सांगलीत वाजपेयींसारख्या छोट्या माणसाचा गौरव का करायचा अशी मोहीम चालवण्यात आली होती

स्वतंत्र भारताच्या इतिहासात राजकीय पातळीवर आभाळाएवढं स्थान मिळवणारे जे काही मोजके नेते होऊन गेलेत त्यात प्रमुख नाव येतं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. अजातशत्रू वाजपेयींबद्दल विरोधी पक्ष देखील आदर करायचा. त्यांची भाषणे, त्यांचं देशप्रेम, त्यांची अफाट निर्णय घेण्याची क्षमता हे सगळं एखाद्या दन्तकथेप्रमाणे प्रसिद्ध आहे.

व याच वाजपेयींना एकेकाळी सांगलीकरांनी ते छोटे नेते आहेत असं म्हणून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता.

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. हिंदुत्ववादी विचारसरणीला पुढे नेण्यासाठी शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ या पक्षाची स्थापना केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे तरुण या पक्षात सामील होत होते. यातच एक नाव होतं अटलबिहारी वाजपेयी.

मूळच्या ग्वाल्हेरचे असलेले वाजपेयी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढले होते. बाबासाहेब आपटे या थोर संघ प्रचारकाचा त्यांच्यावर प्रभाव होता. विद्यार्थी जीवनापासून वाजपेयींनी संघ कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं 

जनसंघाची स्थापना झाली तेव्हा तरुण वाजपेयींना पक्षाच्या उत्तर विभागाचा सेक्रेटरी म्हणून नेमलं होतं. त्याकाळात दिल्लीमध्ये राहून वाजपेयींनी पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी दिवसरात्र एक करून मेहनत घेतली. या तरुण कार्यकर्त्याची क्षमता त्याचा धडाका श्यामाप्रसाद मुखर्जी याना लवकरच लक्षात आला. आपला भावी वारसदार म्हणून वाजपेयींना घडवण्यास त्यांनी सुरवात केली.

आपोआपच वाजपेयी यांचे जनसंघातील महत्व प्रचंड वाढलं. १९५७ सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांना लोकसभेचं तिकीट देखील देण्यात आलं. बलरामपूर येथून ते चक्क निवडून देखील आले.

स्वातंत्र्यानंतरचा हा काळ. काँग्रेस सोडून इतर पक्षाचे उमेदवार अक्षरशः हाताच्या बोटावर मोजता येतील इतके निवडून यायचे. विशेषतः गांधी हत्येपासून आरएसएसवर ठपका टाकण्यात आला होता याचा जनसंघाला प्रचंड तोटा होत होता. त्यातूनही वाजपेयींनी मिळवलेला विजय हा विशेष उल्लेखनीय मानला जातंय होता.

लोकसभेत निवडून आल्यापासून वाजपेयींनी पक्षाला देशभर पसरवण्यास सुरवात केली. खेडोपाडी फिरून ते कार्यकर्ते जमवू लागले.

यातूनच १९५७ च्या दरम्यान विलिंग्डन महाविद्यालयाच्या पटांगणात वाजपेयींची तरुण कार्यकर्ता म्हणून जाहीर सभा झाली होती. संघाचे बाबा पोतदार आणि बापूसाहेब पुजारी यांचा त्या सभेच्या आयोजनात पुढाकार होता. विद्यार्थीदशेतच ते राष्ट्रीय स्तरावरील वक्ते झाले होते. विद्यार्थ्यांच्या तुफान प्रतिसादाने ते भाषण गाजले.

बापूसाहेब पुजारी सांगतात,

त्यानंतर वाजपेयी सांगलीत १९६२ ला आले. जनसंघाच्या नेत्यांनी आम्हाला पक्षनिधी गोळा करण्याचे आव्हान दिले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वकील केशवराव चौगुले होते.सांगलीमध्ये तेव्हा काँग्रेस पक्षाचा मोठा जोर होता. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांची एक मोठी पिढी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात वर्चस्व गाजवत होती. त्याकाळी जनसंघ व इतर पक्ष सांगली भागात खिजगणितीमध्ये देखील नव्हते.

वाजपेयींच्या या थैली अर्पण सोहळ्याची काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे खिल्ली उडवण्यास सुरवात झाली.  कोण कुठले वाजपेयी, त्यांच्यासारख्या छोट्या माणसाचा असा गौरव करायचे कारण काय अशी ती मोहीम होती. 

पण जनसंघाचे कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी या अपप्रचाराविरुद्ध संघर्ष करत लोकांपुढे आपली बाजू मांडली. सांगलीकरांनी देखील त्याला उदंड प्रतिसाद दिला. वाजपेयींसाठीच्या थैलीसाठी ५१ हजार रुपये गोळा झाले. सांगलीत वाजपेयींची अभूतपूर्व अशी सभा झाली. सध्याच्या राजवाड्याच्या पटांगणात झालेल्या त्या सभेसाठी तुडुंब गर्दी झाली होती. 

बापूसाहेब पुजारी व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना ती गोळा झालेली ५१ हजार रुपयांची थैली अर्पण केली. वाजपेयींनी आपल्या स्टाईलमध्ये जोरदार भाषण केले.

काँग्रेसच्या त्या मोहिमेची खिल्ली उडवताना वाजपेयी म्हणाले, 

माझ्या सारख्या छोट्या माणसाचा देशस्तरावरील काँग्रेस विरोधी पक्षात असूनही परदेशी शिष्टमंडळाचे नेतृत्व माझ्याकडे ते का देतात हे समजत नाही. यापुढे असे करताना राष्ट्रीय काँग्रेसने सांगली जिल्हा काँग्रेसचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. 

स्वतः नेहरू वाजपेयींचं भावी पंतप्रधान म्हणून कौतुक करत होते आणि सांगलीचे काँग्रेस कार्यकर्ते छोटा माणूस म्हणून त्यांची संभावना करत होते. काळाच्या ओघात वाजपेयींनी आपलं राजकीय महत्व दाखवून तर दिलंच, नेहरूंचे शब्द खरे ठरले आणि ते देशाचे पंतप्रधान बनले.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.