४८ प्रवाशांना वाचविण्यासाठी अटलजी केमिकल बॉम्ब असलेल्या प्लेनमध्ये घुसले होते !

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आज आपल्यात नसले, तरी त्यांचे एका पेक्षा एक किस्से मात्र मागे आहेत. त्यांचा असाच एक किस्सा भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांनी अटलजी गेल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. टंडन यांनी सांगितल्यानुसार एकदा वाजपेयी अपहरण करण्यात आलेल्या प्लेनमधील ४८ प्रवाशांना वाचविण्यासाठी थेट प्लेनमध्येच घुसले होते.

किस्सा आहे १९९२ सालातला. २२ जानेवारी १९९२.

उत्तर प्रदेशात त्यावेळी राम मंदिर आंदोलनाचं वातावरण तापलेलं होतं. वाजपेयी लखनौमधून पहिल्यांदाच खासदार झाले होते. वाजपेयी जेव्हा कधी लखनौला येत असत त्यावेळी ते मीराबाई रोडवरील एका गेस्ट हाउसमध्ये थांबत असत. त्या दिवशी देखील ते तिथेच थांबलेले होते. लालजी टंडन देखील त्यांच्या बरोबरच होते.

वाजपेयी जेवायला बसले होते आणि पहिला घास तोंडात टाकतात, न टाकतात तोच लखनौचे तात्कालीन कलेक्टर अशोक प्रियदर्शी घाबरलेल्या अवस्थेतच वाजपेयींकडे आले. वाजपेयी जेवत असल्यामुळे आधी तर त्यांना थांबवण्यात आलं पण आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचं सांगितल्यानंतर त्यांना वाजपेयींच्या रूममध्ये सोडण्यात आलं.

अचानकपणे आलेल्या कलेक्टरांना बघून अटलजींनी येण्याचं कारण विचारलं. घाबरलेल्या प्रियदर्शी यांनी वाजपेयींना सांगितलं की एका तरुणाने दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या विमानाचं अपहरण केलंय आणि त्यात केमिकल बॉम्ब असल्याचं तो सांगतोय.

प्लेनमध्ये ४८ प्रवासी असून आपण हे विमान उडवून देऊ अशी धमकी त्या युवकाने दिलीये. पण त्याचवेळी जर अटल बिहारी वाजपेयी जर भेटायला येणार असतील तर आपण विमानातील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करू, असं देखील त्याने सांगितलंय.

कलेक्टर प्रियदर्शी यांनी वाजपेयींना आपल्या सोबत येण्याची विनंती केली. लालजी टंडन आणि इतर भाजप नेत्यांनी मात्र त्यासाठी विरोध केला. कदाचित वाजपेयींच्या घातपाताचा हा कट असावा अशी त्यांना भीती होती. पण वाजपेयींनी मात्र आपण सोबत यायला तयार असल्याचं सांगितलं.

अटलजी, अशोक प्रियदर्शी, लालजी टंडन आणि इतरही नेते विमानतळाच्या दिशेने गेले. तिथे पोहोचून अपहरण करणाऱ्या युवकाशी संपर्क कारण्यात आला. अटलजींनी स्वतः त्याच्याशी संपर्क साधला पण बोलणाऱ्या व्यक्ती अटलजीच आहेत, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला खूप समजावण्यात आलं पण तो विश्वास ठेवायलाच तयार नव्हता, शिवाय पुन्हा पुन्हा विमान उडविण्याची धमकी देत होता. त्यामुळे अटलजींनी विमानात जायचं ठरलं.

सगळी मंडळी एका कारने विमानाच्या दिशेने निघाली. तिथे पोहोचल्यानंतर आधी अशोक प्रियदर्शी आणि नंतर लालजी टंडन विमानात गेले. वाजपेयी बाहेर आलेले असून त्या युवकाने अटलजींना भेटण्यासाठी विमानाच्या बाहेर यावं, यासाठी त्याची समजूत घालण्याचे प्रयत्न करण्यात आले पण तो युवक मात्र अटलजींनीच विमानात यावं यावर अडून होता.

शेवटी अटलजी विमानात गेले. त्यांच्या मागोमाग त्यांचे सिक्युरिटी गार्ड देखील विमानात शिरले. अटलजी विमानात आल्यावर मात्र विमानातील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता किमान आपले प्राण वाचू शकतात, हा विश्वास त्यांना आला.

atalji and lal ji tondon
अटलजी आणि लालजी टंडन

विमान हायजॅक करणारा युवक आणि वाजपेयी ज्यावेळी समोरासमोर आले त्यावेळी लालजी टंडन त्या युवकाला उद्देशून म्हणाले,

“अटलजी एवढ्या दुरून तुझ्या म्हणण्यानुसार तुला भेटायला आलेत. तू त्यांचं दर्शन नाही घेणार का..?”

लालजी टंडन याचं हे बोलणं ऐकून तो युवक अटलजींच्या दर्शनासाठी खाली झुकला. जसा तो युवक दर्शनासाठी झुकला, तसच शेजारी असलेल्या एका गार्डने त्याला पकडलं. पकडला गेल्यानंतर त्याने आपल्या हातातील सुतळीचा गुच्छ बाजूला फेकला आणि सांगितलं की आपल्याकडे कुठलाही केमिकल बॉम्ब नाही. आपण हे फक्त राममंदिर आंदोलनाच्या बाबतीत लोकांमध्ये किती आक्रोश आहे, हे दाखवून देण्यासाठी केलं होतं.

युवकाला अटक केल्यानंतर अटलजी विमानातील सर्व प्रवाशांना भेटले आणि त्यांना धीर दिला. आता ते सुरक्षित असल्याचं सांगितलं. प्रवाशांमध्ये काँग्रेसचे नेते सीताराम केसरी हे देखील होते. अटलजींनी त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.