उत्तराखंडच्या त्या १४ बंडखोरांनी भाजपच्या निवडणुकीचे गणितच बिघडवले

उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे. उत्तराखंडमधील एकूण ७० विधानसभा जागांवर एकूण ६३२ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.  डेहराडून जिल्ह्यातून सर्वाधिक ११७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर सर्वात कमी संख्या चंपावत आणि बागेश्वर मतदारसंघातून आहे जिथे प्रत्येकी १४ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

उत्तराखंडमधील निवडणूक जवळ आली आणि तितक्यात भाजपच्या काही उमेदवारांनी मोठा बॉम्ब फोडलाय…थोडक्यात भाजपच्या १४ उमेदवारांनी बंडखोरी करत विविध विधानसभा जागांवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा चंग बांधलाय. 

उत्तराखंडमध्ये मिशन ६० प्लसचे टार्गेट ठेवलेल्या भाजपसाठी हे बंडखोर सर्वात मोठे आव्हान बनले आहे. पण या बंडखोरांबाबत भाजपने अद्याप तरी आशा सोडलेली नाही. बंडखोरांचे मन वळवण्यासाठी पक्षाचे नेते अजूनही प्रयत्न करत आहेत. निवडणुकीपर्यंत बंडखोरांच्या संपर्कात राहणार्‍या बंडखोरांची मनधरणी करण्याचे काम भाजपने आपल्या वरिष्ठ नेत्यांवर सोपवले आहे. मात्र, ज्या बंडखोरांनी नावे मागे घेतले नाही त्यामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते.

काहीच मार्ग निघत नसेल तर शेवटी भाजप पक्ष त्यांच्या या बंडखोर सदस्यनावर कारवाई करू शकतंय, तसेच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते असे देखील सांगितले जातेय.

गेल्या तीन दिवसांपासून भाजपकडून विविध जागांवर बंडखोर वृत्ती घेतलेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. बंडखोरांना सामावून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत आणि केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांना कुमाऊं, माजी मुख्यमंत्री आणि खासदार रमेश पोखरियाल निशंक यांना हरिद्वार, माजी मुख्यमंत्री आणि खासदार तीरथसिंग रावत यांना गढवाल प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली. यासोबतच प्रांताधिकारी, जिल्ह्यांचे प्रभारी मंत्रीही या कामात गुंतले होते.

मोठी कसरत केल्यानंतर पक्षाला ७ उमेदवारांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे.

भाजपच्या या नेत्यांना ४ जागांवर ७ बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले आहे. पक्षाने डॉ. रमेश पोखरियाल निशंक, त्रिवेंद्र सिंह रावत, अजय भट्ट, तीरथसिंग रावत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी केली होती. पक्षाला सर्वात मोठा दिलासा डोईवाला मतदारसंघातून मिळाला आहे. जिथे निशंकने सौरभ थपलियाल, सुभाष भट्ट, राहुल पनवार आणि वीरेंद्र रावत या चार भाजप नेत्यांची नावे मागे घेतली आहेत. संपूर्ण राज्यात भाजपने डोईवाला जागेवर सौरभ थपलियाल, सुभाष भट्ट, राहुल पनवार आणि वीरेंद्र रावत, कालाढुंगी जागेवर माजी सत्ताधारी गजराज सिंह बिश्त, घणसाली जागेवर सोहनलाल खंडेलवाल, पीरन कालियार जागेवर जय भगवान सैनी यांचे मन वळवण्यात यश मिळविले.  या सर्वांनी अर्ज माघार घेण्याच्या तारखेला आपली अर्ज मागे घेतलीत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ३१ जानेवारी २०२२ हा शेवटचा दिवस होता. या तारखेला ७० विधानसभा जागांवर सुमारे ९५ उमेदवारांनी आपली नावे मागे घेतलीत.

अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर देखील ज्यांनी माघार घेतली नाही ते  भाजपचे १४ बंडखोर उमेदवार संपूर्ण निवडणुकीचे समीकरणच बिघडवू शकतात.  

उत्तराखंडमध्ये इतिहास घडवून पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करतंय. मात्र तिकीट वाटपानंतर भाजपमध्ये बहुतांश जागांवर असंतोष दिसून येत आहे. काही ठिकाणी उघड तर काही ठिकाणी पक्षांतर्गत नुकसान झाल्याचा अंदाज बांधला जातोय. बंडखोरांवर मात करणे हे भाजपसमोरील मोठे आव्हान आहे. ज्यामुळे पक्षाचे समीकरण बिघडू शकते. ज्या १४ जागांवर बंडखोर उभे आहेत. ते भाजपच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. 

यापैकी अनेक जागांवर अपक्ष भाजपच्या उमेदवाराला प्रबळ दावेदारी म्हणून अडचणीत आणू शकतात. यासोबतच या बंडखोरांपैकी काही जण २-३ जागा जिंकल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपचे एकंदरीत समीकरणच बिघडत आहे, त्यापैकी १० हून अधिक जागांवर भाजपची स्थिती आधी चांगली होती. मात्र आता बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भाजपची गोची होतांना दिसतेय.

कोण आहेत हे बंडखोर उमेदवार ?

राजकुमार ठुकराल (रुद्रपुर) महावीर रांगड़ (धनोल्टी) टीकाराम मैखुरी (कर्णप्रयाग) धीरेंद्र चौहान (कोटद्वार) वीर सिंह पंवार (धर्मपुर) दिनेश रावत (देहरादून कैंट) दर्शनलाल (घनसाली) जितेंद्र नेगी (डोईवाला) कमलेश भट्ट (चकराता) मनोज कोली (यमुनोत्री) अजय तिवारी (किच्छा) मनोज शाह (भीमताल) पवन चौहान (लालकुंआ) नितिन शर्मा (रुड़की). या जागांपैकी रुद्रपूर, धनौल्टी, कर्णप्रयाग, कोटद्वार, धरमपूर, कँट, घणसाली, डोईवाला, यमुनोत्री, किच्छा, रुरकी या सर्व मतदार संघात भाजपचे बंडखोर चांगल्याच मजबूत स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे भाजप पक्षाचे नुकसान होऊ शकते…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.