लस घेतली नाहीए ….. आता ५०० रुपयांची पावती फाडावी लागणारे

सुरवातीला जेव्हा लस आली तेव्हा सगळ्यांनी अगदी रांगा लावून लस घेतली. मात्र जशी लाट उतरली तशी सगळे पुन्हा निवांत. काहींनी तर पहिला डोसपण अजून घेतला नाहीए.  मला काय हुतंय ? हे लसीबीसचं काय खरं नसतंय असे म्हणत काहीजण लस नाही घेतयंत. त्याचं सायन्स त्यांनाच मुबारक. मात्र ही लस घेतली पाहिजे कि नाही याच्या पलीकडं एक जनता आहे.  या जनतेनं एक लस घेतलीय मात्र दुसरा  घ्यायला जातच नाहीए. बाहेर मात्र छाती फुगवून सांगतायत लस घेतलीय म्हणून.

लसीचे दोन डोस घेतले तरच फायदा आहे असं डॉक्टर हजारवेळा सांगून झालेत.

पण ऐकतं कोण?  यांच्यामुळेच ती करोनाची कॉलर ट्यून ऐकावी लागतेय बहुतेक.

आता औरंगाबाद महानगरपालिकेने लस न घेतलेल्या आणि फक्त एकच डोस घेणाऱ्यांकडून पावत्या फाडणार असल्याचं म्हटलंय.

१५ डिसेंबर म्हणजे बुधवारपासून अश्या नागरिकांकडून औरंगाबाद महापालिका ५०० रुपये दंड वसूल करणार आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी हा आदेश काढलाय.दंडामधील जमा झालेली ५० टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन व ५० टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार असल्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.  महानगर पालिकेचे मार्शल हा फाईन कलेक्ट करणार आहेत.

औरंगाबादेत अधिकृत आकडेवारीनुसार  जिल्ह्यातील 32,24,677  लोकसंख्येपैकी 22 नोव्हेंबरपर्यंत 64.36% लोकांना पहिला डोस आणि 27.78% लोकांना दुसरा डोस घेतला होता. 

त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी  जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते.  यामुळेच आयुक्तांनी हे फर्मान काढल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वीही लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना पेट्रोल, रेशन, शासकीय सुविधा, किराणा सामान यासह अनेक सुविधा घेता येणार नाही, असाही आदेश औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढला होता. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी झपाट्याने वाढली असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेला होतं. मात्र याचा नागरिकांना खूप त्रास झाला होता.

मात्र आता महानगर पालिकेच्या या निर्णयावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. जरी लस घेणं हे विज्ञानाला धरून असलं तरी लस घेण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही अस मत नागरिक नोंदवत आहेत.  त्याऐवजी नागरिकांना लसीकरणाचं महत्व पटवून द्यावी, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी  अशी मागणी नागरिक करत आहेत.

याआधी जेव्हा मास्क न घातल्याबद्दल फाईन घेत होते तेव्हा मार्शल्सनि अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले होते.

बऱ्याच ठिकाणी आधीच लॉकडाऊनमुळ चिडलेल्या लोकांनी मार्शल्सना फाटकावले देखील होते. त्यामुळं पुन्हा असच काहीतरी घडू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लस न घेणाऱ्यांमध्ये लसीबद्दल असणारे अनेक गैरसमज हि कारणेभूत असल्याचं डॉक्टर सांगतात.

विशेषतः पहिल्या डोस नंतर आलेल्या थंडी तापामुळं नागरिक दूसरा डोस घेत नसल्याचं सांगितलं जातंय. मात्र हि भीती दूर करण्याऐवजी प्रशासन नवीनच भीती घालतंय. 

लसीकरणासारख्या लोकांच्या सद् विवेक बुद्धीवर सोडण्याच्या विषयांतही नागरिकांवर जबरदस्ती करून सरकारनं सांगितलंय म्ह्णून टार्गेट पूर्ण करण्याची पद्धतीवर आता सडकून टीका होतेय. भारतासारख्या लोकशाही देशात प्रशासनच्या अशा मोघलाई फर्मानविरुद्धचा राग नागरिक मतपेटीतून व्यक्त करू शकतात असे जानकार सांगतात. त्यामुळे राजकीय वर्गातूनही याविरोधात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 

बाकी त्यांच्या प्रतिक्रियांचं राहू द्या ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी बघा जरा लवकर घ्यायची होतेय का ती कॉलर ट्यून ऐकून खरंच कान पिकलेत.

 

English Summary: As per the directions of District Collector Sunil Chavan, the order has been issued by NMC Administrator Astik Kumar Pandey. The marshals of the corporation will collect the fine.

 

Vaccine update :Aurangabad municipality passed the resolution to fine the people who are not vaccinated.

 

Leave A Reply

Your email address will not be published.