वडनगरला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या अस्थायी लिस्टमध्ये स्थान देण्यामागे हा इतिहास आहे

युनेस्कोने नुकत्याच जाहीर केलेल्या वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या अस्थायी यादीमध्ये भारतातील ३ ठिकाणांचा समावेश केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव वडनगर, गुजरातच्या मोढेरा येथे असलेलं सूर्य मंदिर आणि त्रिपुराच्या उनाकोटी दगडी मुर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

२० डिसेंबर रोजी सांस्कृतिक मंत्रालयाने ट्विट करून या तीनही साईट्सची युनेस्कोच्या अस्थाई यादीत नोंद झाल्याची माहिती दिली होती. 

 

भारतातील या तीन ठिकाणांचं यूनेस्कोच्या यादीत नाव आल्यामुळे भारताच्या सांस्कृतिक आणि पुरातात्विक वारशाला जागतिक दर्जा मिळाला आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव असलेल्या वडनगरला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळण्यामागे मोठा इतिहास दडला आहे.

कारण वडनगर आजही लोकवस्ती असलेलं निव्वळ शे-दोनशे नाही तर तब्बल २७०० वर्ष जुनं जिवंत शहर आहे.

२०१४ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या वेळेस त्यांनी वडनगरला भेट दिली होती. या भेटीत नरेंद्र मोदींनी शी जिनपिंग यांना वडनगर बौद्ध धर्माच्या प्रमुख केंद्रांमध्ये किती महत्वाचा होता याची माहिती दिली होती. त्यानंतर २०१५ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी शी जिनपिंग यांना वडनगरातील खोदकामात मिळालेल्या बौद्ध वस्तूंची चित्रे दाखवली होती.

कारण इसवी सन पूर्व ६२७ ते ६४३ या काळात भारतभेटीवर आलेला चिनी प्रवासी ह्युआन सांग यांनी वडनगरला भेट दिली होती. 

ह्युआन सांगने वडनगरचा उल्लेख आनंदनगर असा केला होता. आनंदनगरमध्ये १ हजार बौद्ध भिक्षु असलेले १० मठ होते तर १ हजारहुन कमी भिक्खू असलेले १० मठ आहेत. या मठांमध्ये बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाची शिकावं दिली जाते, असा उल्लेख ह्युआन सांगने केला होता. अलीकडच्या खोदकामांमध्ये या बौद्ध मठांचे अवशेष वडनगरमध्ये सापडलेले आहेत. 

परंतु वडनगरचा इतिहास निव्वळ बौद्ध काळापुरता जुना नाही तर कालिबंगन आणि लोथलमध्ये अस्तित्वात असलेल्या हडप्पा संस्कृतीच्या काळात देखील हे शहर अस्तित्वात होते असं सांगितलं जातं. 

वडनगरमध्ये झालेल्या खोदकामात संशोधकांना  घेतलेल्या स्त्रीची चिकन मातीची मूर्ती सापडली आहे, तसेच ग्रीसचा राजा अपॉलोडोटस दुसरा याची इसवी सन पूर्व ८५ मधली मुद्रा सापडली आहे. यासोबत सिलिंग व्हॅलेन्टिनियनची छाप असलेलं  नाणं देखील सापडलं आहे जे इसवी सन ३६४-३६७ मधलं आहे. या पुराव्यांमुळे संशोधकांनी वडनगरचा व्यापारी संबंध रोमशी असल्याचं सांगितलं आहे. 

भारतीय पुरातत्व खात्याने वडनगरची तुलना भारत आणि जगातील प्राचीन शहरांशी केली आहे.

जगातील सुरुवातीच्या मानवी समाजाने वसवलेली जी शहरे आजही अस्तित्वात आहेत त्यात मथुरा, वाराणसी, उज्जैन, पाटणा, इराणमधील मसूलेह, चीनमधील क्वानझोऊ आणि तुर्कीमधील बेपाझारी शहरांप्रमाणे वडनगर देखील एक प्राचीन धार्मिक आणि व्यापारी शहर होतं असं एएसआयने सांगितलं आहे.

वडनगरमध्ये बौद्ध काळासोबतच १२ व्या शतकातील सोळंकी साम्राज्याच्या काळातील तोरणांची जोडी आजही अस्तित्वात आहे. हे दोन्ही एकसारखे तोरण लाल आणि पिवळ्या वालुकामय दगडात बांधण्यात आले असून ते ४० फूट उंच आहेत. शहराच्या बाहेर असलेल्या या तोरणांना युद्धातील विजय साजरा करण्यासाठी बांधण्यात आलं होतं. सध्या अस्तित्वात असलेल्या शहराला ६ दरवाजे आहेत.

