उपहार थिएटरच्या अग्नीकांडात अनेक जवानांना जीव गमवावा लागला होता

गोष्ट आहे १९९७ सालची. जे पी दत्ता यांनी बनवलेला बॉर्डर सिनेमा देशभरात धुमाकूळ घालत होता. पाकिस्तानी रणगाड्याच्या बटालियनला भारताच्या फक्त 117 शूरवीर जवानांनी दिलेल्या लढाईच्या सत्य घटनेवर आधारित ही कथा होती.

सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ,अक्षय खन्ना यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रत्यक्ष युद्धभूमीवरील प्रसंग जिवंत केले होते.

संदेसे आते है च्या आर्ततेने थिएटरमध्ये येणारा प्रत्येक प्रेक्षक रडत होता. सनी देओलच्या जो बोले सौ निहाल सत श्री अखाल आणि भारत माता की जयच्या घोषणांनी थिएटर दुमदुमत होतं.

सिनेमाच्या एकूणएक सीनशी बघणारा प्रत्येकजण राष्ट्रभक्तीने भावनिक होऊन जोडला जात होता.

१३ जून १९९७, दक्षिण दिल्लीच्या उपहार सिनेमागृहात दुपारी ३ चा शो सुद्धा हाऊसफुल झाला होता. अनेक आर्मीचे जवान आपल्या कुटुंबाला घेऊन सिनेमा पाहण्यासाठी आले होते.

पिक्चर नेहमी प्रमाणे रंगला होता. इंटर्व्हलनंतर युद्धाची तयारी सुरू झाली होती.

सनीपाजीच्या डायलॉगला लोक जोरजोरात दाद देत होते.

अचानक काही तरी जळत असल्याचा वास सगळ्या थिएटरमध्ये पसरला. कोणालाच काही कळेना काय झालंय. सुरवातीला दुर्लक्ष केलं पण काही वेळातच जोरात स्फोट झाल्यासारखे आवाज आले.

आख्या थिएटरला आगीने वेढलेलं होतं.

पण आत बसलेल्या प्रेक्षकांना हे कळेपर्यंत उशीर झाला होता. प्रचंड धावपळ सुरू झाली. बाल्कनीच्या एक्झिटचे दरवाजे जाम झाले होते. तिथल्या डोअरकिपरने बाहेरून कडी लावली होती. लोकांनी तो दार मोडून काढला.

याच गर्दीत होते कॅप्टन मनजीत सिंग भिंदर.

ते भारतीय लष्कराच्या 61 व्या घोडदलाचे कॅप्टन होते. नुकताच झालेल्या नॅशनल गेममध्ये मिळालेलं यश साजरे करण्यासाठी त्यांनी आपली फॅमिली, काही ज्युनियर ऑफिसर त्यांचे कुटुंब या सगळ्यांना बॉर्डर दाखवायला आणलं होतं.

IMG 20181211 WA0028

सुरवातीला आग लागल्याचा हाकारा सुरू झाला तेव्हा ते आपली बायको आणि मुलांना घेऊन बाहेर आले पण बाहेर आल्यावर त्यांना परिस्थितीच गांभीर्य जाणवलं.

घबराटीचे वातावरण झाल्यामुळे सिनेमाहॉलच्या छोट्या दरवाजातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्यात चेंगराचेंगरी सुरू झाली.

कॅप्टन मनजीत यांनी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी परत आगीत उडी घेतली. या शूर जवानाची पत्नी असणाऱ्या ज्योतरूप कौर या देखील त्यांना मदत करू लागल्या.

जवळपास १५० जणांना या पती पत्नीने इतरांची मदत घेऊन वाचवले.

पण ही आग प्रचंड मोठी होती. वायरिंगमध्ये ठिणगी पडल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळाले होते. यातून सर्वप्रथम तळघरातल्या पार्किंग लॉट मधल्या गाड्या पेटल्या. ही आग वेगात सर्वत्र पसरली.

दिल्ली महानगरपालिकेच्या तब्बल ४८ अग्निशामक गाड्यांनी अनेक तास प्रयत्न करून आग विझवली पण तोपर्यंत प्रचंड नुकसान झालं होतं.

IMG 20200613 120250

आगीत भाजून आणि गर्दीत चेंगरून ५९ जणांचा मृत्यू झाला होता.

शेकडो जण जायबंदी झाले होते. कॅप्टन मनजीत त्यांची पत्नी ज्योतरूप आणि चार वर्षांचा रस्किन यांचा दुर्दैवाने आगीत होरपळून मृत्यू झाला.

राजधानी दिल्लीत घडलेलं हे आतापर्यंतच सगळ्यात भीषण अग्नीकांड होतं.

या थिएटरचे मालक गोपाल अन्सल आणि त्यांचा भाऊ सुशील अन्सल यांना अटक करण्यात आली. या घटनेबद्दल अनेक उलटसुलट चर्चा होत होती. अतिरेकी कारवाई किंवा घातपातीची शक्यता बोलून दाखवली जात होती.

सरकारने संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी सीबीआय चौकशी बसवण्यात आली.

या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. हा अतिरेकी हल्ला नव्हता मात्र सिनेमामालकांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली होती.

खरंतर त्याच दिवशी पहाटे पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती,

पण ती कशीबशी विझवण्यात आली. यात खूप मोठे नुकसान न झाल्यामुळे तात्पुरते उपाय केले गेले.

खरंतर त्या दिवशीचे सगळे शो कॅन्सल करणे अपेक्षित होत मात्र अन्सल बंधूनी तसं केलं नाही. थिएटरमध्ये आग लागली तर खबरदारीच्या उपाययोजनांचा मागमूसही नव्हता. अनेक सरकारी नियमांना कचऱ्याची टोपली दाखवत हे थिएटर उभारले होते.

अन्सल बंधूंविरुद्ध अनेक केसेस दाखल झाल्या.

मृतांच्या नातेवाईकांनी The Association of Victims of Uphaar Fire Tragedy (AVUT) नावाची संघटना स्थापन केली.

खालच्या कोर्टाने अन्सल बंधूंना दोषी पकडले. दिल्ली हायकोर्टाने त्यांना पंचवीस कोटीचे भरपाई देण्याचे आदेश दिले. पण ही केस जवळपास वीस वर्षे चालली. दरम्यान तपासणीमध्ये काही पुराव्यांशी छेडछाड देखील केली गेली.

अखेर 19 ऑगस्ट 2015 रोजी सुप्रीम कोर्टात आलेल्या फायनल निकालात अन्सल बंधूंना 30 कोटींचा दंड सुनावला पण त्यांचा तुरुंगवास कमी केला. या निकालावर अनेकांनी टीका देखील केली होती.

आता यावर वेबसिरीज येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.