सखाराम पंडित यांनी दिलेल्या लढ्यामुळे भारतीयांना ‘अमेरिकन नागरिकत्व’ मिळू लागलं

अमेरिकेला स्वप्नांचा देश म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकांना मनातून त्या देशात जायची इच्छा असते. अनेकांचं ते स्वप्न पूर्णही होतं.

गुगलचे सीईओ सुंदर पीचई यांच्या पासून ते हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक एम नाईट श्यामलन यांच्यापर्यंत कित्येक भारतीय अमेरिकेतील वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहेत.

आज लाखो भारतीय अमेरिकेत राहत आहेत. काहींना नागरिकत्व मिळाले आहे तर काहीजण H1B व्हिसावर आहेत.

नुकताच अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे तिथे राहणाऱ्या अनेक भारतीयांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

आपला हक्क अबाधित राखण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागणार आहे, असाच लढा तिथलं पहिलं नागरिकत्व मिळवण्यासाठी सुद्धा द्यावा लागला होता.

साधारण सतराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अनेक भारतीयांना आपल्या वसाहतीमध्ये शेतीच्या व खाणीच्या कामावर मजुरी करण्यासाठी घेऊन जाऊ लागली. यातूनच अमेरिका खंडात भारतीयांचे पहिले स्थलांतर झाले.

विशेषतः पंजाबी शेतकरी गुजराती व्यापारी हे बेकायदेशीररित्या अमेरीकेत राहू लागले.

तिथल्या 13 युरोपियन वसाहती एकत्र येऊन युनायटेड स्टेटस ऑफ अमेरीका हा देश बनला. हा देश खरं तर स्थलांतरित लोकांचाच देश होता. तिथले मूळचे रेड इंडियन्स सोडले तर प्रत्येक नागरिक बाहेरून आलेला होता.

१८६० साली अमेरिकेत यादवी युद्ध झाले ज्याचा फायदा भारतातील कापूस व्यापाऱ्यांना झाला. अनेकांनी कोट्यवधीची संपत्ती मिळवली, यातच होते सर दिनशॉ पेटिट आणि टाटा.

पण अमेरिकीकेतील यादवी युद्ध संपले तसे भारतीय कापसाची मागणी कमी झाली.

यामुळे कापूस उद्योगाच्या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना अमेरिकेत व इतरत्र संधी शोधणे भाग होते.

अनेक पारसी कापूस व्यापारी अमेरिकेत स्थायिक झाले. यापैकी एडलजी सोराबजी, भिकाजी बलसरा हे पहिले भारतीय ज्यांना अमेरिकेच नागरिकत्व मिळालं.

त्याकाळात फक्त गोऱ्या वंशाच्या व्यक्तींना अमेरिकेचे नागरिकत्व दिले जात असे. पण पारसी व्यापाऱ्यांनी आपण मूळचे पर्शियाचे असल्याचा व गोऱ्या वंशाचे असल्याचा दावा करून नागरिकत्व मिळवलं होतं.

पण हिंदू मुस्लिम शीख व इतर आशियाई वंशाच्या व्यक्तींना नागरिकत्व नाकारले जात होते.

याच काळात अमेरिकेत भारतातून येणारे लोक प्लेगची साथ आणत आहेत अस समजून हिंदूंच्या विरोधात दंगल सुरू झाली होती.एकंदरीत तिथे राहणाऱ्या भारतीयांचे हाल वाढले होते.

अशातच भगतसिंग थिंड यांची केस समोर आली.

भगतसिंग थिंड हे मूळचे पंजाबचे. शिक्षणासाठी म्हणून ते अमेरिकेत आले. पण तेव्हाच सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैन्याकडून भाग घेतला, तिथे त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे ते गोऱ्या वंशाचे नसूनही त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले होते.

Bhagatsinghthind

९ डिसेंम्बर १९१८ रोजी भगतसिंग थिंड यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले. पण पुढच्या चारच दिवसात त्यांचं नागरिकत्व रद्द करण्यात आले.

भगतसिंग यांनी पुन्हा अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आणि तो रद्द झाल्यावर कोर्टात धाव घेतली.

तेव्हा त्यांच्या मदतीला आले वकील सखाराम गणेश पंडित.

सखाराम पंडित हे मूळचे अहमदाबादच्या मराठी ब्राम्हण कुटुंबात जन्मलेले. हुशार असल्याने कमी वयात डॉक्टरेट मिळवली. पण विवेकानंद यांच्या शिकवणीतून भारावून जाऊन अध्यात्मिक गुरू बनले व त्या निमित्ताने अमेरिकेत आले होते. इथे आल्यावर त्यांनी अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला.

त्यांचाही अर्ज रद्द झाला होता पण सखाराम यांनी कायद्याच्या पळवाटा शोधून स्वतःच नागरिकत्व मिळवलं होतं.

Sakharam Ganesh Pandit and Lillian Stringer 1920

पुढे यातूनच त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये वकिलीची सनद मिळवली. तिथेच एका गोऱ्या मुलीशी त्यांनी लग्न केलं.

कॅलिफोर्नियामध्ये त्यांची वकिली खूप चांगली सुरू होती.अमेरिकेतील एकमेव हिंदू वकील म्हणून त्यांची ख्याती देखील झाली.

Advertisement for S.G. Pandit B.A.

१९२३ साली सुप्रीम कोर्टात लढल्या गेलेल्या भगतसिंग थिंड यांच्या नागरिकत्वाची केस त्यांनीच लढली. अनेक वाद प्रतिवाद झाले. भगतसिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गदर संघटनेत कार्य केल्याचंही उघड झाले.

या सगळ्यामुळे सखाराम पंडित ही केस हरले. भगतसिंग याना तेव्हा नागरिकत्व मिळाले नाही.

उलट सखाराम पंडित यांनी बेकायदेशीररित्या स्वतःच नागरिकत्व मिळवलं म्हणून त्यांच्यावरच केस झाली.

त्यांची केस ट्रायलला येई पर्यंत म्हणजे १९२६ साला पर्यंत ४२ भारतीयांचं अमेरिकन नागरिकत्व कॅन्सल करण्यात आलं. या केसवेळी सखाराम पंडित यांनी आपले कायद्याच सर्व ज्ञान पणाला लावले.

अनेक महिने चाललेल्या या खटल्यात मात्र त्यांचा विजय झाला. त्यांच्यासकट इतर भारतीयांचे अमेरीकन नागरिकत्व परत मिळाले.

सखाराम पंडित व अनेक भारतीयांनी अखंड दिलेल्या लढ्यामुळे साधारण १९४६ साली ल्युस सेलर ऍक्ट लागू झाला ज्यामुळे भारत व इतर देशांत जन्म झालेल्या व्यक्तींना फक्त वंशाच्या कारणाने अमेरिकेच नागरिकत्व नाकारणे बंद करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.