लसीकरणाच्या आकडेवारीत भारत अमेरिकेच्या पुढे असला तरी टक्केवारीत बराचं मागे आहे…

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अगदी केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एक ट्विट करत देशातील लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं. त्यानंतर भाजपच्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी आणि नेत्यांनी या ट्विटला रिट्विट करत, भारताच्या लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं.

या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

भारताची लसीकरण मोहीम आता गती घेत आहे. या सगळ्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांचे अभिनंदन. आम्ही सगळ्यांना आणि मोफत लस देण्यासाठी कटीबद्ध आहोत.

आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार,

भारताची लसीकरण मोहीम हि जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. या अभियानाला सुरुवात होऊन आता पर्यंत साडेपाच महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. या काळात संपूर्ण भारतात आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाख पेक्षा जास्त नागरिकांना लस दिली गेली आहे.

हा आकडा अमेरिकेपेक्षा जास्त आहे. 

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये भारताच्या एक महिना आधी म्हणजे अमेरिकेत १४ डिसेंबर तर इंग्लंडमध्ये ७ डिसेंबर रोजी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र तरीही तिथं आता पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊ शकलेलं नाही. अमेरिकेमध्ये ३२ कोटी ३३ लाख आणि इंग्लंडमध्ये ७ कोटी ६७ लाख जणांचं लसीकरण होऊ शकलेलं आहे.

भारताने केवळ अमेरिका आणि इंग्लंडलाच नाही तर इटली, जर्मनी आणि फ्रांस यासारख्या विकसित देशांना देखील मागे टाकलं आहे.

लसीकरणाच्या तुटवड्यामध्ये देखील लसीकरण अभियानात गती मिळवली आहे…

देशात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान जेव्हा बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती त्याचवेळी लसींचा देखील तुटवडा जाणवत होता. अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद ठेवायला लागल्याच चित्र बघायला मिळालं होतं. शिवाय १ मे पासून राज्यात १८ वर्षावरील लसीकरणाला मान्यता दिली तेव्हा देखील अनेक राज्यांनी लसीकरणाला नकार दिला होता.

अशा परिस्थितीमध्ये देखील भारताने वेगानं लसीकरण करत ३२ कोटी ३६ लाख लसीकरणाचा आकडा गाठला आहे. इतकचं नाही तर अमेरिकेला हा आकडा गाठण्यासाठी १९६ दिवसांचा वेळ लागला होता तर, भारताने १६३ दिवसांमध्ये हे टार्गेट पूर्ण केलं आहे, असा देखील आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे.

पहिला आणि दुसरा डोस मिळालेल्यांची आकडेवारी कशी आहे ?

भारतात एकूण ३२ कोटी ३६ लाख जणांचं लसीकरण झालं आहे. यात २६ कोटी ७० लाख जणांना पहिला डोस तर ५ कोटी ७० लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

तर अमेरिकेमध्ये एकूण ३२ कोटी २२ लाख जणांचं लसीकरण झालं आहे. यात १७ कोटी ९२ लाख जणांना पहिला तर १५ कोटी ३० लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या डोसची तुलना केल्यास अमेरिकेच्या तुलनेत भारतात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ९ कोटीने जास्त आहे. मात्र दुसरा मिळालेल्यांची संख्या भारतात अमेरिकेपेक्षा १० कोटीने कमी आहे.  

तर इंग्लंडमध्ये एकूण ६ कोटी ४० लाख जणांचं लसीकरण झालं आहे. यात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ३ कोटी ६९ लाख ४४ हजार अशी आहे तर दुसरा डोस मिळालेल्यांची संख्या २ कोटी ७१ लाख ४४ हजार अशी आहे.

सगळ्यात पुढे चीन आहे…

या जगातील सगळ्या देशांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत चीन पुढे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण तिथं एव्हाना ११९ कोटी लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे. तर २२ कोटी लोकसंख्येला दुसरा डोस मिळालेला आहे.

एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये बघितल्यास अद्याप भारत बराच मागे…

या सगळ्यानंतर आता लोकसंख्येच्या बाबतीतून तुलना केल्यास भारत अद्याप खूप मागे असलेला दिसून येतो.

कारण भारताची लोकसंख्या अमेरिका आणि इतर देशांच्या बरीच जास्त आहे. ब्लूमबर्गच्या वॅक्सीन ट्रॅकरनुसार, 

अमेरिकेमध्ये आतापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे ५४ टक्के लोकसंख्येला पहिला डोस मिळालेला आहे. तर जवळपास ४६ टक्के लोकसंख्येला दुसरा डोस देखील मिळाला आहे. म्हणजे एकूण लसीकरणाची टक्केवारी ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

इंग्लंडमध्ये देखील जरी भारताच्या तुलनेत लसीकरण कमी झालेलं असलं तरी तिथल्या लोकसंख्येच्या तुलनेत ६६.३ टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर ४८.६ टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. तर एकूण लसीकरणाची टक्केवारी ही ५७.५ टक्के एवढी आहे. 

त्याचवेळी भारतात आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १९.४ टक्के लोकांनाच पहिला डोस मिळाला आहे. तर केवळ ४.१ टक्के लोकांनाच दुसरा डोस मिळू शकला आहे. तर एकूण लोकसंख्येच्या ११.८ टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.

म्हणजे आता या तीन देशांसोबत एकूण लोकसंख्येत तुलना करायची म्हंटली तर अमेरिकेत ५०.५ टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे, तर इंग्लंडमध्ये ५७.५ टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. तर त्याचवेळी भारतात ११.८ टक्के लोकांचं लसीकरण होऊ शकलं आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.