वाजपेयी बापलेकांनी एकाच वर्गात, एकमेकांच्या शेजारी बसून वकिलीचं शिक्षण घेतलं होतं !

“हमे लगा आप अपने बेटे की अॅडमिशन के लिए आहे है. क्या आप हमारा मझाक तो नही उडा रहे ??”

कानपूर येथील डी ए व्ही कॉलेजच्या प्राचार्यांनी कृष्णबिहारी वाजपेयींना विचारलं.

किस्सा असा की कृष्णबिहारी आणि अटलबिहारी हे वाजपेयी पितापुत्र एलएलबीच्या अॅडमिशनसाठी  कॉलेजला आले होते. शिवाय दोघांनाही एकाच वर्गात प्रवेश घ्यायचा होता. हे असं काहीतरी वेगळंच प्रकरण कॉलेजच्या इतिहासात प्रथमच घडत होतं.

कृष्णबिहारी वाजपेयी हे मूळचे उत्तरप्रदेशच्या बटेश्वर या गावचे. मात्र नोकरीसाठी ग्वाल्हेरला आले. पुढे ते ग्वाल्हेर संस्थानच्या शाळेत मुख्याध्यापक झाले. त्यांची सगळी मुलं त्याच शाळेत शिकली. अटलबिहारी हे सगळ्यात धाकटे चिरंजीव असल्यामुळे ते सगळ्यात जास्त लाडके होते.

family
वाजपेयी कुटुंबीय

कृष्णबिहारी हे ग्वाल्हेरमध्ये कवी म्हणून प्रसिद्ध होते. ते जबरदस्त वक्ते देखील होते. त्यांचे हेच  सगळे गुण त्यांच्या धाकट्या चिरंजीवाने म्हणजेच अटलजींनी उचलले होते. कृष्णबिहारी हे आर्य समाजाशी देखील संबंधित होते. त्यांच्यामुळेच अटलजी सुद्धा आर्यसमाजाशी जोडले गेले. जात विरहित हिंदू समाजाची संकल्पना अटलजींना भावली होती. परंतु पुढे बाबासाहेब आपटे यांनी वाजपेयींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ओढले.

कृष्णबिहारींना ही गोष्ट गोष्ट विशेष आवडली नाही मात्र त्यांनी कधी विरोधही नाही केला. पुढे गांधीजींनी ‘छोडो भारत’ आंदोलन छेडल्यावर गावातील एक भाषण ऐकायला गेलेल्या  वाजपेयी बंधूना जेव्हा अटक झाली त्यावेळी कृष्णबिहारी वाजपेयी अतिशय चिडले. त्यांची अशी इच्छा होती की मुलांनी शिक्षण पूर्ण करावे, सरकारी नोकरी मिळवावी आणि लग्न करून उत्तम संसार करावा. मात्र मुलांच्या राजकीय सक्रियतेमुळे आपल्या नोकरीवर गदा येईल अशीही त्यांना शंका असायची.

अटलजी ज्यावेळी राज्यशास्त्रातली पदवी पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी कानपुरला आले त्यावेळी लाडका मुलगा डोळ्यांपासून दूर गेल्यामुळे कृष्णबिहारीचं ग्वाल्हेरमध्ये लक्ष लागेना. दरम्यानच्या काळात ते शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाले होते.

त्यावेळी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण वकिलीचं शिक्षण घ्यावं असं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे वकिलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि पोराच्या उपद्व्यापावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृष्णबिहारी देखील वळकटी बांधून कानपूरला निघून आले.

अटलजींना वाटलं की वडील फक्त भेटायला आले आहेत पण त्यांचा इरादा ऐकून  अटलजींना धक्काच बसला. मात्र वडिलांचं आपल्यावरचं प्रेम आणि या वयात देखील  शिक्षण पूर्ण करायची जिद्द बघून त्यांना गहिवरून आलं.

college
डी ए व्ही कॉलेजचे दिवस

झालं दोघेही बापलेक एकाच वर्गात शिकू लागले. विशेष म्हणजे त्यांना हॉस्टेलमध्ये राहायला देखील एकच खोली मिळाली. खोली क्रमांक १०४. सुरवातीच्या काळात  दोघांचीही  खूप चेष्टा झाली, पण वाजपेयींनी ती अतिशय खिळाडूंवृत्तीने घेतली. मात्र जेव्हा चेष्टेने परिसीमा गाठली तेव्हा या दोघांची तुकडी बदलण्यात आली.

नंतरच्या काळात मात्र या बापलेकांचा कॉलेजमधला वावर हा सर्वांसाठीच कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय बनला. दोघांमध्ये कायमच परीक्षेत अधिक मार्क्स मिळविण्यासाठी चढाओढ चालत असे. हे असं काही दिवस चाललं, मात्र पुढे अटलजीनी एलएलबी निम्म्यात सोडली आणि ते पूर्ण वेळ संघाच्या प्रचारात लागले.

अटलजींनी आपलं संपूर्ण आयुष्य राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी दिलं. ना लग्न केलं, ना नोकरी केली. वडिलांची शंका खरी ठरली.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.