पुण्यात पंतप्रधानांनी भविष्यवाणी केली आणि एका आठवड्यात मुख्यमंत्री पायउतार झाले

अटलबिहारी वाजपेयी यांचे आणि पुण्याशी जुनेपुराणे नाते आहे. नेहरू प्रधानमंत्री असताना जनसंघाच्या काळापासून वाजपेयी पुण्यात प्रचाराला यायचे. इथले ओले खोबरे घातलेले पोहे आणि तुपाची धार असलेली पुरण पोळी त्यांचे खास आवडीचे पदार्थ.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचे व अटलजींच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रसंग प्रसिद्ध आहेत. मात्र याच पुण्यात एक गंमतीशीर किस्सा झाला होता ज्यात अटलजींनी विलासरावांच्या राजीनाम्याची भविष्यवाणी केली होती.

गोष्ट आहे दोन हजारच्या दशकातली. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते.

शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ पुण्यात सवाई गंधर्व स्मारक मंदिर उभारलं होतं. जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या स्मारकाच्या उदघाटनाला अटलजींनी यावे अशी त्यांची इच्छा होती.

अटलजी हे स्वतः शास्त्रीय संगीताचे रसिक होते, भीमसेनजींच्या गायनाचा अनेकदा त्यांनी रसास्वाद घेतला होता. संपुर्ण भारतभराप्रमाणे वाजपेयी देखील त्यांच्या गायकीचे मोठे फॅन होते. जेव्हा भीमसेन जोशी निमंत्रण द्यायला दिल्लीला गेले तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचं उत्तमपणे स्वागत केलं. भीमसेनजी जोशींनी सवाई गंधर्व स्मारकाबद्दल सगळं सांगितलं.

वाजपेयींनी त्यांना कार्यक्रम कधी आहे असा प्रश्न केला. तेव्हा पंडितजी म्हणाले सहा महिन्यांनी पुण्यात कार्यक्रम ठेवला आहे. यावर वाजपेयी यांनी हसत हसत त्यांची फिरकी घेतली आणि म्हणाले ,

“तब तक अगर मै पंतप्रधान ना रहूं तो भी इस कार्यक्रम को आ सकता हूं ना ?”

लगेच भीमसेनजींनी लाजून हो हो का नाही असं उत्तर दिलं. वाजपेयी यावर गडगडाटी हसले.

खरोखर सहा महिन्यांनी कार्यक्रमाचा दिवस उजाडला. वाजपेयी अजूनही पंतप्रधान होते आणि ते दिलेल्या शब्दाप्रमाणे उदघाटनासाठी म्हणून पुण्याला आले.

मोठी जंगी सभा झाली. प्रोटोकॉलप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर होते. वाजपेयी भाषणाला उभे राहिले. नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलने त्यांनी सुरवात केली,

संगीत में लोगोंको जोडने की ताकद है, इसमें भाषा का कोई बंधन नहीं !”

भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी सहा महिन्यापुर्वीची भीमसेन जोशी यांची भेट आणि तो प्रसंग सांगितला. आजकालचे युती व आघाड्यांचे राजकारण यामुळे उद्या काय होईल कधी आपलीखुर्ची मोकळी करावी लागेल याचा काहीच अंदाज सांगता येत नाही असं ते म्हणाले. त्यानंतर काही क्षण थांबले, आपला भाषणातला वर्ल्ड फेमस पॉज घेतला आणि मागे  वळून विलासराव देशमुखांच्या कडे वळून पाहिलं, खट्याळ हसत म्हणाले,

“क्यूँ विलासराव ?”

विलासराव देशमुख आधी अवाक झाले. काही क्षणात सावरून हसत हसत मान डोलावली. सगळं सभागृह हास्याच्या स्फोटाने गाजून गेलं. वाजपेयींनी राजकारणातली संदिग्धता, महाराष्ट्रातदेखील विलास रावांना राष्ट्रवादी बरोबर आघाडी चे सरकार चालवण्यासाठी करावी लागत असलेली कसरत यावर गंमतीदार टिप्पणी केली. विलासरावांनी देखील खिलाडू वृत्तीने ती स्वीकारली.

खरा धक्का तर काहीच दिवसात बसला. वाजपेयींचा तो कार्यक्रम होऊन आठवडाही झाला नसेल मात्र तेवढ्यातच दिल्लीहून बातमी आली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सोनिया गांधी यांनी राजीनामा द्यायला लावला आहे.

खरं तर विलासराव देशमुख यांचं सरकार चांगलं चालू होतं. दोन पक्षांचे सरकार असल्यावर नेहमीच्या कुरबुरी चालणारच तश्या चालू होत्या. पण मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा अशी कोणतीही मोठी घटना घडली नव्हती.

नाही म्हणायला काँग्रेसच्याच इतर अनेक नेत्यांच्या महत्वाकांक्षा त्यातून रचलेल्या खेळ्या यात विलासराव देशमुखांची खुर्ची सापडली होती.

दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांनी विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी समाधानकारक नाही असं कारण देत राजीनामा द्यायला लावला. पुढे बऱ्याच उलाढाली झाल्या आणि विलासराव देशमुखांचे खास मित्र सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाली.

दिलदार विलासरावांनी मोठ्या मनाने त्यांच्या हातात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली. मात्र ते करत असताना त्यांना अटलजींचे भाषण आठवत राहिले.

दिल्लीतून महाराष्ट्रावर नजर ठेवणाऱ्या पंतप्रधानांना एक तर आधीच विलासरावांचे पद जाणार याचा सुगावा लागला होता किंवा भाषणात जोक म्हणून त्यांनी याचा उल्लेख केला. राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या वाजपेयींनी राजकीय आडाखा देखील बांधला असू शकेल.

ते काहीही असो पण आजही पुण्यातले जुने लोक ही घटना अटलजींची विलासरावांच्या बद्दलची भविष्यवाणी म्हणूनच आठवतात.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.