२६ मुलांना किडनॅप करून जेव्हा जमिनीखालच्या बंकरमध्ये ठेवण्यात आलं
काही दिवसांपुर्वीचीच बातमी. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अंधाधुंद गोळीबार करुन शाळेतील मुलांची हत्या करण्यात आली. तुम्ही नीट बातम्या पहात असाल तर तुमच्या लक्षात येईल लहान मुलांना अस मासमध्ये मारण्याच्या घटना या अमेरिकेतच वारंवार होतं असतात. त्याबद्दल अमेरिकेत किराणा मालाच्या दुकानात देखील मिळणाऱ्या बंदुका, तरुणांची मानसिकता यावर अनेकदा चर्चा होते अन् ती तितक्याच वेगाने थांबते.
अमेरिकेतल्या घटनेबद्दल आणि तितल्या वेपन ॲक्टबद्दल आम्ही यापूर्वीच खालील स्टोरीमध्ये माहिती दिली आहे. ती तुम्ही या लिंकवर जावून वाचू शकता.
आजचा विषय मात्र वेगळा आहे..
अमेरिकतच एक भयानक किडनॅपिंग घडलं होतं ते सांगणारा. या घटनेतून तुमच्या लक्षात येईल की हे आजचं नाही..
ते साल होतं १९७६ चं. अमेरिकेत समर चालू होता. समर व्हेकेशन आणि समर हॉबीचा सिझनच. तारिख होती १५ जुलै. या काळात प्रत्येक घरातून लहान मुलं समर हॉबीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायची. बऱ्याचदा शाळाच असे उपक्रम राबवायच्या.
अशाच एका समर हॉबीसाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या चाऊविले येथील डेअरीलॅड इलिमेंटरी स्कूलची मुलं स्कुल बसमधून जात होती. यामध्ये ५ वर्षांच्या मुलांपासून ते १४ वर्षांपर्यन्तची मुलं होती. १९ मुली व बाकी मुलं अशी टोटल २६ मुलांची स्कूलबस ड्रायव्हर फ्रॅन्क ज्युनियर सोबत चालली होती..
दूपारची वेळ होती. रस्त्यावर गर्दी असण्याचा प्रश्न देखील नव्हता. सर्व काही निवांत चालल होतं तोच या बसला एका पांढऱ्या व्हॅनने ओव्हरटेक केलं. ओव्हरटेक करुन ही व्हॅन पुढं न जाता तिथेच थांबली. त्यातून तोंड बांधलेले तीन लोक उतरले. बसमध्ये शिरले आणि ड्रायव्हरला उतरून जायला सांगू लागले..
पण ड्रायव्हर फ्रॅन्क ज्युनियर मोठ्या धीराचा माणूस होता. त्याने या किडनॅपरना विरोध करायला सुरवात केली. ड्रायव्हरचा विरोध पाहून त्यातील एकाने गन काढून थेट त्याच्या डोक्याला लावली. आत्ता प्रतिकार करण्यात अर्थ नव्हता.
ड्रायव्हर फ्रॅन्क ज्युनिअर आपल्या जागेवरून उठला. त्याच्या जागेवर तीन किडनॅपरपैकी एकजण बसला. दूसरा एकजण आलेल्या व्हॅनमधून रस्ता दाखवू लागला आणि गाडी वेगळ्याचं रस्त्याला वळली…
बस थांबली ती एका जंगलात. तेव्हा रात्र होत आली होती. सर्व मुलं प्रचंड भिली होती. बस जिथे थांबली तिथे पहिल्यापासूनच एक व्हॅन होती. बसमधील सर्व मुलांना दोन व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. सोबत तीन किडनॅपर..
आणि एक प्रवास…
रात्रभर प्रवास करुन पहाटेच्या वेळेस या व्हॅन एका शेतात पोहचल्या. तिथे एक छोटा बंकर होता. या बंकरमध्ये एका मागून एका मुलाला उतरवण्यात आलं. वास्तविक रिकामा कंटेनर जमिनीत पुरून ठेवण्यात आला होता. १२ फुटांपेक्षा जास्त खोलीवर पुरण्यात येवून त्यावर सुरूंगप्रमाणे रस्ता करण्यात आला होता.
सर्व २६ मुलांना व त्या ड्रायव्हरला आत सोडून दरवाजा लावण्यात आला. रडारड आणि गोंधळ सुरू झाला…
अन् दूसरीकडं संपुर्ण चाउविले शहर हादरून गेलं होतं.. दूपारच्या सुमारासच बस अजून अपेक्षित ठिकाणी पोहचलेली नाही याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. काही वेळातच ही बातमी ब्रेकिंग न्यूज झाली. अमेरिकेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रेडिओवरून बातमी प्रसारित करण्यात आली.
एका बसमधले २६ विद्यार्थी गायब होतात ही छोटी गोष्ट नव्हती..
रात्रीच्या सुमारास हा तपास FBI ने ताब्यात घेतला. घटना घडली त्या ठिकाणापासून सर्वत्र सर्च मोहिम राबवण्यात आली. अखेर बस सापडली पण रिकामी. इथून पुढं काय झालं याचा अंदाज कोणालाच लागत नव्हतं…
इकडे संपूर्ण दिवस त्या मुलांनी बंकरमध्ये काढला. बाहेर दिवस आहे की रात्र याची माहिती देखील मिळत नव्हती. किडनॅप करणाऱ्यांनी व्हेटिलेशनसाठी एक फॅन ठेवला होता. त्यामुळे हवा खेळती रहात होती हीच काय ती चांगली गोष्ट होती. खाण्यापिण्याचं सामान देखील होतं.
