१०० वर्षांचा वाडीलाल, ज्याची जाहिरात उपवासाला चालणारे आईस्क्रीम अशी केली होती.

आपल्या लहानपणी आईस्क्रीम म्हणजे शाळेबाहेर मिळणारा गाड्यावरचा गोळा, उन्हाळ सुट्टीत मिळणारे कांडी वाले आईस्क्रीम, बागेला गेलो तर कोनातल आईस्क्रीम बस्स. तेव्हा नॅचरल, बस्किन रॉबिन, हवमोर वगैरे ब्रँड नव्हते.

अगदी काही स्पेशल बड्डे अनिव्हर्सरी वगैरे ओकेजन असला तर एकच ऑप्शन असायचा,

वाडीलाल आईस्क्रीम

साधारण शंभर वर्षांपूर्वी वाडीलाल गांधी नावाचे सद्गृहस्थ अहमदाबादमध्ये सोडा विकायचे. त्यांच्याकडे कोठी म्हणून एक लाकडी मशीन होतं. त्यात ते बर्फ आणि दूध एकत्र हलवून आईस्क्रीम बनवायचे. अनेक लहान थोरांना हे आईस्क्रीम आवडायचं.

आपलं आईस्क्रीम एवढं फेमस आहे ते बघून वाडीलाल यांच्या मुलांनी रणचोडदास गांधी यांनी एक छोटं आईस्क्रीमच दुकान सुरू केलं. वाडीलाल सोडा फाऊंटन.

our story home min

ते वर्ष होत १९२६.

त्याच वर्षी गांधी बंधूनी खास जर्मनीमधून आईस्क्रीम व्हेंडींग मशीन आणलं. मशीन फॉरेनचं होत पण वाडीलालची खास चव बदलली नव्हती. काही दिवसातच एका ची चार दुकाने झाली.

वाडीलालवाल्या गांधींना फक्त एक आईस्क्रीम विकणारे म्हणून राहायचं नव्हतं तर भारतातला आईस्कीममधला सगळ्यात मोठा ब्रँड बनायचं होतं.

तोवर संपूर्ण अहमदाबाद मध्ये त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली होती. हळूहळू संपूर्ण गुजरात ताब्यात घ्यायचा होता. यासाठी मार्केटिंग करणे गरजेचे होते.

वाडीलालची पहिली जाहिरात होती, उपवासाला चालणारे आईस्क्रीम.

गुजरात हे कर्मठ लोकांचा राज्य. तिथले बहुतांश लोक शुद्ध शाकाहारी. देवधर्म उपासतापास पाळणारे. पण हे आईस्क्रीम त्यांच्या धार्मिक भावनेच्या आड येत नाही, त्यात अंडी नसते ही जाहिरात लोकांना आवडली.

धंद्याच गणित कळलेल्या गांधींनी या आईस्क्रीमला स्वातंत्र्यलढ्यातल्या स्वदेशीच्या चळवळीशी जोडलं.

अनेक जण दुरहून खास वाडीलाल आईस्क्रीम खाण्यासाठी येऊ लागले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले तोवर वाडीलालची तिसरी पिढी या धंद्यात आली होती. त्यांच्या रामचंद्र गांधी यांनी कसाटा हे नवीन आईस्क्रीम बाजारात आणलं.

१९५० साली तयार झालेलं कसाटा आजही वाडीलालची ओळख आहे.

आईस्क्रीम जगात हायफाय इंग्लिश नावाचं फॅड असताना वाडीलाल या गुज्जू नावाच्या आईस्क्रीमने स्वतःचा ब्रँड तयार केला.

वाडीलाल फक्त गुजरातचा नाही तर संपूर्ण भारताचा पहिला आईस्क्रीम ब्रँड बनला.

साधारण ऐंशीच्या दशकात आईस्क्रीममधील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या. त्यांनी इथलं मार्केट काबीज करण्यासाठी वाडीलाल भरमसाठ किंमतीत विकत घेण्याची तयारी दाखवली.

पण स्वतःवर विश्वास असलेल्या गांधी कुटुंबाने वाडीलाल विकण्यास नकार दिला.

आणि आश्चर्य म्हणजे नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आल्यानंतर जिथे भारतातले काही उद्योग परदेशी कंपन्याच्या स्पर्धेत मागे पडले तिथे वाडीलाल सारख्या गुजू नावाच्या आईस्क्रीम पुढे परदेशी आईस्क्रीम लटलट कापत होते.

काळानुसार वाडीलालने स्वतःमध्ये बदल केले. पण क्वालिटी शंभर वर्षांपूर्वी होती तीच कायम राखली.

आजही अनेक हायफाय ब्रँडच्या आईस्क्रीममध्ये वाडीलाल स्वतःची ओळख राखून आहे. बरेच उतारचढाव येऊनही त्यांचा कारभार शेकडो कोटींचा बनला आहे,।

आजही महागातला महाग आईस्क्रीम खाण्याची ऐपत असणारे कित्येकजण आपली लहानपणाची सवय म्हणून मुद्दामहून वाडीलालचा कप आणून खातात व आपलं साधं निरागस लहानपण काही क्षणासाठी का असेना परत जगून घेतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.