जनसंघ ते भाजपा अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा तोफखाना घडवला..

महाराष्ट्रातील राजकारणात व समाजकारणात जे मान्यवर नेते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वकर्तुत्वाने मोठे झालेत त्यात सर्वश्री स्व. यशवंतरावजी चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. भाऊसाहेब हिरे, स्व. भाई डांगे, एस.एम. जोशी स्व. वसंतराव नाईक, स्व. शंकरराव चव्हाण, नानासाहेब गोरे, मधुजी लिमये, बाळासाहेब देसाई, विठ्ठलराव पाटील अशा थोर नेत्यांच्या परंपरेतील खान्देशातील काळ्या मातीशी इमान राखणारा भूमिपुत्र स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील होत, त्यांची आज २० वी पुण्यतिथी.

स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील भारतीय जनसंघाचे महाराष्ट्रातील एक लढवय्ये नेते. प्रवाहाच्या विरोधात राहून जनसंघ उभा करण्यात नानासाहेबांचा मुलाच्या सिंहाचा वाटा. जनसंघाच्या दिवा निशाणीला राज्यातील खेड्यापाड्यात व आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचविण्यात नानांनी जीवाचे रान केले. जनसंघ म्हणजे उत्तमराव पाटील अशी त्यावेळची नानांची व्याख्या होती.

अत्यंत साधा भोळा माणूस, शिस्तप्रिय, विचारवंत, राजकीय मुरब्बी नेता, न्यायप्रिय विचारांचा नंदादिप, करारी व्यक्तिमत्त्व, नैतिक मूल्यांची जडण-घडण करणारा नेता अशी विविध वलयं नानांच्या व्यक्तिमत्त्वाची होती.

शिक्षक, वकील, राजकीय पुढारी, प्रभावी वक्ता असा प्रवास नानांचा सुरू झाला. राजकीय जीवनात खूप चढ-उतार त्यांनी पाहिली, परंतु ते खचले नाहीत. कार्यकर्त्यांची जोपासना करून त्यांच्या संसारीक जीवनाची आपुलकीने माहिती घेणे, घरातील वडीलधाऱ्या माणसांची व्यक्तिशः चौकशी करुन खरी परिस्थिती हाताळणे ही नानासाहेबांची व्यवहारी गुण होते. नव्या पिढीसमोर नवे विचार देऊन संस्कारक्षम पिढी घडविणे त्याचबरोबर समाजात मोठ्या विचारांची कार्यकर्त्यांची फौज व विचारांच्या तोफखाना जनसंघाच्या माध्यमातून नानासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात रुजवला.

सन १९५० मध्ये स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या हस्ते संघात प्रवेश देण्यात आला. एक विचारी प्रखर राष्ट्राभिमानी व बुद्धिजीवी वर्गात सोबत काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. सन १९५२ मध्ये खऱ्या अर्थाने शामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत जनसंघात प्रवेश घेतला व तेथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. १९५३ मध्ये ते धुळे जिल्हा जनसंघाचे अध्यक्ष झाले.

पुढे १९५४ साली नानासाहेब पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले. त्याच काळात नानांची जनसंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली. १९५५ साली नानासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आंदोलनातून आमदारकीचा राजीनामा दिला. १९५७ साली नानासाहेब दिल्लीच्या पार्लमेंट बोर्डावर खासदार म्हणून खानदेशातून मोठ्या मतांनी विजय झाले. त्याच काळात अटलजी सारख्या नेत्यांचा सहवास त्यांना मिळला.

विधानपरिषदेते बारा वर्ष विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी त्यांनी मोठ्या प्रभावीपणे पार पाडली. जनमाणसात विरोधी पक्ष नेता कसा असावा त्याची नियमावली, जबाबदारी, महाराष्ट्रातील जनतेसमोर उभी केली. विशेष करून आदिवासींचे जनतेचे कर्मयोगी म्हणून नाना महाराष्ट्राला परिचित होते. त्यांच्याच काळात विरोधीपक्ष नेत्याला कॅबीनेट मंत्री पदाचा दर्जा व लाल दिव्याची गाडी देण्यात आली.

जनसंघाचा कार्यकर्त्यांचा कारखाना व तरुण युवकांचा, वक्त्यांचा तोफखाना कसा उभा करावा हे नानासाहेब ओळखून होते. १९५७ मध्ये स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील खान्देशातून लोकसभेवर संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामाच्या जनतेच्या चळवळीद्वारे जनसंघाच्या दिवा निशाणी वर निवडून आले. त्याच वेळी महाराष्ट्रातून क्रांतिसिंह नानासाहेब पाटील देखील लोकसभेत सातारा जिल्ह्यातून कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावर विजयी झाले.

संघाच्या देशपातळीवरील पक्षाच्या झेंड्याखाली अटल बिहारी वाजपेयी सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याच्या खांद्याला खांदा लावून नानासाहेबांनी जनसंघ महाराष्ट्रात जनमाणसात उभारला.

देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी सारखे नेते त्या काळात नानासाहेबांचे व अटलजींचे खाजगी सचिव म्हणून काम करीत होते. देशाच्या बारीक-सारीक घडामोडींचे व राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांचे संकलन करण्याचे काम त्या काळात अडवाणी सारखे नेते करीत होते. १९७७ मध्ये नानासाहेब जनसंघाच्या राष्ट्रीय पातळीवर अध्यक्ष झाले. देशपातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

जनता पार्टीच्या निर्मितीतून ओमप्रकाश यांनी त्यांच्याचबरोबर जनता पार्टीच्या निर्मितीसाठी वाटाघाटी केल्या.

१९७८ मध्ये नानासाहेब महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. विरोधी पक्षनेता म्हणून पुन्हा त्यांची नेमणूक करण्यात आली. शरद पवारांच्या पुलोद आघाडीत नानासाहेब उपमुख्यमंत्री (महसूल खाते) म्हणून त्यांनी कारकीर्द अत्यंत पारदर्शी म्हणून यशस्वी ठरवली. १९८४ मध्ये नानासाहेब भा.ज.पा.चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले. १९८९ साली महाराष्ट्रातील एरंडोल मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून विजयी झाले. आमच्या हातेड बु। गावाने त्याच काळात खासदार म्हणून नानांचा नागरी सत्कार ग्रामस्थांच्या वतीने दिमाखदार शाही पद्धतीने घडविण्यात आला.

जनसंघ ते भाजपा अशा प्रतिकूल परिस्थितीत नानासाहेबांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची नवी पिढी उभारण्यात खूप परिश्रम घेतले. खान्देशापासून ते मुंबई, विदर्भ, कोकणापर्यंत तर थेट मराठवाड्याच्या कोपर्‍यापर्यंत कार्यकर्ते ताठ मानेने उभारले.

त्यात स्व. प्रमोदजी महाजन, स्व. हशुजी आडवाणी, आप्पा गोटे, श्रीधर नातू, नितीनजी गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, मोतीरामजी लहाने, गोपाळरावजी पाटील, डॉ.दौलतरावजी आहेर, जयसिंगराव गायकवाड, स्व. गोपीनाथरावजी मुंडे, दिलवरसिंग पाडवी, गोविंदराज चौधरी, प्रल्हादराव पाटील, एकनाथरावजी खडसे, डॉ. बी एस पाटील, राम नाईक, राम कापसे, आण्णाजी जोशी, सुर्यभानजी वहाडणे, ना.स. फरांदे, जगन्नाथ पाटील, जयंतीबेन मेहता, स्व. रामभाऊ म्हाळगी, आण्णा डांगे, हरिभाऊ बागडे, गुणवंतराव सरोदे, राजाभाऊ पवार, रामभाऊ गोडबोले, धरमचंदजी चोरडिया, लखनजी भतवाल, शांताराम बापू करमळकर, राजाभाऊ झरकर, डॉ. अविनाश आचार्य, चंद्रकांतजी मेंडकी असे कितीतरी सवंगडी, मित्रपरिवार पक्षाच्या झेंड्याखाली राज्यपातळीवर स्वतःच्या पायावर उभारले व सत्तेच्या दारी देखील बसविले.

सत्तेसाठी नानांनी तडजोड केली नाही. कौटुंबिक जीवनात नानासाहेब खूप समाधानी होते. मुलगा वारल्यावर सुनेला विधवा न ठेवता पुनर्विवाह करून मराठा समाजात एक नवा आदर्श उभा केला. कर्तबगार नेता म्हणून नानासाहेबांचा उभ्या महाराष्ट्रात लौकिक प्राप्त झाला, असा लौकिक फार थोड्या नेत्यांना मिळालेला आहे. आमच्यासारख्या फाटलेल्या, तुटलेल्या कार्यकर्त्याला समाजात मानाचे स्थान देखील नानासाहेबांनी मिळवून दिलेले आहे हे लिहिणे माझे कर्तव्य मी समजते.

तेजस्वी विचारांचा महान कर्मयोगी खान्देशाचा मातीचा सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला. भा.ज.पा.चा आधारवड, एक मातब्बर लढवय्या नेता, आमचा आधारस्तंभ युती सरकारच्या काळात हातेड बु। सारख्या गावात आमच्यासारख्या फाटलेल्या, तुटलेल्या कार्यकर्त्याला आश्रमशाळा नानासाहेबांच्या शब्दाने मिळालेली आहे. त्या शाळेला स्व.नानासाहेबांचे नाव देण्यात आलेले आहे. शाळेच्या आवारात नानासाहेबांचा पुतळा उभारून त्यांची उतराई होणे, हीच नानांना आदराची खरी श्रद्धांजली ठरेल.

  •  कु. पुजा राजेंद्र सोनवणे हातेड बु। ता. चोपडा, जि. जळगाव

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.