आजही ‘रंजिश ही सही’ ऐकल्याशिवाय टेबलावरची बैठक संपत नाही…

तुम्ही घरातल्या एका निवांत कोपऱ्यात बसला आहात, हातात चहा किंवा कॉफीचा कप आहे. कानात हेडफोन न टाकता, तुम्ही बारक्या स्पीकरवर गाणी लावलीयेत आणि त्या स्पीकरमधून आवाज येतो…

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ…

जिंदगीत आलेल्या, सोडून गेलेल्या सगळ्या पोरींची आठवण एका झटक्यात येण्याची ताकद या दोन ओळींमध्ये आहे. आवाज मेहंदी हसनचा असो, अली सेठीचा असो किंवा पॅपॉनचा.. आपला बाजार उठतोच. कारण लई सोपं आहे, जितका दर्द त्या आवाजांमध्ये आहे, त्याहून जास्त दर्द त्या शब्दांमध्ये आहे. हा दर्द लिहिलाय अहमद फराजनं.

खरंतर फराज आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं आणि अनुभवानं लय मोठा… पण कित्येकवेळा एकटेपणात, टेबलला बसल्यावर आणि रात्रीच्या शांततेत फराजच्या शब्दांनी आपल्याला साथ दिलीये. डोळ्यात अडलेलं पाणी खाली ओघळण्याचं कारणही फराज ठरलाय… म्हणून तो आपला दोस्त आहे.

सईद अहमद शहा नावाचा हा मुलगा जन्मला पाकिस्तानात. त्याचे वडील फारसीमध्ये शायरी लिहायचे. आता डॉक्टरला वाटतं आपलं पोरगं डॉक्टर व्हावं, पण शायर लोकांना तसं वाटत नसावं. अर्थात कारणंही सोपी आहेत. पण लहानग्या सईदच्या रक्तात बंडखोरी होती. त्यानं नववीमध्ये असतानाच एक गझल लिहिली आणि वडलांच्या शिव्या खाल्ल्या. कारण गझल प्रेमावर होती… नववीत असताना सईदला कुठलं प्रेम कळलं होतं हे तोच जाणे.

किसी को घर से निकलते ही मिल गई मंज़िल, 
कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा…

असं म्हणणारा फराज खरंच सगळं आयुष्य हिंदी आणि इंग्रजीमधल्या ‘सफर’ मध्येच राहिला. शायरी लिहायला लागल्यावर त्यानं आधी अहमद शाह कोहाटी हे नाव लावायला सुरुवात केली. कारण त्याचा जन्म कोहटमध्ये झाला होता. पण पुढं फैज अहमद फैजच्या सल्ल्यानुसार त्यानं अहमद फराज हे नाव लावायला सुरुवात केली. मग हे नाव त्याला चिकटलं ते कायमचं.

कुछ इस तरह से गुज़ारी है ज़िंदगी जैसे,
तमाम उम्र किसी दूसरे के घर में रहा… 

फराजची लव्ह स्टोरी किंवा ब्रेकअप फार फेमस नाही, फेमस आहे ती त्याची बंडखोरी. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या फराजनं आपल्या देशातल्या हुकूमशाहीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कायम आवाज उठवला. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि चिडलेल्या जनरल जिया उल हकनं त्यांना अटक केली. त्यानंतर सहा वर्ष ते कॅनडा आणि युरोपमध्ये अज्ञातवासात राहिले. इतर कुठल्याही माणसाप्रमाणं त्यांचं आपल्या मातृभूमीवर प्रेम होतं. पण बराचसा काळ त्याला पाकिस्तानच्या बाहेर घालवावा लागला.

पण याच पाकिस्तानच्या जुदाईमुळं त्याच्या लेखणीतून नशा उतरली, जिचं नाव…

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ,   
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ…

पाकिस्ताननं त्यांना ‘हिलाल-ए-इम्तियाज’ या आपल्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पण या बंडखोर कवीनं २००६ मध्ये हा पुरस्कार परत दिला. कारण पाकिस्तानात होत असलेल्या लोकशाही विरोधी घटनांना त्यांचा विरोध होता.

मैं क्या करूँ मिरे क़ातिल न चाहने पर भी,
तिरे लिए मिरे दिल से दुआ निकलती है…

आपल्या मातृभूमीवर त्यानं प्रेम केलं आणि भारतातून मिळणाऱ्या प्रेमाचा आदरही. तो कायम म्हणायचा, ‘हिंदुस्थान… माझं दुसरं घर आहे.’ फराजला भारतात, पाकिस्तानात आणि जगभरात कित्येक पुरस्कार मिळाले. पण त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश वेगळंच होतं.

आयुष्यभर त्याचे वडील त्याला ‘अहमद’ अशीच हाक मारायचे. आपल्या मुलानी शायर होण्यावर ते फारसे खुश नव्हते. मात्र आपल्या वयाच्या अखेरीस त्यांनीही आपल्या अहमदला आवाज दिला… “फराज.”

अमेरिकेतल्या एका कार्यक्रमानंतर एक मुलगी त्याच्याकडे सही मागायला आली. फराजनं त्या चिमुरड्या पोरीला तिचं नाव विचारलं, तिनं नाव सांगितलं… ‘फराजा.’ ‘हे असं नाव का?’ या प्रश्नावर तिचं उत्तर होतं, ”माझ्या आई वडिलांचे तुम्ही आवडते शायर आहात. त्यांनी ठरवलेलं की मुलगा झाला तर फराज नाव ठेवायचं. पण मुलगी झाली म्हणून त्यांनी नाव ठेवलं फराजा.” फराजनं यावरही शेर लिहिलाय, तो म्हणतो…

और फराज़ चाहिए कितनी मोहब्बतें तुझे,
मांओं ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया…

हा शेर वाचल्यावर तिची आठवण आली. आम्ही लग्न झाल्यावर पोरांची नावं काय ठेवायची हे ठरवलं होतं. आता ती पोराला आम्ही ठरवलेलं नाव ठेवेल की माझं… हा प्रश्न अजूनही कित्येक रात्रींची झोप उडवतो. खरंतर ठरवलं होतं, की तिच्याबद्दल लिहायचं नाही. पण…

लो फिर तेरे लबों पे उसी बेवफ़ा का ज़िक्र,
अहमद ‘फ़राज़’ तुझ से कहा न बहुत हुआ…
– अहमद फ़राज़ 

  •    भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.