मंत्री ट्रॅफिकमध्ये अडकला आणि पक्षातून बाहेर काढल्याची बातमी सोशल मीडियावरुन समजली…

असं म्हणतात की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कधीकधी पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मंत्रिपदाची संधी मिळते, तर काही जणांना अनेक वर्ष काम करुनही संधीचं दार किलकिलं होत नाही. त्यात राजकारणात पत्ते कसेही फिरतात, अशीही वेळ येऊ शकते की एखाद्या मंत्र्याला थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि हे त्याला समजतं… सोशल मीडियावरुन.

तुम्हाला आश्चर्य वाटत असलं, तरी हे खरंच झालंय. तेही निवडणूक तोंडावर आलेल्या उत्तराखंडमध्ये. भाजपच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणारे हरक सिंह रावत दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी चालले होते आणि रस्त्यात असतानाच त्यांना आपल्याला मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आल्याची आणि पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती समजली.

नेमका काय मॅटर झालाय?

उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री असणारे हरक सिंह आणि उत्तराखंड भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसपूस सुरू होती. आता निवडणूक आल्यात म्हणल्यावर आजी-माजी आणि इच्छूक या सगळ्यांचीच मर्जी सांभाळणं गरजेचं असतं. त्यातही आजींना थोडं जास्त वेटेज मिळतं, पण असं नेहमीच होतं असंही नाही. हरक सिंह रावत हे त्याचं अगदी लेटेस्ट उदाहरण.

झालं असं की, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रावत यांना स्वतःसाठी केदारनाथ, यमकेश्वर आणि डोईवाला या आपल्या आवडत्या मतदार संघांपैकी एक मतदार संघ हवा होता. पण फक्त एका तिकिटावर त्यांचं समाधान होत नव्हतं, त्यांना आपले खास सहकारी आमदार उमेश शर्मा काऊ आणि सून अनुकृती यांच्यासाठी तिकीट हवी होती. भाजप रावत यांना त्यांच्यासाठी तिकिट देईल, मात्र इतर दोन तिकिटांचं गणित बसणं अवघड आहे अशी राज्याच्या राजकारणात चर्चा होती.

त्यामुळे रावत यांनी थेट गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटण्यासाठी दिल्ली गाठली. रावत सांगतात, ‘मी जोशी यांना भेटण्यासाठी चाललो होतो, मात्र मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि मला जरा उशिरा झाला. मी दिल्लीत पोहोचल्यावर सोशल मीडियावर पाहिलं की मला कॅबिनेटमधून आणि पक्षातून काढण्यात आलं आहे. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी भाजपने माझ्याशी साधी चर्चाही केली नाही, ना संवाद साधला. जर मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो नसतो, तर मी ४ वर्षांपूर्वीच भाजपला रामराम केला असता. मला मंत्रीपदातही रस नव्हता, मला फक्त काम करायचं होतं.’

याबाबत माध्यमांशी बोलताना, हरक सिंह रावत यांना रडू कोसळलं. भाजप नेत्यांनी आपल्यावर अन्याय केला आणि ते खोटारडे आहेत असा आरोपही त्यांनी केला. रावत यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

भाजपचं यावर काय म्हणणं आहे?

‘ते आमच्या पक्षात आले आणि त्यांनी विकासाच्या दृष्टीनं जे काही सांगितलं, केलं त्याला आमचा पूर्ण पाठिंबा होता. मात्र आमचा पक्ष घराणेशाहीपासून लांब आणि विकासाच्या मार्गानं चालणारा आहे. त्यांच्या अनेक गोष्टींशी आम्ही असहमत होतो. गेल्या काही दिवसांपासून ते तिकिटांसाठी आमच्यावर दबाव बनवत होते, त्यामुळे पक्षानं हा निर्णय घेतला आहे. भाजप एका पक्षातल्या एकाच व्यक्तीला तिकीट देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे,’ असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं.

आता रावत हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यास काँग्रेसवासी त्यांचं स्वागत कसं करणार आणि त्यांच्या अश्रूंचं मोल जनता मतपेटीत टाकणार का, हे आगामी निवडणुकांमध्ये कळेलच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.