चीनचा निषेध करण्यासाठी वाजपेयींनी ८०० मेंढ्यांचा कळप घेऊन आंदोलन केलं होतं

गोष्ट आहे १९६५ सालची. भारतात तेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. भारताच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानसोबत आपले युद्ध सुरू होते. अख्खा देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा होता.

शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या जगाचं लक्ष भारत व पाकिस्तानच्या युद्धाकडे लागले होते.

अमेरिकेने पुरवलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे , पॅटन रणगाडे घेऊन अतिआत्मविश्वासाने भरलेल्या पाकिस्तानने साधारण ऑगस्ट मध्ये भारतात घुसखोरी केली. पण सप्टेंबर महिना आला तसा आपल्या पराक्रमी जवानांनी पाकिस्तान्यानां मागे ढकलण्यात यश मिळवलं होतं.

अनेक ठाणी आपण परत मिळवली होती. हे युद्ध आपल्या टप्प्यात आले होते. आदेश मिळाले तर लाहोर जिंकण्यासाठीसुद्धा आपले जवान तयार होते.

अगदी याच काळात पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनने भारतीय बॉर्डरवर कुरापती काढण्यास सुरवात केली.

भारत आणि चीनचे युद्ध होऊन फक्त ३ वर्षे झाली होती. यामुळे दोन्ही देशांचे संबंध तणावाचेच होते. शत्रूचा शत्रू मित्र या नियमानुसार पाकिस्तान व चीन जवळ येत होते.

यामुळेच पाकिस्तानला मदत व्हावी म्हणून चीनचे प्रयत्न सुरू होते. भारताला जर पूर्वेकडील सीमेवर सुद्धा आघाडी उघडायला लागली तर आपल्या अडचणी वाढणार होत्या. एवढेच नाही तर भारत पाकिस्तान चीन युद्ध सुरू झाले तर तिसर महायुद्ध भडकण्याची सुद्धा शक्यता होती.

अशातच चीनकडून भारताला एक खरमरीत पत्र आलं.

विषय होता की भारतीय जवानांनी चीनच्या ८०० मेंढ्या आणि ५९ याक चोरले आहेत.

चीनचा दावा होता की भारतीय जवानांनी चार तिबेटीयन मेंढपाळांना आपल्या ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडील सर्व मेंढ्या चोरल्या. हा आरोप हास्यास्पद तर होताच पण चीनने खेळलेली ही चाल होती.

या आरोपामुळे गोंधळ उडाला. वर्तमानपत्रातून चिनी धोरणांवर टीका झाली.

पण शास्त्रीजींच्या सरकारने सबुरीचं धोरण स्वीकारले होते. चीन हा प्रकार का करत आहे याचा अंदाज असल्यामुळे भारताने चीनला प्रत्युत्तरादाखल पत्र पाठवलं.

“काही तिबेटी नागरिक आपल्या मेंढ्यासह चीनची सीमा पार करून भारतीय हद्दीत आश्रयासाठी घुसले आहेत. मात्र यात भारतीय जवानांचा कोणताही हात नाही. त्यांच्या जवळ याक नाहीत.”

पण तरीही भारतात अनेकांचं या उत्तराने समाधान झाले नव्हते. चीनला त्यांच्या भाषेत धडा शिकवावा अस तरुणांच मत होतं.

सगळ्यात पुढे आले ते जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी.

भारतात मोजक्याच असलेल्या विरोधी पक्षातील खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता. वाजपेयी तेव्हा ४२ वर्षाचे होते. उत्साही तरुण रक्त.

त्यांनी दिल्लीतल्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ८०० मेंढ्यांचा कळप गोळा केला आणि २४ सप्टेंबर रोजी चीनच्या दूतावासाकडे या मेंढ्या वाजत गाजत घेऊन आले.

मेंढ्यांच्या गळ्यात एक पोस्टर लटकवल होतं,

“Eat me but save the world.”

या अनोख्या आंदोलनाची सगळीकडे चर्चा झली. चीनची सगळ्या जगभरात चेष्टा झाली.

चीनकडून भारत सरकारला परत एक पत्र आले. या पत्रात वाजपेयींनी चीनची खिल्ली उडवली या मागे लालबहादूर शास्त्री यांचा हात आहे असं म्हटलं होतं. पण भारत सरकारने हे सगळे आरोप खोदून काढले,

“दिल्लीमधल्या काही नागरिकांनी हे प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं यात भारत सरकारचा कोणताही संबंध नाही.”

वाजपेयींनी अगदी छोट्या कृतीने चीनला आपली जागा दाखवून दिली होती.

तोवर भारत पाकिस्तान युद्ध संपले होते. भारताची वाढलेली ताकद,आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे चीनला चरफडण्याशिवाय काही करता आले नाही.

पुढे दोन वर्षांनी चीनने अपमानाचा बदला घेण्यासाठी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पन इंदिरा गांधींच्या खंबीर नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने त्यांना पळवून लावले.

संदर्भ- Watershed 1967 by Probol Dasgupta

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.