कलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण…
भिडू निवडणुका आल्या आहेत. अजून उमेदवारी जाहीर होतीय. तोवर उमेदवारांची लगीनघाई उडालेली आहे. दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींचे मन वळवणे, ऐनवेळी तिकीट मिळत नसेल तर विरोधी पक्षात काही होतंय का खडा टाकणे हे सध्या चालेलं आपण पाहतोय. दिवसागणिक गणिते बदलत आहेत. कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. काही दिवसांनी पूर्ण चित्र स्पष्ट होईल.
हे सगळ चालतच राहणार पण बोल भिडूच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय काही गेल्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या वैशिट्यपुर्ण लढती आणि त्यांचे गंमतीशीर किस्से.
सुरवात पुण्यापासून करूया.
साल होत १९९८. भारतात तेव्हा आय.के.गुजराल यांचं सरकार कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी पाठींबा काढून घेतल्यामुळे कोसळलं होत. मुदतपुर्व निवडणुका लागल्या होत्या. यावेळच युद्ध तीन आघाड्यांमध्ये लढल जाणार होत. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी, कॉंग्रेसचे सीताराम केसरी आणि तिसऱ्या आघाडीचे गुजराल.
सोनिया गांधी यांचा नुकताच कॉंग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश झाला होता. प्रचारासाठी त्यांना फिरवण्यात येत होत. इंग्लिशमध्ये लिहिलेली हिंदी भाषणे त्या वाचून दाखवत होत्या. केसरी पवार यांच्यासारख्या कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांपुढे त्यांना कोणी तितकं सिरीयस घेत नव्हत.
केसरी दोन वेळा आपला हुकलेला पंतप्रधानपदाचा हुकलेला चान्स यावेळी गमवायचा नाही या उद्देशाने सूत्र हलवत होते. पक्षाबाहेरच्या विरोधकांबरोबरचं पक्षातल्या विरोधकांवर कुरघोडी करायची होती. त्यांना कंटाळून अनेक नेते पक्ष सोडून गेले होते यातच होते पुण्याचे सुरेश कलमाडी.
एनडीए मधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला भारतीय वायुसेनेचा लढाऊ पायलट स्क्वाड्रन लीडर सुरेश कलमाडी. सत्तरच्या दशकात वायुदल सोडून राजकारणात प्रवेश केला. पुण्याच्या युथ कॉंग्रेसमधून लक्षवेधी कामगिरी केली. यातच शरद पवार यांच्यासारखा गुरु मिळाला.
कलमाडी यांच्या विमानानं सुपरफास्ट टेक ऑफ घेतलं. त्यांनी क्रीडास्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळीच छाप पाडली होती. पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमन्त्री असताना केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले होते. राज्यमंत्री असूनही एक रेल्वे बजेटही त्यांनी सदर केलं.
१९९६ सालच्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसकडून पुण्याच्या खासदारकीच तिकीट मिळालं. कॉंग्रेस विरोधी लाटेतही ते निवडून आले. आपल्या असंख्य खटपटी लढवून कलमाडी यांनी पुण्याच्या राजकारणावर मजबूत पकड मिळवली होती. ते कन्नड भाषिक होते.
पण पुण्याच्या ब्राम्हणमहासंघाकडून जातीच कार्ड खेळून त्यांनी आपली मते मजबूत केली होती. त्याकाळात एक घोषणा प्रसिद्ध होती,
“सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी”
पण दोनच वर्षात वारे फिरले. कॉंग्रेस अध्यक्ष केसरीनी आपल्या विरोधी खासदारांचा पत्ता कट करायचं ठरवलं. यात सर्वात वरच नाव होत सुरेश कलमाडी यांचं. कलमाडी यांना ही बातमी कळाली. त्यांनी लागलीच सूत्र हलवली. आपला पुणे विकास आघाडी नावाचा पक्ष उभा केला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत ५० नगरसेवकांनी देखील कॉंग्रेस सोडली होती.
कॉंग्रेसने आपली उमेदवारी विठ्ठलराव तुपे यांना जाहीर केली.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुपे पाटलांना हडपसरचे राजे समजल जायचं. तसं पाहिलं गेलं तर ते सुद्धा शरद पवार गटातले होते. पुढे शरद पवारांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन केल्यावर ते सुद्धा पवारांच्यासोबत गेले होते. यावेळची निवडणूक चुरशीची होणार होती.
युतीच्या वाटणीमध्ये पुण्याची जागा भारतीय जनता पक्षाकडे होती. पण एवढ्या वर्षात त्यांचा एकदाच खासदार निवडून आला होता. ती निवडणूक होती १९९१ ची आणि भाजपचे खासदार होते अण्णा जोशी. ९६ च्या निवडणुकीत मात्र कलमाडींनी त्यांचा सहज पराभव केला होता. त्यामुळे भाजपाने त्यांचा पत्ता कट केला. उमेदवारी दाखल करायची वेळ आली तरी भाजपाच ठरत नव्हत. तेवढ्यात एक खळबळजनक बातमी आली.
