संपूर्ण भाजपमध्ये फक्त वाजपेयींना जाणवलं होत, “आपलं सरकार पडणार आहे !”

साल होतं २००४. देशातली १४ वी लोकसभा निवडणूक. केंद्रात सलग पाच वर्षापर्यंत सत्ता चालवण्यात यशस्वी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत जबरदस्त झटका बसला आणि  पुन्हा सत्तेत येण्याचा चान्स हुकला. संपली संपली असं म्हणणाऱ्या कॉंग्रेसने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली जोरदार कमबॅक केलं होतं.  त्यांचे ४१७ पैकी  १४५  खासदार निवडून आले. पण मित्र पक्षांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. डॉ.मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान बनले.

हे अनेकांना अनपेक्षित होतं. आपली सत्ता येणार या कॉन्फिडन्स मध्ये असलेल्या भाजप नेत्यांना तर प्रचंड मोठा धक्का बसला. सत्तेच्या खुर्चीचा सवय लागलेल्या नेतेमंडळींची पायाखालची जमीन हादरली.

भाजपमध्ये फक्त एकच व्यक्ती होते ज्यांना आधीच ठाऊक होतं कि आपली सत्ता जाणार आहे.

ते होते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

वाजपेयींचे बऱ्याच वर्षांपर्यंत सहाय्यक राहिलेल्या शिवकुमार पारिक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितलाआहे. शिवकुमार हे आरएसएसचे कार्यकर्ता होते. नंतर ते जनसंघ कार्यकर्ता बनले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर ते अटलबिहारी वाजपेयींना भेटले आणि त्यांच्यासोबत सहाय्यक  म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त  केली. वाजपेयींना त्यांना होकार दिला. तेव्हापासून म्हणजेच १९६७ पासून शिवकुमार वाजपेयींसोबत जोडले गेले.

शिव कुमार सांगतात २००४ च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होती. लखनऊमध्ये  निवडणूक प्रचार आटपला  मध्यरात्रीच्या सुमारास वाजपेयीं दिल्लीला परतले. शिवकुमार त्यांची वाटच बघत बसले होते. आल्या आल्या अटलजी त्यांना म्हणाले,

‘सरकार गेलं आपलं, आपण हरणार आहोत.  ‘

वाजपेयींचं हे बोलन ऐकून शिवकुमार जरा चकित झाले. दुसऱ्या दिवशी मतदान होणार होतं. शायनिंग इंडियाच वातावरण अटलजींचे करिश्माई नेतृत्व, कारगिल युद्धातील विजय, सुवर्ण चतुष्कोण महामार्गाची उभारणी इत्यादी अनेक मुद्दे अटलजींच्या बाजूने होते. तरीही ते स्वतःच म्हणत होते कि आपला पराभव होणार आहे. शिवकुमार त्यांना म्हणाले,

‘आपण हरू नाही शकत’.

यावर वाजपेयींचं उत्तर आलं,

‘तुम्ही कोणत्या जगात जगताय ? मी लोकांमध्ये जाऊन निवडणुकीचा प्रचार करून आलोय.’

शिवकुमारांच्या म्हणण्यानुसार, २००४ मध्ये झालेल्या पराभवामाग दोन कारण होती. पाहिलं म्हणजे   ‘इंडिया शायनिंग’, जे भाजपच्या विरुद्ध गेलं होत आणि दुसरं म्हणजे लवकर निवडणुका घेण्याचा निर्णय. या निर्णयाशी अटल वाजपेयी सहमत नव्हते. पण त्यांचे लक्ष्मण समजल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या आग्रहामुळे हे दोन्ही निर्णय घेण्यात आले. पक्षानं निर्णय घेतल्यामुळ वाजपेयी याच्या विरोधात जाऊ शकले नाही.

भाजपमधले काही नेते म्हणतात की २००४ साली झालेल्या पराभवानंतर वाजपेयींनी स्वतःला सक्रीय राजकारणापासून दूर ठेवले होते. पण शिवकुमार यांनी याच खण्डन केलं आहे. ते म्हणतात  कि,

अटल वाजपेयींना विजयाचा किंवा पराभवामुळ कोणताच फरक पडत नव्हता. निवडणुकीत पराभवानंतर ते मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहिले, जिथं  त्यांनी सक्रिय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर ते आपल्या जवळच्या व्यक्तींच्या खाजगी कार्यकमात गेले. २००७ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत भैरोंसिंग शेखावत यांच्या उमेदवारीपर्यंत वाजपेयी  राजकारणात सक्रिय होते.

पारिक यांनी वाजपेयींना खूप जवळून पाहिलं होत. त्यांच्यामते वाजपेयींच जीवन एका  खुल्या पुस्तकासारखं होत.

वाजपेयी यांच्या निधनाबद्दल बोलताना ते म्हणाले ,

“आता मी अनाथ झालो.”

कारण वाजपेयी यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे जवळपास ४० वर्ष ते त्यांच्यासोबत होते. वाजपेयी यांच्या अंतिम संस्कारावेळी त्यांच्या कुटुंबियांशिवाय शिवकुमारचं होते ज्यांना चितेच्या जवळ जाण्याची परवानगी होती.

शिवकुमार पारिक म्हणतात, हा वाजपेयींनी घातलेला पायाच आहे, ज्यामुळे भाजपानं २०१४ च्या निवडणुकीत  केवळ सत्ताचं  मिळवली नाही, तर आपल्या हिमतीवर बहुमत मिळविणारी पहिला गैर- कॉंग्रेस पक्ष बनला.

दरम्यान,  पारीक यांना असेही वाटते कि, वाजपेयी यांच्या काळात भाजप  आणि कार्यकर्ते  यांच्यात जो  समन्वय होता, तो आता कुठेतरी हरवलेला दिसतोय.

हे ही वाचा भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.