पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडणे एका भारतीय माणसामुळे शक्य झाले.

आजकाल जग सोपं झालंय अस जुनी माणसं म्हणतात. एकप्रकारे पाहिलं तर ते खरंच आहे. अहो खूप लांबच कशाला काही वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा एक साधा फोटो मित्राला द्यायचा झाला तर १० केबीची फ्लॉपी वापरायला लागायची. मग पुढे सीडीज आल्या, डीव्हीडी आल्या.

जे टेक्निकली हुशार होते ते आजोबा कॉम्प्युटरची भली मोठी हार्ड डिस्क घेऊन हिंडायचे.

सीपीयू उघडून त्यातल्या मोठमोठ्या वायरी वापरून हार्ड डिस्क कॉम्प्युटरला जोडली जायची. एवढं सगळं अग्निदिव्य पार करून एक अख्खा पिक्चर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये घेणे म्हणजे एखादं पर्वत चढल्याप्रमाणे वाटायचं.

हे सगळे कष्ट बोटभर आकाराच्या पेनड्राईव्हमुळे सोपे झाले.

काही सेकंदात जीबीच्या आकाराची फाईल ट्रान्सफर होऊ लागली, पुढे एक्सस्टर्नल हार्ड डिस्क नावाचा प्रकार आला आणि आता तर आपण टीबी मध्ये खेळतो.

कॉलेजच्या प्रोजेक्ट्स पासून सनीच्या कलेक्शन पर्यंत कितीही प्रचंड ह्युज डेटा ट्रान्सफर एकमेकांना देता येऊ लागला. ते शक्य झालं पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडता आल्या मुळे. यूएसबी पोर्टमुळे.

USB पोर्ट हा टेक्निकल जगतात आजवरचा हा सर्वात मोठ्या शोधापैकी एक मानला जातो. याचे श्रेय जाते एका भारतीय माणसाला, अजय भट्ट यांना.

अजय भट्ट मूळचे बडोद्याचे. तिथल्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं. इंजिनिअरिंगनंतर अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठातून मास्टर्स डिग्री घेतली.

पुढे अजय भट्ट अमेरिकेतच जगप्रसिद्ध इंटेल या कंपनीत सिनियर स्टाफ आर्किटेक्ट म्हणून जॉईन झाले.

१९९० च्या दशकाचा हा काळ. जग झपाट्याने बदलत चाललं होतं. येणारे नवीन सहस्त्रक संगणक तंत्रज्ञानाचे असणार आहे हे स्पष्ट होते. झाडून सगळ्या कंपण्या नवीन शोध लावण्यासाठी प्रयत्नशील होत्या. इंटेलसुद्धा त्यापैकीच एक.

तोपर्यंत भारतीय इंजिनियर्सनी बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर अमेरिकेत आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं होतं.

इंटेलसारख्या कंपनीत अनेक भारतीय काम करत होते, महत्वाच्या पदावर मोठमोठे प्रोजेक्ट्स हाताळत होते.

अजय भट्ट यांनी तर इंटेलला तब्बल १३० पेटंट मिळवून दिलं होतं. याच पेटंटमुळे त्यांना इंटेल फेलोचा दर्जा मिळवून दिला होता. कंपनीतल्या सर्वोत्तम एम्प्लॉयी पैकी एक म्हणून तटांची गणना होत होती.

USB चा शोध देखील एका गंमतीशीर अपघाताने लागला.

अजय भट्ट यांच्या मुलीला शाळेत कसला तरी प्रोजेक्ट जमा करायचा होता. त्यात त्यांच्या घरातील प्रिंटर बिघडला. अजय यांची पत्नी पोरीच्या प्रोजेक्टच्या प्रिंटआउट साठी गावभर फिरली. साधी चार पाच पाने प्रिंट करण्यासाठी तिला प्रचंड कष्ट घ्यावे लागले.

घरी परतल्यावर तिने नवऱ्याच्या नावाने बोटे मोडली. कसले तुम्ही इंजिनिअर? डेटा ट्रान्सफर करायला काही सोपा उपाय शोधून काढा अस थेट आव्हान तिने नवऱ्याला दिल.

बायकोच्या शिव्या खाल्ल्यावर जशी अवस्था जगभरातल्या नवऱ्याची होते तशीच अजय भट्ट यांची झाली. रागाच्या भरात तिरमिरीत कंपनीमध्ये आले आणि यावरच प्रोजेक्ट सुरू केला.

अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर युनिव्हर्सल सिरीयल बस उर्फ USB चा त्यांना शोध लागला.

हा शोध क्रांतिकारी होता. आज प्रत्येक लॅपटॉप, कॉम्प्युटर याला usb पोर्ट कंपल्सरी आहे. फक्त पेनड्राईव्ह नाही तर माउस, कीबोर्ड इतकंच काय तर मोबाईल चार्जिंगसुद्धा या usb च्या जीवावर होते. चुटकीसरशी डेटा ट्रान्सफर होतो. विनाकारणचे कष्ट, पैसा,वेळ याचा अपव्यय टळला. कॉम्प्युटरच्या देखील किंमती usbमुळे कमी झाल्या.

जगाचं निम्मं टेन्शन या usb मुळे कमी झालं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

तुम्हाला वाटेल usbच्या पेटंटमुळे अजय भट्ट तुफान श्रीमंत झाले असतील तर तो तुमचा गैरसमज आहे. त्यांनी हा शोध इंटेलमध्ये नोकरी करत असल्यामुळे लावला यामुळे त्यांना म्हणावा तेवढा आर्थिक फायदा झाला नाही. अवॉर्डस मात्र अनेक मिळाले.

इंटेलच्या टीव्हीवरच्या जाहिरातीत टेक्नॉलॉजीमधला रॉकस्टार म्हणून त्यांना ओळखलं गेलं.

आज त्यांच्या नावावर १३२ पेटंट आहेत, जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जातं. घरच्या छोट्याशा प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी जगाचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या अजय भट्ट यांनी भारतीय इंजिनियर्सची मान विश्वभरात उंचावली आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.