घराणेशाहीच्या राड्यात शेतकऱ्यांचा आवाज असणाऱ्या वैशाली येडे विजयी होणार का?

नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. प्रचाराचा गुलाल गुधळला. प्रत्येक पक्षानं आपले कार्यकर्ते जोशानं कामाला लावले. उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. अन् आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या.

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, गावच्या पारावर, दुध घालतांना, दारे धरतांना, बाजारात, सप्तामध्ये, जत्रामध्ये, लग्नमंडपात, एसटीमध्ये, जीपड्यात, कट्टयावर, फेसबुकच्या वाॅलवर, व्हाॅटसअप्सच्या स्टेटसवर दादा, भाऊ, ताई, अक्का, भैय्या, मामा, नानां अशा राजकीय लोकांचीच चर्चा आहे.

मात्र,

असं सगळं होत असतांना यवतमाळमध्ये वैशाली येडे नावाच्या एका महिला व्यक्तीची जोरदार चर्चा आहे.

नेमक्या चर्चेत असणाऱ्या वैशाली येडे आहेत कोण?

२८ वर्षाच्या वैशाली येडे मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील राजूर या गावच्या आहेत. त्याच्याकडं सध्या तीन एकर शेती आहे. सध्या त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम असून त्याचं १० वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे.

2009 मध्ये वैशाली यांचा विवाह सुधाकर यांच्याशी झाला. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2011 ला वैशाली यांचे पती सुधाकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

त्यावेळी वैशाली यांचा मुलगा 1 वर्षांचा होता. तर त्या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या. पतीच्या निधनानंतर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी वैशाली येडे यांच्यावर पडली.

अशा,

संकटात खचूून न जाता त्यांनी या संकटाशी दोन हात केले. स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. कुटुंबाला सावरलं.

आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरच्यांना धीर द्यायचं काम त्या करू लागल्या.

नेमक्या चर्चैत कधी आल्या?

92 वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यात आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उदघाटन जेष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होतं.

मात्र सहगल यांना राजकीय विरोध झाला त्यामुळे त्यांना बाजूला ठेवण्यात आलं. आणि वैशाली येडे यांना उदघाटनाचं निमत्रंण धाडण्यात आलं.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला उदघाटनाला बोलवून वादावर पडदा टाकण्यासाठी भावनिक हात घालण्यात आला. मात्र या उदघाटनप्रसंगी बोलतांना त्यांनी सरकारच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली होती.

नवरा गेला कारण तो कमकुवत होता, मात्र मी लढणार आहे.

असं त्या तेव्हा म्हणाल्या होत्या. माध्य़मांनीही त्यादिवशी त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली होती.

कार्यक्रमाच्या आयोजकांनीही त्यादिवशी त्यांच्या पुढं पुढं केलं. माध्यमांना आपला टीआरपी मिळाला होता. शेतकऱ्यांच्या पत्नीला बोलवून आय़ोजकांनी लोकांची सहानभूती मिळवली होती. मात्र त्या दिवसानंतर त्याचे प्रश्न, त्यांच्या अडचणी विचारायला, त्यांना मदत करायला कोणी पुढं आलं नाही.

शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे, रात्री बेरात्री शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देणारे, शेतकऱ्यांचा वसा खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलाय आणि निस्वार्थी भावनेनं जे चालवत आहेत.

असे आमदार बच्चू भाऊ कडू यांच्याशी वैशाली येडे यांची सामाजिक कामातून ओळख झाली होती. नुकतीच बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेस निवडणूक आयोगानं प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली होती.

त्यामुळे बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीस यवतमाळमधील लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

तिकीट द्यायचा निर्णय घेतला. जबाबदारीही टाकली मात्र खरी लढत इथून पुढं होती. प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे सांगतात,

वैशाली येडे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या. घरी जेमतेम तीन एकर शेती, सगळा संसाराचा गाडा अंगणवाडी सेविकेच्या येणाऱ्या पैशातून चालणारा त्यामुळे निवडणूकीला उभं राहणं सोपं नव्हतं. 

मात्र बच्चू कडूंनी विश्वास टाकला तसा यवतमाळमधील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्य़ावर विश्वास टाकला. प्रहार कार्यकर्त्यांनी वैशालीताईंना निवडून आणण्यासाठी कंबर कसली.

अर्ज भरण्यासाठी जे पैसे लागणार होते त्यासाठी झोळी घेऊन प्रहारचे कार्यकर्ते गावोगावी पैसे मागू लागले. सोशलमिडियावरून लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं. प्रत्येकानं रूपया रूपया यासाठी दिलाय.

PRAHAR 4

चक्क परदेशातूनही वैशालीताई यांना मदत केली आहे. आणि अजूनही करत आहेत. प्रत्येकांचा वैशालीताईला पाठिंबा मिळतोय.

PRAHAR 2

यवतमाळ वाशिम च्या मतदारांनी हा आवाज संसदेत पाठवावा. माझं मत जात,धर्म,पंथ विसरून धनाढ्य राजकीय व्यवस्थे विरुद्ध सामान्य माझ्या बहिणी च्या बाजूनेच असेल हा निर्धार करावा, असं आवाहन प्रमोद कुदळे सोशलमिडियावरून करत आहेत.

वैशाली येडे यांचा हा संघर्ष गेल्या सात वर्षापासून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरचे प्रश्न त्यांनी अनुभवलेत. शेतकऱ्यांचं जिणं त्या जगल्यात त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱी घरातला माणूस किंवा बाई संसदेत गेली पाहिजे. जेणेकरून तीथं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता येतील, असं वैशाली येडेंचं म्हणणं आहे.

खासदारकीला उभं राहणं येड्या गबाळ्याचं काम नाही असं म्हणतात. त्यासाठी भरपूर पैसा आणि पाठीमागे कार्यकर्ते लागतात. प्रचार करायला जाण्यासाठी मोठमोठ्या गाड्या आणि लोकांचा फौजफाटा लागतो.

मात्र ह्या असल्या सगळ्या वायफळ गोष्टी फाट्यावर मारत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्या आपल्या लाल डब्ब्यातून म्हणजेच एसटीतून प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. आता रडायचं नाही तर लढायचं. माझ्या बळीराजाच्या हक्कासाठी. फक्त तुम्ही साथ द्या.

PRAHAR 3

जर यवतमाळकरांनी जर मला सेवेची संधी दिली तर पहिल्याच दिवशी दारूबंदी करणार, असं त्या सांगतात.

दरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी वैशाली येडे यांनी राजकारणात उडी घेतली आहे. मात्र त्यांच्या विरोधात मातब्बर असे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी उभ्या आहेत.

त्यामुळे यवतमाळमध्ये धनशक्तीविरूद्ध जनशक्ती अशीच लढत होणार आहे. मात्र सर्वसामान्य मतदारराजा वैशाली येडेच्या पारड्यात मत टाकून त्यांना शेतकऱ्यांचा आवाज बनवून संसदेत पाठवणार का? हे २३ मे लाच कळेल.

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. Shreyash Shinde says

    धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील सुध्दा निवडणूक लढवत होते त्यांच्या वरही एखादा लेख लिहा

Leave A Reply

Your email address will not be published.