भारताचे राष्ट्रपती एकेकाळी आयर्लंडच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढले होते…

भारताच्या राजकारणात अनेक महान व्यक्ती होऊन गेले ज्यांच्या कार्यामुळे ते कायमचे लक्षात राहिले. राष्ट्रपती पद हे भारताच्या राजकारणातलं प्रथम नागरिक असणारं पद. १९६९ साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा आजचा किस्सा ज्यात इंदिरा गांधी यांनी मोठी भूमिका बजावली होती आणि एक अपक्ष उमेदवार असलेले व्ही व्ही गिरी भारताचे राष्ट्रपती बनले होते.

सगळ्यात अगोदर व्ही व्ही गिरी कोण होते आणि त्यांची मजल थेट राष्ट्रपती पदापर्यंत कशी गेली यावर एक नजर टाकूया. १० ऑगस्ट १८९४ साली ओडिशामध्ये व्ही व्ही गिरी यांचा जन्म झाला. व्ही व्ही गिरी यांचं पूर्ण नाव होतं वराहगिरी व्यंकटगिरी. व्ही व्ही गिरीचें वडील वकील होते आणि तिथले नेते सुद्धा होते. सुरवातीचं शिक्षण झाल्यावर व्ही व्ही गिरी हे थेट डब्लिन युनिव्हर्सिटीला कायद्याच्या शिक्षणासाठी आयर्लंडला गेले.

आयर्लंडला शिकत असताना तिथे आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरु होता. व्ही व्ही गिरी तिथे सिन फिन आंदोलनात सामील झाले यामुळे त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं. १९१६ साली व्ही व्ही गिरी भारतात आले आणि श्रमिक संघटनेशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. रेल्वे कामगारांच्या सोयीसाठी व्ही व्ही गिरींनी बंगाल नागपूर रेल्वे असोसिएशनची स्थापना केली.

व्ही व्ही गिरी हे जागतिक दृष्टिकोन बाळगणारे होते. देश आणि विदेशातल्या राजकारणावर त्यांची नजर होती. गंभीर स्वभाव आणि त्या बरोबरच एक उत्तम वक्ता म्हणून ते प्रसिद्ध होते.

कामगार आणि श्रमिक लोकांसाठी भरपूर काम व्ही व्ही गिरी करत होते. श्रमिक आणि कामगारांसाठी काम करतानाच व्ही व्ही गिरी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातही सहभागी झाले होते.

व्ही व्ही गिरी हे अखिल भारतीय रेल्वे महासंघ आणि अखिल भारतीय व्यापारी महासंघ [ काँग्रेस ] चे अध्यक्ष होते. १९३७ साली निवडणुकीच्या मैदानात त्यांना विजय मिळाला. १९५२ साली लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत गेले. १९५४ पर्यंत ते मंत्री म्हणून कार्यरत होते. उत्तर प्रदेश, केरळ, म्हैसूर अशा राज्यांचे ते राज्यपाल सुद्धा होते.

१९६७ साली व्ही व्ही गिरी हे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या काळात उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. पण झाकीर हुसेन यांचं निधन झाल्यावर राष्ट्रपती पदाची जागा रिकामी झाली तेव्हा कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून व्ही व्ही गिरी यांची निवड करण्यात आली. 

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसच्या उमेदवार होते नीलम संजीव रेड्डी. व्ही व्ही गिरी हे तेव्हा कार्यवाहक होते म्हणून त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अशा वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्ही व्ही गिरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत व्ही व्ही गिरी यांनी सहजरित्या बाजी मारली आणि ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले.

गिरी यांची निवड झाल्यावर मतदारांना प्रलोभन दाखवून हि निवडणूक जिंकण्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते तेव्हा स्वतः कोर्टात जाऊन व्ही व्ही गिरींनी साक्ष देत स्वतःला निर्दोष घोषित केलं होतं. कोर्टाने व्ही व्ही गिरींना निर्दोष मुक्त केलं. हि एक ऐतिहासिक घटना होती कि ज्यात राष्ट्र्पती कोर्टात उभे होते.

पण व्ही व्ही गिरी हे एक अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व होते. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठी कामगिरी आणि कामगारांसाठी केलेलं कार्य यामुळे भारत सरकारद्वारे व्ही व्ही गिरींना भारतरत्न देण्यात आला. व्ही व्ही गिरी यांनी औद्योगिक संबंध आणि श्रमिकोंकी समस्या अशा दोन पुस्तकांचं लेखन केलं. २३ जून १९८० मध्ये व्ही व्ही गिरी यांचं निधन झालं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.