इथं कोणी क्लास लावत नाही पण या गावातल्या प्रत्येक घरात IAS, IPS आहे.

प्रत्येक गावाची एक वेगवेगळी ओळख असते. आमच्या गावाबद्दल सांगायच झालं तर आमच्या गावात पोत्यानं वाळूवाले आहेत. घरटी वाळूवाले. कारण गावाच्या शेजारी नदीय. पोरं दूसरं करणार तरी काय? कोल्हापूर जिल्ह्यात सैनिक टाकळी आहे. इथला घरटी माणूस सैन्यात आहे. देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्यांच गाव म्हणून या गावाच गौरवपुर्ण उल्लेख केला जातो. 

तर असच एक गाव आहे जिथला प्रत्येक व्यक्ती भारतीय प्रशासकिय सेवेत तरी आहे नाहीतर भारतीय पोलिस सेवेत तरी. केद्रिंय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षांमधून पास होवून प्रशासकिय सेवेत दाखल होण्याची परंपराच या गावाला लाभली आहे. 

आत्ता हि झाली महाराष्ट्रातल्या गावांची परंपरा. अशीच परंपरा उत्तरप्रदेशातील एका गावाने देखील जपली आहे. आत्ता युपी म्हणल्यानंतर भैय्या आणि राजकारण. जास्तीत जास्त रिक्षावाले, पाणीपुरीवाले अस चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहू शकतं पण या गावाची ओळख उत्तरप्रदेशबद्दल असणाऱ्या आपल्या समजुतीहून वेगळी आहे. 

उत्तरप्रदेशातल्या जौनपूर जिल्हातलं माधौपट्टी नावाच गाव.

UPSC चा निकाल लागला कि कोणत्या घरातून कोणाचा नंबर लागला इतकीच चर्चा या गावात होतं असते. बर या गावात किती घरं आहेत तर 75. फक्त 75. आणि या गावातून IPS असणारे अधिकारी किती आहेत तर 45. आत्ता हिशोब लावून विचारशीला बाकीच्या 30 घऱातल्यांच काय. तर भिडू लोकांनो बाकीच्या घरात पण IAS, IRS, IFS आहेतच. टेन्शन घेवू नका. 

आत्ता महत्वाचा मुद्दा, या गावातल्या लोकांना हा UPSC चा नाद कसा लागला..? 

सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना UPSC चा नाद लागण्यासाठी कोणताहा फाऊंडेशन कोर्स, क्रॅश कोर्स, अनअॅकडमी व्हिडीओ किंवा मी स्टेशनवर राहिलो, वडापाव खाल्ले टाईप भाषण कारणीभूत नाहीत. पण हा गावकऱ्यांना हा नाद लागण्यापाठीमागे एक माणूस मात्र नक्कीच आहे. 

तसा या गावातून पहिला प्रशासकिय सेवेत जाणारा युवक म्हणून मुस्तफा हुसैन यांच नाव घेतलं जातं.

ते 1914 साली प्रशासकिय सेवेत दाखल झाले होते. पण गावकऱ्यांना अशी प्रथा अंमलात आणायला 1952 साल उजडावं लागलं. 1952 साली इंन्दूप्रकाश नावाच्या युवकाने UPSC च्या परिक्षेत 13 वी रॅन्क घेतली. तिथून पुढे मात्र प्रत्येकाला UPSC चा नाद लागला. 

इंदूप्रकाश यांच्यानंतर गावातले चार सख्खे भाऊ. होय होय सख्खे म्हणजे एकदम सख्खे चुलत वगैरे अस नाही. तर या चार सख्या भावांनी एकाच वर्षी पोस्ट काढली. एकाच वर्षी चारही जणं IAS झाले. या घटनेनंतर जोर वाढू लागला. त्यानंतर दोन सख्ये भाऊ IAS झाले. 

पुढे प्रत्येक घरात कोण ना कोण पास होत गेला. आणि UPSC तून पोस्ट काढणं हि गावची परंपरा झाली.

पण इतक्यातवरच हे थांबत नाही. गावातली मुलं UPSC पास झाली पण गावाला विसरली नाहीत. आजही प्रत्येकजण गावात येतो. येतो म्हणजे पाहूण्यासारखं एक दोन दिवस नाही तर सर्वांची घर आजही याच गावात आहेत. 

आत्ता मुलं पोस्ट काढत होते म्हणून मुली मागे राहिल्या वगैरे टाईप गोष्टी देखील इथे नव्हता. या गावातल्या मुली देखील मुलांच्या वरती होत्या. आशा सिंह, उषा सिंह या बहिणी, चंद्रमौली सिंग या आयपीएस अशा कित्येक मुलींनी देखील UPSC तून पास होत या गावची परंपरा पुढे घेवून जाण्यास हातभार लावला आहे. 

आत्ता या गावातील विशेष व्यक्तींची नावे सांगून विषय संपवतो, 

अन्जमेय सिंह आज मनिला येथील जागतिक बॅंकेत आहेत. डॉ. नीरू सिंह आणि लालेंद्र प्रताप भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे उच्चाधिकारी आहेत, ज्ञानू मिश्रा इस्त्रो मध्ये आहेत याशिवाय वेगवेगळ्या राज्यात सचिव, पोलिस महासंचालक यांसारख्या पोस्टवर देखील गावातील व्यक्ती पोहचल्या आहेत. 

असो हे झालं त्यांच्या गावाच आपल्या गावाचा आत्ता मुळशी पॅटर्न करायचा हि अस काही करायचं ते तुमच्या हातात आहे. बघा वेळ झाला असला तरी, गावचा पहिला म्हणून परंपरा सुरू करायला हरकत नाही. 

हे ही वाचा. 

 

2 Comments
  1. Devendra Jain says

    अप्रतीम व डोळ्यात अंजन घालणारी बातमी, मोठ मोठ्या कोचिंग क्लास वर कर्ज काढुन लाखो रुपयांची फी भरण्सा एैवजी या छोट्या गावाचा जर आदर्श समोर ठेवला तर प्रशासकिय सेवेत जाणे अवघड नाही.

  2. Ganesh says

    Ganesh Mohan Hajare

Leave A Reply

Your email address will not be published.