मुलीच्या एका प्रश्नामुळे तो स्वच्छतागृहात लिहलेली वाक्य पुसतोय. 

लहानपणीच शाळेच्या पाठ्यपुस्तकात लिहलेलं असायचं भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविधता म्हणजे धर्म, भाषा, संस्कृती असायचं. पण मोठ्ठेपणी लक्षात आलं हि विविधता प्रवृत्तीची देखील असते. आपण माणूस नाही हे दाखवणारी प्रवृत्ती. म्हणजे किल्यावर गेल्यानंतर मोठ्या अभिमानाने आपलं आणि प्रेयसीचं नाव लिहणाऱ्यांची प्रवृत्ती. बसमध्ये बसल्यानंतर सीटमधील स्पंज काढून घेणाऱ्यांची प्रवृत्ती. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची प्रवृत्ती. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. बर अशी माणसं आणि त्यांच्या गोष्टी इतक्या सवयीच्या झालेल्या असतात की, चालायचं म्हणून आपणही त्या गोष्टीमनावर घेत नाही. 

अशीच एक प्रवृत्ती असते सार्वजनिक स्वच्छतागृहात लिखाण करणाऱ्यांची. अशी माणसं कुठल्याही स्वच्छतागृहात गेली की तिथे आपली कलाकारी दाखवतात. कधी एखाद्या मुलगीचा नंबर दिला जातो तर कधी चित्र काढून पत्ता देण्यापर्यन्त मजल जाते. 

असल्या गोष्टींचा सर्वांधिक वापर झाला तो रेल्वेच्या स्वच्छतागृहात. वाईट वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे हि स्वच्छतागृहे आई, बहिण, बायको, मुलगी, लहान मुले वापरतात. असल्या माणसांमुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होतं असतो ते वेगळं सांगायला नको, त्यातही एखाद्या मुलींचा नंबर लिहल्यानंतर तिला कोणत्या अडचणी येत असतील हे देखील सांगता येत नाही. 

अशीच एक घटना एक वर्षांपुर्वी उत्तम सिंन्हा यांच्याबरोबर घडली.

उत्तम सिन्हा आपल्या कुटूंबासोबत कोल्डफिल्ड एक्सप्रेने धनबादला चालले होते. सोबत त्यांची बायको आणि आठ वर्षाची मुलगी. दूसरी तिसरीत असणारी ती मुलगी रेल्वेच्या स्वच्छतागृहात गेली. परत आल्यानंतर तिने आपल्या वडिलांना विचारलं, 

पापा जो अंदर फोन नंबर के साथ लिखा था वो क्या था..? 

उत्तम सिंन्हा यांना त्यांच बालपण आठवलं. ते देखील उत्सुकतेपोटी आपल्या वडिलांना हाच प्रश्न करायचे. पण आत जे लिहलेलं असायचं ते कधीच त्यांना सांगितलं जात नव्हतं. आज त्यांचीच छोटी मुलगी हा प्रश्न विचारत होती. 

उत्तरम सिंन्हा यांनी रेल्वेच्या प्रवासात हाच विचार केला, उतरताना मात्र त्यांना एका गोष्टींने पछाडलं होतं. त्यांनी ठरवलं की रेल्वेल लिहलेली हि वाक्य आपण पुसायला सुरवात करायची. 

उत्तम सिंन्हा हे पेंट घेवून रेल्वेच्या स्वच्छतागृहात जावू लागले. जिथे काही लिहलेलं दिसायच त्यावर पेन्ट करुन त्यावर एक कागद चिटकवायचे. त्यावर लिहलेलं असायचे. कृपया अश्लील शब्द का प्रयोग न करें. 

एका वर्षात १०० रेल्वेमधील त्यांनी अश्लील वाक्य खोडली. शाळा, कॉलेज, सार्वजनिक स्वच्छतागृह अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा प्रयोग राबवला. वेळ मिळाला की हातात पेन्ट घेवून जायचं आणि अश्लील वाक्य खोडून तिथे विनंती करायची. काही ठिकाणी त्यावर देखील पुन्हा अश्लील लिखाण करण्यात आलं. पण हळुहळु लोकांना त्यांचा प्रामाणिकपणा समजला आणि लोकांनी अश्लील लिहणं सोडून दिलं. 

उत्तम सिंन्हा काय करतात तर त्यांना एक छोटी मुलगी आणि मुलगा आहे. चौकोनी कुटूंब. रस्त्यावर कपडे विकणारे उत्तम सिन्हा सध्या मिळेलं ते काम करतात. चार पैशात संसार चालवणारे सर्वसामान्य भारतीय नागरिक आहेत ते. आणि हो.. तेच खरे भारतीय नागरिक आहेत. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.