गाड्या नाय पोहोचत म्हणून लोड नाही, महाराष्ट्रानं ड्रोननं लशी धाडल्यात

फक्त आपला देशच नाही, तर कोविड-१९ नं सगळ्या जगाच्या पुंग्या टाईट केल्या होत्या. मृत्यूचे आकडे, आर्थिक नुकसान आणि निर्बंध या सगळ्यातून अजूनही जग सावरतंय. त्यात आता ओमायक्रॉन व्हेरिएंटनं खळबळ केली आणि पुन्हा सगळ्या जगाचं टेन्शन वाढलं.

आता शास्त्रज्ञ लोकं एवढं रात्रंदिवस प्रयोगशाळेत मजबूत कष्ट करत असतात, त्यामागं कायतर कारण असतंय की. ते कोविडच्या पहिल्या व्हेरिएंटपासून ते आता आलेल्या ओमायक्रॉनपर्यंत सगळ्यावर रिसर्च करत असतात. कुठला व्हायरस किती डेंजर आहे, कोण जास्त किडे करु शकतोय, कुणाचा लोड घ्यायचा नाही असं सगळं. सगळे शास्त्रज्ञ एक गोष्ट मात्र मनापासून सांगतायत, की बाबांनो लस घ्या.

आपल्याकडची लोकं पडली वाढीव. लस कशी घेता येईल याच्या ऐवजी लस का घेणार नाही यांची कारण यांच्याकडे तयार. यात एक लय व्हॅलिड कारण पण होतं, ‘आमच्याकडचा भाग इतका डोंगराळ आणि दुर्गम आहे, की इथं गाड्याच येत नाहीत. मग लस कशी येणार?’

प्रश्न तसा हार्ड होता, पण सोल्युशनही तितकंच हार्ड निघालं-

राज्यातल्या पालघर जिल्ह्यातला जव्हार, मोखाडा या भागांमध्ये अजूनही पुरेशी वाहनव्यवस्था नसल्यानं तिथं लशींचे डोस पोहचवताना अडचण येणं स्वाभाविक होतं. यामुळं तिथल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत होताच, पण लसीकरण मोहिमेतही खंड पडत होता.

त्यामुळं राज्याच्या आरोग्य विभागानं जव्हारमध्ये लशींचे डोस पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचं ठरवलं. ‘ब्लू इन्फिनिटी’ आणि आयआयएफएल फाऊंडेशन यांच्या सहकार्यानं त्यांनी हा प्रयोग केला. जव्हारमधल्या राजीव गांधी स्टेडियमवर या प्रयोगाला सुरुवात झाली.

तिथून १८ किलोमीटर अंतरावर झाप प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात लशीचे ३०० डोस पाठवण्याचं लक्ष्य आरोग्य विभागाचं होतं. राजीव गांधी स्टेडियम ते झाप हे अंतर गाडीनं पार करायला साधारण एक तास लागतो. ड्रोननं मात्र हे अंतर फक्त ९ मिनिटांत गाठलं आणि लशी एकदम पद्धतशीर पोहोचवल्याही.

आता लशीचे ३०० डोस हे काही हलकेफुलके नसतात, पण हे ड्रोनही तगडे आहेत. हे ड्रोन पाच किलो वजन २५ किलोमीटर पर्यंत वाहून नेऊ शकतात. यामुळे वेळेची बचत तर होत आहेच, पण दुर्गम भागातही लसी पोहोचवता येतात.

आता जर लसी जाऊ शकतायत, तर इतर आरोग्यसेवेशी निगडित गोष्टीही जाणार की. त्यामुळे पुढच्या काळात औषधं, प्रत्यारोपणासाठी लागणारे अवयव, रक्त, अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या गोष्टी झटपट पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर होईल अशी आशा आहे.

तेलंगणातही झाला प्रयोग

महाराष्ट्रासोबतच तेलंगणामध्येही लशीचे डोस पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करता येईल अशी परवानगी मिळाली होती. मात्र, तेलंगणामध्ये ड्रोननं फक्त दोन किलो वजन पाच किलोमीटर पर्यंत नेलं. जव्हारमध्ये मात्र पाच किलो वजन २५ किलोमीटरपर्यंत नेलं.

थोडक्यात काय, तर प्रॉब्लेम कितीही हार्ड असो, महाराष्ट्राकडे सोल्यूशन असतंय हे फिक्स!

हे ही वाच भिडू:

Webtitle: Vaccine update : Maharashtra government used drone to deliver vaccine in remote area.

Leave A Reply

Your email address will not be published.