“वाघ-बकरी” हे चहाला नाव ठेवण्यामागे जातीवाद संपवण्याचा उद्देश होता…

वाघ-बकरी हे काय नाव झालं काय?

मार्केटमध्ये GS चहा, मगदूम चहा, सोसायची चहा अशी नावे असताना वाघ-बकरी नावाचा देखील ब्रॅण्ड होता. आजही दिमाखात हा ब्रॅण्ड उभा आहे.

गावाचं उदाहरणं कशाला सांगा आम्ही आमचचं उदाहरणं देतो. 

झालं अस की २०१७ च्या डिसेंबर मध्ये आपण पोर्टल सुरू कराव असा विचार नुकतच जर्नेलिझम झालेल्या आमच्या भिडू गॅंगच्या डोक्यात आला. पोर्टलवरून काय सांगायचं हे स्पष्ट होतं पण नाव सुचत नव्हतं. अशावेळी माणसं मोठ्या लोकांकडे कौल मागायला जातात.

आमचे मार्गदर्शन लेखक अरविंद जगताप यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी आम्हाला बोलभिडू हे नाव सुचवलं. 

आत्ता बोलभिडू का? तर साहजिक आहे. हे नव्या भिडूंच व्यासपीठ आहे. इथे सगळ्यांनी बोलावं अस अपेक्षित असतय. bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर राज्यभरातले भिडू लोक आम्हाला लेख पाठवत असतात. त्यातूनच हे भिडू बोलतात. 

असो तर नावाचं गणित हे अस असतय.

लय डिप विचार कराय लागतो बाबा. पण वाघ-बकरी नावाचं गणित कधी आम्हाला कळालं नाही. चहाच्या ब्रॅण्डला कोण वाघ-बकरी नाव देत का? या प्रश्नाचा आम्ही शोध घेण्यास सुरवात केली आणि खतरनाक इतिहास समोर आला. 

तर या गोष्टीची सुरवात होते १८९२ सालात.

त्या काळात एका गुजराती माणसाने दक्षिण आफ्रिकेत आपला व्यवसाय सुरू केलेला आणि त्यांच नाव महात्मा गांधी नव्हतं. या गुजराती माणसाचं नाव होतं, नरदास देसाई. माणूस पैशाने बक्कळ श्रीमंत होता. त्या काळात ५०० एकरांचा चहाचा मळा घेऊन चहाच्या व्यवसायात पाऊल टाकलं होतं. 

व्यवसायात जम बसू लागला पण द.आफ्रिकेत तेव्हा वंशवाद वाढला होता. खुद्द गांधींना देखील याचा सामना करावा लागला. देसाई यांचा व्यवसाय पण या भेदभावामुळे गुंडाळण्याच्या बेतात येऊ लागला. त्यातच तिथली राजकीय व्यवस्था देसाई यांच्या उद्योगासाठी अडचणीची ठरू लागली. 

तेव्हा देसाई यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला… 

देसाई भारतात आले ते साल होतं १९१५ चं. महात्मा गांधी भारतात आले ते सालं देखील १९१५. महात्मा गांधी भारतात आले ते ९ जानेवारी १९१५ साली तर नरदास देसाई भारतात आले १२ फेब्रुवारी १९१५ साली. ते भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे एक शिफारस पत्र होतं. हे शिफारस पत्र खुद्द महात्मा गांधी यांनी लिहलेलं. या पत्रात महात्मा गांधी लिहतात, 

“मी द.आफ्रिकेत असल्यापासून नरदास देसाई यांना ओळखतो. तिथे ते यशस्वी चहा बागायतदार होते”

या पत्रामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 

१९१९ साली त्यांनी अहमदाबाद येथे गुजरात चाय डेपोची स्थापना केली. 

या काळातच गुजरात चाय डेपोचं एक चित्र प्रसिद्ध कऱण्यात आलं. यामध्ये एक पैलवान हातात चहाचा कप घेवून आहे तर त्याच्या समोर वाघ आणि बकरी एकाच कपातून चहा पित आहेत अस ते चित्र होतं. या चित्राबाबत सांगितलं जातं की, 

तेव्हा भारतात स्वदेशीचा नारा जोरात होता. ब्रिटीशांविरोधात वातावरण होतं. मात्र त्याच काळात भारताला जातीव्यवस्था नावाची किड लागली आहे हे देखील समजू लागलं होतं. एकीकडे देसाई यांना वंशवादाचा काळ्या-गोऱ्यांचा सामना करावा लागला तेव्हाचं भारतात देखील जातीवाद घेवून अनेकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात हे त्यांच्या लक्षात आलं. 

जातीव्यवस्थेतील एक गोष्ट होती ती म्हणजे एकत्र भोजन न करणं. जातीप्रथा पाळत असताना लोक वेगवेगळी भांडी वापरत. सवर्ण लोक घराच्या बाहेर फुटका कप दलित समजल्या जाणाऱ्या समाजासाठी ठेऊन देत असत. 

हाच जातीवाद बंद करण्याच्या हेतून त्यांनी वाघ बकरीचा फोटो वापरला होता. वाघ आणि बकरी या प्राण्यांच्या दोन जाती एकाच भांड्यात खावू शकतात तर तुमचं काय अस विचारणारा तो प्रश्न होता. यावर अभ्यासकांच मत जरी वेगळं असलं तरी जातीप्रथा संपावी म्हणून त्यांनी केलेला तो एक प्रामाणिक प्रयत्न नक्कीच होता. 

याचाच आधार घेवून १९३४ साली गुजरात चाय डेपोचा “वाघ-बकरी” हा चहाचा ब्रॅण्ड सुरू करण्यात आला. 

१९८० सालापर्यन्त कंपनी चहाच्या होलसेल व रिटेल व्यवसायात पाय रोवून उभा राहिली होती. या काळात त्यांची गुजरातमध्ये ओळख निर्माण झाली. कालांतराने गुजरातच्या मर्यादा सोडून कंपनीने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांचा रस्ता पकडला व त्यानंतर संपुर्ण भारतासह विदेशात देखील चहा विक्रीस सुरवात केली. 

आज देसाई कुटूंबाची चौथी पिढी हा उद्योग संभाळते. वाघ बकरी चहाची उलाढाल ही वार्षिक दिड हजार कोटींची झाली आहे. ४० मिलीयन किलोग्रॅमहून अधिक चहा विकण्यासह भारतातला प्रमुख ब्रॅण्ड म्हणून वाघ-बकरी चहा ओळखला जातो. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.