त्यांनी मिशी नसलेल्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांची यादी पुढे नेली. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही कि, तिवारींनी अशी काही मिशी साफ केली कि त्यानंतर आजवर एकाही मुख्यमंत्र्यांना मिशी वाढवता आली नाही.
युपीचे लाडके मुख्यमंत्री असलेले मुलायमसिंग यादव यांचा तरुणपणाचा फोटो पाहिला तर लक्षात येईल की त्यांच्या काळ्या मिशा लय अट्रॅक्टीव्ह होत्या, पण वय वाढलं आणि मिशा पांढऱ्या झाल्यामुळ ते मिशा कमी करत राहिले. म्हातारपणापर्यंत त्यांना मिशीची आवड होती हे त्यांचे बरेचसे फोटो पाहून कळते. पण नंतरच्या काळात त्यांना क्लीन शेव्हची आवड लागली. १९८९ ते २००७ दरम्यान त्यांनी तीन वेळा युपीच्या मुख्यमंत्री पदाची गादी सांभाळली.
कल्याण सिंग यांचे फोटो जर आपण पहिले तर दिसेल कि ते कधी कधी खूप बारीक मिशा ठेवायचे. १९९१ ते १९९९ दरम्यान ते दोनदा मुख्यमंत्री होते. पण त्यांचे बहुतेक फोटो हे बिना मिशीचेच आहेत. त्या काळातले ते खूप मोठे ते होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी पंगा घेणारे ते पहिले नेते आहेत. त्यांनी वाजपेयींना असेही सांगितले की, आधी खासदार होऊ, तेव्हा कुठे जाऊन पंतप्रधान होऊ.
राम प्रकाश गुप्ता १२ नोव्हेंबर १९९९ ते २८ ऑक्टोबर २००० दरम्यान म्हणजे एक वर्ष मुख्यमंत्री होते. खरे तर ते बराच काळ उपमुख्यमंत्री होते. असं म्हणतात कि, मुख्यमंत्री झाल्यानंतरही बऱ्याचदा ते स्वतःला डेप्युटी सीएम म्हणून सांगत होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही मिशी ठेवली नाही.
राजनाथ सिंह जेवढा विचार बोलायच्या आधी करतात तेवढा विचार आपल्या लूकबाबतही करतात. ते नेहमीच क्लीन शेव्हमध्ये दिसतात. २८ ऑक्टोबर २००० ते ८ मार्च २००२ पर्यंत ते यूपीचे मुख्यमंत्री होते. एक काळ असा होता की अटल-अडवाणी युग संपुष्टात येत होते आणि केंद्रात भाजपकडे राजनाथ यांच्यापेक्षा मोठा नेता नव्हता, पण नंतर त्यांनी मोदींसोबत काम करण्याचे मान्य केले.
सगळ्यांनाच माहितेय अखिलेश यादव हे परदेशातून शिकलेले आहेत तर आदित्यनाथ योगी आहेत. पण दोघेही मिशा आणि दाढी ठेवत नाहीत. पण त्यामागे दोघांची कारण वेगवगेळी आहेत.
आता आपण या सगळ्या मुख्यमंत्र्यांचा आराखडा पहिला पण यंदाही यूपीवाल्यांना मिशीवाला मुख्यमंत्री मिळण्याचे चान्सेस नाहीयेत. कारण मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये भाजपकडून योगी आदित्यनाथ, सपाकडून अखिलेश यादव, काँग्रेसकडून प्रियंका गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या मायावती आहेत. आणि राहिला प्रश्न जयंत यांचा तर ते कधी बियर्डमध्ये दिसतात तर कधी क्लीन शेव्हनमध्ये, पण वेगळी मिशी ठेवत नाही. त्यामुळे यूपीला मिशीशिवाय पुढचा मुख्यमंत्री मिळणार हे अगदी क्लियरकट आहे.
हे ही वाच भिडू :
- प्रदेशाध्यक्ष रेजिनाल्ड कॅमिलो डिकोस्टा म्हणतायत संभाजी ब्रिगेडही गोव्यात लढणार
- जेंव्हा मुख्यमंत्री कलेक्टरने केलेल्या पाहुणचाराची परतफेड ६ रुपये २५ पैशांचा चेक देऊन करतात
- पाच शहरांमध्ये मेट्रो आणणारा माणूस, आता उत्तर प्रदेशचा मुख्य सचिव झालाय