साडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली होती.

काही गायकांच्या व्यक्तिमत्वात एक अनामिक बिनधास्त पणा दिसून येतो. हाच गुण या गायकांच्या गाण्यांमध्ये पुरेपूर उतरतो. उदाहरण द्यायचं झालं, तर आशा भोसले यांचा स्वभाव जसा बेधडक आहे तशीच त्यांची गाणी सुद्धा काहीशी वेगळी आणि हटके असतात. आशाताईं प्रमाणे गेली अनेक वर्ष स्वतःच्या गायनाने आपली मनं जिंकणाऱ्या अशाच एका गायिकेची कहाणी या लेखातून उलगडणार आहे.

ही एव्हरग्रिन गायिका म्हणजे उषा उत्थूप.

कांजीवरम साडी, लांबसडक केसांमध्ये माळलेला गजरा. दोन्ही हातांमध्ये भरलेल्या बांगड्या. कोलकाता शहराचा ‘क’ असलेली गोलाकार टिकली. असं उषा जींचं बाह्य रूप त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख आपल्याला करून देते. त्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारचा स्वैर पणा आहे. म्हणून आजही टीव्ही वर अमुल ची जाहिरात लागते, तेव्हा या जाहिरातीमध्ये असलेल्या उषा जींच्या आवाजाचं वेगळेपण लगेच लक्षात येतं.

एक गायिका म्हणून उषा उत्थूप यांचा प्रवास काहीसा वेगळा आहे.

उषा जींचे वडील वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. मुलगी असूनही लहानपणापासून उषा ला घरात स्वातंत्र्य होतं. अगदी मुलांप्रमाणे आई वडिलांनी तिचा सांभाळ केला. मुंबईत जन्मलेल्या उषा उत्थूप यांचं शालेय शिक्षण सेंट अग्नेस हायस्कूल मधून झालं. एक विशेष गोष्ट म्हणजे, आवाज बरोबर नाही म्हणून उषा ला तिच्या शिक्षकांनी शाळेतील म्युझिक क्लास मधून काढलं होतं. परंतु कालांतराने उषा मध्ये दडलेलं संगीत शिक्षकांनी ओळखलं. आणि तिला म्युझिक क्लास मध्ये प्रवेश दिला.

उषा जींच्या घरी सुद्धा संगीतमय वातावरण असायचं. त्याचे आई – वडील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे चाहते होते. घरात संगीतमय माहोल अनुभवल्यामुळे उषा ने सुद्धा गायिका होण्याचं ठरवलं.

वयाचा ९ व्या वर्षी उषा जीं च्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली. सुप्रसिध्द रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांनी उषा चा आवाज सर्वप्रथम लोकांसमोर आणला. पुढे १९६९ साली चेन्नई येथील नाईन जेम्स या लोकप्रिय नाईट क्लब मध्ये उषा उत्थूप यांनी गायला सुरुवात केली.

चापून चोपून नेसलेली साडी ही उषा जींची खासियत बनली. नाईट क्लब मध्ये केलेल्या या पहिल्याच गाण्यांना उपस्थित लोकांनी मनमुराद दाद दिली. त्यामुळे नाईट क्लब च्या मालकाने उषा जींना आणखी एक आठवडा गायला परवानगी दिली.

चेन्नई येथील नाईट क्लब मध्ये गायल्यानंतर दिल्ली येथील ओबेरॉय हॉटेल मध्ये त्यांनी गायला सुरुवात केली.

या हॉटेल मध्ये त्यावेळी नवकेतन फिल्मची टीम आणि स्वतः देवानंद यायचे.

एकदा देवानंद यांनी उषा जींचा आवाज ऐकला. आणि त्यांना सिनेमात गाण्याची ऑफर दिली. शंकर – जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेला आणि देवानंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमात गाऊन त्यांनी गायिका म्हणून बॉलिवुड मध्ये प्रारंभ केला. याच काळात त्यांनी पॉप कल्चर ची गाणी गायला सुरुवात केली. आणि अशाप्रकारे भारतीय पॉप सिंगर म्हणून उषा उत्थूप यांना नवी ओळख मिळाली.

एक उत्तम गायिका म्हणून उषा जी मशहूर झाल्या होत्या. तसेच एका गोष्टीमुळे गायनाच्या पलिकडे एक बेधडक व्यक्तिमत्व म्हणून उषा उत्थूप यांना नवी ओळख मिळाली. तो किस्सा असा.. पॉप सिंगर म्हणून उषा अनेक ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करायच्या.

या काळात पश्चिम बंगाल येथील डाव्या विचारांच्या सरकारचे  मंत्री जतिन चक्रवर्ती यांनी सरकारी सभागृहात उषा उत्थूप यांचे कार्यक्रम होण्यावर बंदी घातली. उषा जी त्यांच्या कार्यक्रमातून समाजात वाईट विचार पसरवत आहात, या भीतीपोटी त्यांनी कार्यक्रमांवर बंदी घातली. परंतु उषा जी गप्प बसल्या नाहीत. त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं.

हे प्रकरण पुढे कोर्टात गेलं. आणि उषा जी यांनी हा लढा जिंकला.

तर ही होती उषा उत्थूप यांची कहाणी. प्रत्येक क्षेत्रात कालानुरूप बदल होत असतो. संगीत क्षेत्रात सुद्धा आत्ता रूपांतर झालं आहे. अनेक नवीन सिंगर पुढे आले आहेत. जमाना कितीही बदलला तरी संगीतात क्लासिक पणा जपणाऱ्या उषा उत्थूप सारख्या गायिका प्रत्येक काळात लोकांना त्यांच्या गाण्यांचा आनंद देत राहतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.