संपूर्ण दिवस गेला. ड्रायव्हर अन् त्याच्यासोबत सर्वात मोठ्ठा असणारा १५ वर्षाचा मायकल नावाचा मुलगा सर्वांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. ड्रायव्हरच्या डोक्यात फक्त इतकच होतं की मुलांनी ओरडून दंगा केला तर किडनॅपरनी चिडून मुलांना ठार करू नये..
अन् अचानक व्हेटिलेशनसाठी असणारा पंखा बंद झाला..
मुलांचा श्वास कोंडू लागला.. आत्ता सर्वजण मरणाच्या टप्प्यात आले होते. काहीही करुन बाहेर पडायचं पण मार्ग नव्हता. छताला असणाऱ्या दरवाजाला ड्रायव्हर धक्के देत होता. पण मार्ग भेटत नव्हता..
अचानक मायकलचं लक्ष तिथे असलेल्या त्या पंख्याकडं गेलं. पंख्याच्या आजूबाजूला जराशी माती दिसत होती. पंखा काढला तर रस्ता मिळू शकतो. मायकल आणि ड्रायव्हरने मिळून तो पंखा काढला. पंखा काढल्यानंतर एक मुलगा जावू शकेल असा रस्ता दिसत होता. पण दरवाज्याबाहेर ट्रकच्या मोठ्या बॅटऱ्या ठेवण्यात आलेल्या होत्या.
ड्रायव्हर आणि मायकलने माती बाजूला सारून रस्ता तयार केला. जोरात ढकलून बॅटरी बाजूला सारल्या अन् दरवाजा उघडला. सर्व मुलांना घेवून मायकल बाहेर पडला. लहान मुलांना समजत नव्हत आपल्यासोबत काय घडतय. एकमेकांना धरून मायकलने सर्वांना एका हायेववर आणलं.
योगायोगाने एक व्यक्ती गाडीतून रात्रीच्या वेळेस तिथून पास होत होता. मायकल आणि इतक्या लहान मुलांना पाहून तो थांबला. आत्तापर्यन्त सर्वांना ही बातमी समजली होतीच. त्याने सर्वांना तिथेच थांबायला सांगितलं आणि थेट लोकल पोलीस स्टेशनला जावून बातमी दिली…
पुढच्या काही मिनटातच पोलीस व्हॅनचा जत्थाच्या जत्था तिथे पोहचला. सर्वांना लोकल हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्यात आलं. FBI ची टिम घटनास्थळावर आली.
बंकर ताब्यात घेण्यात आलं…
आत्ता पुढचा तपास होता हे सर्व कोणी घडवून आणलं. तपासाची दिशा ठरली होती. ज्या शेतात हा बंकर होता त्याचा मालक. या मालकाचं नाव होतं. फेड्रिक. फेड्रिकची चौकशी सुरू झाली तेव्हा तो गायब असल्याचं समजलं..
पोलीस फेड्रिकला शोधू लागले. तीन आठवड्यानंतर फेड्रिकला कॅनडामधून अटक करण्यात आलं. सोबत त्याचा एक मित्र देखील अटक झाला. तिसरा मित्र या दोघांना अटक झालेली पाहून स्वत:हून पोलीसांमध्ये हजर झाला…
तिघांनी खुलासा केला. मोठ्या प्रमाणात पैसे पाहीजे होते म्हणून किडनॅप करण्याची आयडिया आली. पण एका मुलाला किडनॅप केलं तर मिळून मिळून किती मिळणार. त्यातही सारखं हेच काम करायला लागणार त्यापेक्षा एकाचवेळी अधिक मुलांना किडनॅप करायचा प्लॅन तयार करण्यात आला.
त्यासाठी सर्वात योग्य गोष्ट होती स्कूलबस किडनॅप करायची. ठरल्याप्रमाणे आम्ही ती केली. मुलांना व्यवस्थित कोंडून ठेवलं अन् दूसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन करु लागलो..
पण मुलांच्या अपहरणाची केस मोठ्या प्रमाणात गाजल्याने पोलीस स्टेशनचा फोन दिवसभर व्यस्त लागत होता. दिवसभर कित्येक प्रयत्न करुनही फोन कनेक्ट झाला नाही. शेवटी उद्या फोन करायचा म्हणून आम्ही तिघेही झोपून गेलो तोच दूसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला मुलांच्या सुटकेची बातमी समजली..
आत्ता सगळं संपल म्हणून आम्ही फरार झालो, फक्त पैशासाठीच आम्ही हे केलं होतं अशी कबुली त्यांनी दिली होती…
हे ही वाच भिडू
- मेहुल चोक्सीला किडनॅप करण्यात रॉच्या एजंटचा सहभाग होता का ?
- भारतातला सर्वात बहुचर्चित सिनेमा रिलीज होत होता आणि प्रोड्युसरला कोणी तरी किडनॅप केलं