मुख्य आर्थिक सल्लागारांचं काम नक्की काय असतंय हे कधी बघितलंय का?

भारत सरकारने व्ही.अनंत नागेश्वरन यांची नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. २०२२चं बजेट सादर करणापूर्वीच भारत सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागारांची (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे.नागेश्वरन यांच्या आधी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. हे तर तुम्हाला माहीत असल्यानं तुमची उजळणी झाली समजा.

तर आता येऊ आपल्या मूळ प्रश्नावर भारताचे मुख्य आर्थिक सल्लगार नेमकं काय काम करतात? भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्यामधील त्यांचे स्थान आणि त्याची भूमिका आधी पाहू.

तर केंद्रीय अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) यांचा मेन काम असतं सरकारला आर्थिक बाबींवर सल्ला देणं. 

आणि हा सल्ला असल्यानं मुख्य आर्थिक सल्लागाराच्या कोणत्या सल्ल्याकडे लक्ष द्यायचं हे पूर्णपणे सरकारवर अवलंबून असतं.

सल्ल्याच्या पलीकडे त्यांचं मेन काम असतंय दरवर्षी सादर केला जाणारा इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण तयार करणे.

जे दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या एक दिवस आधी संसदेत सादर केले जाते.

तसेच, CEA हे आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाचे प्रमुख असतात. माजी CEA अरविंद सुब्रमण्यन यांनी ‘ऑफ कौन्सेल: द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी’ या पुस्तकात नमूद केले आहे की CEA कडे कोणतीही कार्यकारी जबाबदारी नसते. त्याचं स्पष्टपणे परिभाषित केलेले काम म्हणजे वार्षिक आर्थिक सर्वेक्षण तयार करणे हे होय.

आता हे इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण ही काय भानगड आहे?

भारतीय आर्थिक सर्वेक्षण हे वित्त मंत्रालयाचे वार्षिक दस्तऐवज आहे. वित्त मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या एक दिवस आधी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करतो. हे भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली तयार केले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर दस्तऐवज सादर केला जातो. यंदा मात्र सरकारने व्ही.अनंत नागेश्वरन यांची नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती उशिराने झाली असल्यानं यावर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेवर मुख्य आर्थिक सल्लागारचं नाव नसेल.

 बजेट येणाऱ्या वर्षासाठी असतं तर इकॉनॉमिक सर्व्हे गेल्या वर्षाचा असतो. 

हे डॉक्युमेंट गेल्या आर्थिक वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढीचा आढावा घेते, प्रमुख विकास कार्यक्रमांच्या कामगिरीचा सारांश देते आणि सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांवर आणि अल्प ते मध्यम मुदतीच्या अर्थव्यवस्थेच्या संभावनांवर प्रकाश टाकते.
मुख्य आर्थिक सल्लगारांची नियुक्ती करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेय.

भारताचे पहिले मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते?

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जे जे अंजारिया  ज्यांनी भारतीय कृषी अर्थशास्त्रावरील ‘द इंडियन रुरल प्रॉब्लेम’ या फेमस पुस्तकाचे सह-लेखन केले, ते भारताचे पहिले मुख्य आर्थिक सल्लागार होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात ते १९५६ ते १९६१ या काळात या पदावर होते.

मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची निवड करतात?

जे.जे.अंजारिया, आय.जी. पटेल. कौशिक बसू, मनमोहन सिंग आणि अशा अनेक अर्थतज्ञांनी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम पहिले आहे. पण अर्थतज्ञ असण्याबरोबरच या सल्लागाराचे सरकारच्या धोरणांशी मिळते जुळते विचार असतात. व्ही.अनंत नागेश्वरन यांनी ही मोदी सरकारने केलेल्या डीमॉनिटायझेशनमुळे डिजिटायझेशन वाढलं, अर्थव्यवस्थेचं फॉर्मलायझेशन झालं असं सरकारच्या बाजूची मतं नोंदवली होती.

त्यामुळे कोविडनंतर घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा पटरीवर आणण्यास नागेश्वरन कसे मदत करतात हे येणाऱ्या दिवसांत कळेलच.   

हे ही वाचा भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.