वहिदा रेहमानच्या नृत्याने दाखवुन दिलं की, ‘कलेला कोणताही धर्म नसतो.’

आजही जेव्हा जेव्हा वहिदा रेहमान यांचा विषय निघतो, तेव्हा चटकन डोळ्यासमोर येते ‘गाईड’ सिनेमातली त्यांची अदाकारी. ‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत ‘गाईड’ सिनेमातल्या या गाण्यावर ज्या बेभानपणे वहिदाजी नाचल्या आहेत, त्याला तोड नाही.

हिंदी सिनेसृष्टीवर स्वतःच्या नृत्याने आणि सुंदर अभिनयाने वहिदाजींनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केलं. आज जो किस्सा सांगणार आहे, तो आहे वहिदाजींच्या बालपणीचा.

वहिदाने शाळेत असतानाच ठरवलं होतं की तिला डाॅक्टर व्हायचं आहे.

डाॅक्टर होणं हे तिचं स्वप्न होतं. तसेच लहानपणापासुन वहिदाला नृत्याची सुद्धा प्रचंड आवड होती. वहिदाचे वडिल रेहमान साब हे IAS ऑफीसर. त्यांची विचारसरणी आधुनिक असल्याने कोणतीही गोष्टी करायला ते वहिदाला मनाई करायची नाहीत.

परंतु वयाच्या ८ व्या वर्षी वहिदा आजारी पडली.

आजारपणामुळे ती इतकी अशक्त झाली की अभ्यास करता करता ती वर्गातच झोपुन जायची. वहिदाची इतकी नाजुक शारीरीक अवस्था बघुन वहिदाच्या वडिलांना शिक्षकांनी बोलावुन घेतलं. आणि वहिदाच्या प्रकृतीखातर तिचं नाव शाळेतुन काढुन टाकण्यात आलं. यामुळे वहिदाचं डाॅक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.

वहिदाच्या इतर बहिणी दररोज शाळेत जात असत. शारीरीक अवस्था कमजोर असली तरीही वहिदाने नृत्याचा सराव सोडला नव्हता. बहिणी शाळेत गेल्यावर वहिदा एकटीच आरशासमोर वेगवेगळे हावभाव करायची. वेगवेगळ्या अँगलने स्वतःकडे पाहायची. एक दिवस वहिदाच्या वडिलांनी मुलगी आरशासमोर उभी राहून वेडेवाकडे हावभाव करत असल्याचं बघितलं.

“हे काय करतेस तु आरशासमोर चित्रविचित्र हावभाव. डाॅक्टरकीचं स्वप्न तुझं अपूर्ण राहिलंच. पुढे आयुष्यात काय करायचं ठरवलंयस?”

वडिलांचा बोलण्याचा सूर थोडा त्रासिक असला तरीही त्यामागे मुलीबद्दल काळजी होती. वहिदा वडिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना ठामपणे म्हणाली,

“मला लोकांना हसवायला आणि रडवायला आवडतं. बाबा तुम्ही बघाच, एक दिवस माझा फोटो पेपरात छापुन येईल.”

वहिदा साधारणः ९-१० वर्षांची असेल. तिला भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकायचा होता. त्यावेळी टी. के. महालिंगम पिल्लई हे लोकप्रिय नर्तक भरतनाट्यम नृत्य करण्यास तरबेज होते. ते अनेक विद्यार्थ्यांना भरतनाट्यमचं प्रशिक्षण देत असत. वहिदाला महालिंगम पिल्लईंकडून भरतनाट्यम शिकायची इच्छा होती. वहिदाचे बाबा तिला पिल्लईंकडे घेऊन गेले. परंतु पिल्लईंनी वहिदाला शिकवायला स्पष्ट नकार दिला. वहिदाच्या बाबांनी कारण विचारताच ते म्हणाले,

“तुम्ही मुसलमान आहात. भरतनाट्यममध्ये भगवान शंकराची आराधना असते. तुम्ही मुसलमान असल्याने हा नृत्यप्रकार मनापासुन शिकाल असं मला वाटत नाही.”

पिल्लईंनी दिलेलं हे उत्तर ऐकुन वहिदाचे बाबा व्यथित झाले. वहिदाने मात्र पिल्लईंकडे शिकण्याचा हट्ट धरला होता. मुलीची इच्छा वडील मोडु शकत नव्हते. त्यांनी पिल्लईंचा तीन-चार महिने पिच्छा पुरविला. वहिदा आणि तिचे वडिल भरतनाट्यम शिकण्यासाठी अडुन बसलेत, असं पिल्लईंना जाणवलं. पिल्लई ज्योतिषी सुद्धा होते. त्यांनी वहिदाच्या बाबांकडे तिची कुंडली मागितली.

‘मुसलमानांमध्ये कुंडली बनवत नाहीत’, असं वहिदाच्या बाबांनी पिल्लईंना सांगीतलं.

पिल्लईंनी वहिदाची जन्मतारीख, जन्मवेळेनुसार स्वतःच कुंडली बनवली.

‘हि मुलगी त्यांची शिष्या बनुन सर्वदूर त्यांचं नाव प्रसिद्ध करेल.’ असं पिल्लईंना कुंडली बघुन कळालं.

वहिदाच्या बाबांनी हे ऐकताच त्यांनी पिल्लईंसमोर मुलीला शिकवण्याचा आग्रहच धरला. अखेर पिल्लई राजी झाले आणि त्यांनी गंडा बांधुन वहिदाला शिकवायला सुरुवात केली. वहिदा हि पिल्लईंकडे शिकणारी एकमात्र मुस्लिम शिष्या असावी.

वहिदाने पिल्लईंकडून भरतनाट्यमचं रितसर प्रशिक्षण घेतलं. स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसराॅय सी. राजगोपालाचारी यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वयाच्या १३ वर्षी वहिदाने त्यांच्यासमोर भरतनाट्यम नृत्यप्रकाराचं अप्रतिम सादरीकरण केलं. गोपालाचारींनी प्रभावित होऊन वहिदाचा मेडल देऊन सत्कार केला. त्यावेळी वहिदाचे वडिल म्हणाले,

“आज माझ्या मुलीने इथे नृत्य करुन दाखवुन दिलं की, कलेला कोणताही धर्म नसतो.”

पुढच्या दिवशी पेपरात वहिदाच्या फोटोसह त्या समारंभाची सर्व बातमी छापुन आली.

‘एक दिवस माझा फोटो पेपरात छापुन येईल’, असं वहिदा जे ठामपणे वडिलांना म्हणाली होती ते खरं ठरलं. यानंतर सिनेक्षेत्रात यशस्वी वाटचाल करुन अभिनय आणि नृत्याची अनोखी सांगड वहिदाजींनी जुळवली. कुंडली बघुन पिल्लईंनी वहिदाबद्दल जी भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरली. पुढील अनेक वर्ष सुंदर अभिनत्री आणि कुशल नृत्यांगना म्हणुन वहिदाजींनी स्वतःसोबत त्यांचे भरतनाट्यमचे गुरु पिल्लईंचं नावही मोठं केलं.

मराठीत एक म्हण आहे, ‘एका दगडात दोन पक्षी मारणं’. वहिदाजींनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत वडिलांना दिलेला शब्द आणि गुरुंनी त्यांच्याविषयी केलेलं भाकीत खरं ठरवलं. क्या बात है वहिदाजी !

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.