जेष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सुद्धा पुण्याहून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
अविनाश धर्माधिकारी म्हणजे पुण्यातल्या कसबा पेठेत जन्मलेले वाढलेले अस्सल पुणेकर. लहान असल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव त्यांच्यावर होता. जवळपास दहा वर्ष विविध संघटनाचा कार्यकर्ता म्हणून भारतभर काम केलं होत. पंजाबच्या खलिस्तानवादी आंदोलनापासून ते ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळ यात प्रत्यक्ष जाऊन तिथला अनुभव घेतला होता.
१९८६ साली त्यांनी सर्वात अवघड अशी यूपीएससी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात आयएसएस बनले.
कलमाडी यांच्याप्रमाणेच थोड्याच दिवसात त्यांनी आपल्या करीयर मध्ये प्रगतीचे वेगवेगळे टप्पे गाठले. त्यांना योगायोगाने महाराष्ट्र केडर मिळाले होते. रायगड जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सनदी अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात कधी पोस्टिंग मिळत नाही. पण तरीही त्यांची पात्रता पाहून शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर पुण्याचा अतिरिक्त कलेक्टर ही जबाबदारी दिली गेली.
मनोहर जोशी मुख्यमंत्री बनल्यावर त्यांची नियुक्ती डेप्युटी सेक्रेटरी म्हणून करण्यात आली. अतिशय कमी वयात या महत्वाच्या पदावर जाण्याचा एकप्रकारचा विक्रम त्यांनी केला होता. पण १९९६ साली काही कारणास्तव त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातून सनदी अधिकारी घडावेत यासाठी पूर्णवेळ द्यायचं ठरवलं. यातूनच चाणक्य मंडल या क्लासची सुरवात केली.
अविनाश धर्माधिकारी हे संघ विचाराना जवळचे होते. त्यांची इमेज प्रशासनात स्वच्छ काम केलेला अधिकारी अशी होती. पुणेकरांसाठी तर ते हिरो होते. भाजपा आपल्या उमेदवारीला पाठींबा देईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण झाले उलटेच.
पार्टी हायकमांडकडून संदेश आला,
“पुण्यातील कार्यकर्त्यांना त्यागाची संधी आहे”
भाजपाने पुण्याहून उमेदवार तर दिलाच नाही वरून अटलबिहारी वाजपेयी यांनी निवडून येण्याचे मेरीट तपासून कलमाडी यांना पाठींबा जाहीर केला. धर्माधिकारी यांच्यासाठी हा धक्काच होता. वाजपेयी हे फक्त पाठींबा जाहीर करून थांबले नाहीत तर त्यांनी कलमाडी विजयी व्हावेत यासाठी पुण्यात सभादेखील घ्यायचं ठरवलं.
सोनिया गांधी यांची पुण्याच्या वानवडी येथे विठ्ठलराव तुपे यांच्यासाठी जंगी सभा झाली. जवळपास दोन लाखांची गर्दी झाली. साखर कारखान्यांनी पैसे देऊन सभेला माणसे गोळा केली असल्याची टीका विरोधी पार्टीकडून झाली. दुसऱ्याच दिवशी फर्ग्युसन कॉलेज ग्राउंडवर वाजपेयींची सभा होती. पण दुर्दैवाने बातमी आली वाजपेयी यांच्या भावाचा मृत्यू झाला आहे. आता सभा रद्द होणार म्हणून कलमाडी यांच्या पायाखालची वाळू सरकली.
पण ठरलेल्या वेळी संध्याकाळी वाजपेयीजी आले. आपल्या भावाचे अंत्यसंस्कार उरकून ते पुण्याला आले होते. आपल्या विराट सभेमध्ये त्यांनी टिप्पणी केली,
“एक भाई गया, अगर यहाँ न आता, दुसरा भाईभी जाता.”
कलमाडी यांना भाई म्हणून ओळखलं जात यावरून वाजपेयींनी कोटी केली होती. त्यांनी धर्माधिकारी यांना आपली उमेदवारी परत घेवून कलमाडी यांना पाठींबा देण्याची सूचना केली.
पुणेकरांना वाजपेयींचा संदेश स्पष्ट होता, सुरेशभाई कलमाडी यांना निवडून द्या.
अविनाश धर्माधिकारीनी उमेदवारी मागे घेतली नाही. पैशाच पाठबळ तर त्यांना नव्हतच. शिवाय त्यांच्या हक्काच्या मतदाराने त्यांच्याकडे पाठ फिरवली. खुद्द त्यांचे जवळचे त्यांना म्हणाले,
“तुम्हाला मत देणार नाही. आताच अटलजींनी स्पष्टपणे सांगितले आहे,”
निवडणुकीचा निकाल आल्यावर कळालं कलमाडी आणि धर्माधिकारी हे दोघेही पडले आहेत आणि कॉंग्रेसचे विठ्ठलराव तुपे यांचा विजय झाला आहे.
हे ही वाच भिडू.
- नगर दक्षिणच्या वादामुळं देशभरात आचारसंहिता ताकदीने लागू झाली.
- पंतप्रधान बनण्यासाठी दोन सरकारं पाडली, पण तरीही पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली !
- मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !
- फडणवीसांना पाहताच वाजपेयी म्हणाले, “व्वा व्वा ! क्या स्मार्ट मॉडेल है ये…”