वडनगरला प्राचीन काळात आनंदपूर, अनंतनगर, वृद्धनगर, नगर अशा नावाने ओळखत असल्याचे पुरावे आढळतात. जवळपास २ हजार ७०० वर्ष मानवी वस्ती असलेल्या या शहराचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये देखील आढळतो.

यासोबतच भारतातील सर्वात पहिले संगीत आणि नृत्य शिकवणारे महाविद्यालय देखील वडनगरमध्ये होते.

१६ व्या शतकात वडनगरमध्ये ताना आणि रीरी नावाच्या दोन बहिणी राहत होत्या ज्या त्या काळातील प्रसिद्ध नृत्यांगना होत्या. त्यांनी या महाविद्यालयाची स्थापन केली होती. ही गोष्ट जेव्हा अकबराला कळली तेव्हा त्याने दोन्ही बहिणींना मुघल दरबारात गाणं गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रण दिलं होतं, पण हे त्यांच्या प्रथेच्या विरोधात असल्यामुळे दोन्ही बहिणींनी हा प्रस्ताव नाकारला आणि स्वतःचं बलिदान दिलं.

वडनगरमधील पहिलं संशोधन १९५३-५४ मध्ये झालं होतं. २०१४ मध्ये भारतीय पुरातत्व खात्याने घासकोल, दरबारगड आणि बडी गरबानो शेरी या ठिकाणी उत्खनन केलं होतं. तर २००८-२००९ च्या उत्खननात बौद्ध मठांचे अवशेष आढळले होते. २००८ मध्ये ही साईट राज्य पुरातत्व खात्याने स्वतःच्या हात घेतली आणि संशोधन सुरु केलं. 

या वेगवगेळ्या पुराव्यांमुळे वडनगर शहर बौद्ध काळापासून बडोद्याच्या गायकवाडांच्या काळापर्यंत वडनगरमध्ये कसा बदल होत गेला याच्या खाणाखुणा सापडतात. आता युनेस्कोने फक्त या तीन ठिकाणांचा अस्थायी यादीत समावेश केला आहे. यानंतर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या ठिकाणांना समाविष्ट करण्यासाठी पुढची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

आता शेवटचा टप्प्यात पोहोचलेली ही मानांकनाची प्रक्रिया सुरुवातीपासून बरीच किचकट असते.

  • युनेस्कोच्या अर्बन लँडस्केप सिटी प्रोग्रामअंतर्गत ऐतिहासिक महत्व असणाऱ्या शहरांना वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जा दिला जातो.
  • परंतु हा दर्जा मिळवण्यासाठी सर्वात आधी सरकारला यूनेस्कोकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.
  • हा प्रस्ताव सादर करण्यासाठी काही कठोर अटी आहेत.
  • तसेच ही प्रक्रिया अतिशय खार्चिक सुद्धा आहे.
  • यात शहरात किती ऐतिहासिक वास्तू होत्या आणि सध्या किती आहेत याची सर्व माहिती द्यावी लागते.
  • या वास्तू सध्या कोणत्या स्थितीत आहेत तसेच यांच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न करण्यात येत आहेत याचा सुद्धा तपशील सादर करावा लागतो.
  • यात सर्वात प्रथम राज्य सरकारच्या संबंधीत मंत्रालयाकडून किंवा विभागाकडून याचा सर्वे केला जातो आणि त्याचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व खात्याकडे सादर करावा लागतो.

संपूर्ण तपशील आणि ऐतिहासिक वास्तूंची परिस्थिती तपासल्यानंतर भारतीय पुरातत्व खात्याकडून युनेस्कोकडे प्रस्ताव सादर केला जातो. त्यानंतर युनेस्कोची टीम त्या साईटवर येऊन अभ्यास करते आणि शेवटी तिला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला जातो. 

वडनगर शहराला हा दर्जा मिळाला तर राज्याच्या पर्यटनात वाढ होऊन उत्पन्नात भर तर पडेलच, परंतु या शहरातील वास्तूंच्या संवर्धनासाठी यूनेस्को आणि जागतिक संघटनांकडून निधी सुद्धा मिळेल. जागतिक वारसा स्थळासाठी दरवर्षी ४ दशलक्ष डॉलर म्हणजेच ३२.६२ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीमधून वास्तूंचं संवर्धन करण्यात येतं.

वडनगरला वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जा मिळण्यासाठी फक्त शेवटची स्टेप उरलेली आहे. जर यात सगळं काही व्यवस्थित असल्याचं सिद्ध झालं तर वडनगर हे अहमदाबाद, ग्वालियर आणि ओरछा नंतर भारतातील चौथं वर्ल्ड हेरिटेज शहर ठरेल. 

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.