त्याकाळात चर्चा सुरु होती की वाजपेयी भाजप सोडणार आहेत ?

जून १९८९. हिमाचल प्रदेश येथील पालमपूर येथे भारतीय जनता पक्षाचे ऐतिहासिक अधिवेशन भरले होते. ऐतिहासिक याच्या साठी कारण याच अधिवेशनात भाजपचे भविष्य बदलणारे दोन महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते. या दोन्ही निर्णयाच्या पाठी मागे होते प्रमोद महाजन.

त्यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या. लालकृष्ण अडवाणी हे तेव्हा भाजपचे अध्यक्ष होते. 

भारतीय जनता पार्टीचा हा सर्वात वाईट कालखंड.  मागच्या निवडणुकीत लोकसभेत फक्त २ च खासदार निवडून आले होते. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली गांधीवादी समाजवाद भाजपला पचला नव्हता. यातच राजीव गांधीनी रामजन्मभूमीच्या मुद्द्याला हात घातला होता.

विहिपच्या जोरदारपणे सुरु असलेल्या रामजन्मभूमी आंदोलनाला कॉंग्रेसचा छुपा पाठींबा आहे, कॉंग्रेस बोफोर्सचे नुकसान भरून काढण्यासाठी मवाळ हिंदुत्व स्वीकारत आहे हे सरळ सरळ कळत होतं.

याला उत्तर देण्यासाठी भाजपने आक्रमक हिंदुत्ववाद स्वीकारावा अस मत प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांचं होतं.

सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनी पहिला ऐतिहासिक निर्णय मंजूर करून घेतला तो म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती करायची. 

१९८७ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अधिकृतपणे हिंदुत्वाची शाल पांघरली होती. त्यात झालेला विजय त्यांना आणि भाजपला आत्मविश्वास मिळवून देणारा ठरला. ही युती दोन्ही पक्षाला फायद्याची ठरणार याचा अंदाज महाजन यांनी व्यक्त केला.

अधिवेशनात पुढचा मुद्दा पास करण्यात आला राम जन्मभूमीचा. कॉंग्रेस आपली हक्काची मते पळवू नये यासाठी भाजपच्या चार प्रमुख नेत्यांनी देशभरात यात्रा सुरु करावी व राम मंदिरचे आंदोलन आक्रमक करावे असे सुचवण्यात आले.

भाजपचे सर्वात मोठे नेते अटलबिहारी वाजपेयी मात्र राम मंदिराचा मुद्दा राजकीय करण्याच्या विरोधात होते. पण त्यांनी या अधिवेशनात गप्प राहणे पसंत केले. महाजन व अडवाणी काय करत आहेत हे ते पहात होते.

मागच्या निवडणुकीतील पराभव वाजपेयी यांच्या इतका जिव्हारी लागला होता की ते राजकीय जीवनातून हळूहळू दूर होत चालले होते. संघाचा दबाव असल्यामुळे त्यांनी राममंदिराच्या मुद्द्याला मान्यता दिली होती.

पण तरीही चर्चा होती की वाजपेयी पक्ष सोडून जनता दलात जाणार आहेत.

जनतादलाचे अध्यक्ष व्ही.पी.सिंग यांनी आपल्या मंझील से ज्यादा सफर या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की वाजपेयींशी या बद्दल कधी थेट चर्चा झाली नाही पण जसवंतसिंग आणि भैरोसिंह शेखावत यांना याबद्दल ठाऊक होत.

अटलजी भाजपमध्ये खुश नव्हते.

पुढच्या निवडणुकीत बोफोर्स व शहाबानो प्रकरणात नाचक्की झाल्यामुळे राजीव गांधी यांच्या सरकारच्या जवळपास २०० सीट्स कमी झाले. तर भाजपचे ८८ खासदार निवडून आले. जनता दलाचे १४३ खासदार होते. वाजपेयींना लक्षात आलं की आपले अंदाज चुकत आहेत व अडवाणी-महाजन यांचं म्हणण बरोबर येत आहे.

वाजपेयी जनता दलात गेले नाहीत मात्र त्यांनी भाजपला जनता दलाच्या व्ही.पी.सिंग यांना सरकार स्थापण्यासाठी पाठींबा द्यायला लावला.  

अटलजींच्या पाठींब्यावर व्ही.पी.सिंग पंतप्रधान बनले. त्यांनी सरकार स्थापन केल्यावर मात्र पुरोगामी धोरणे राबवण्यास सुरवात केली. मंडल आयोग सारखे निर्णय घेतले. राममंदिर आंदोलनाला त्यांचा विरोध होता.

इकडे भाजपमध्ये अस्वस्थता वाढत चालली होती.

राजीव गांधी यांच्या पाठींब्यावर विहिंपने राममंदिराचा शिलान्यास केला होता. सरकारमध्ये असल्यामुळे आलेले शैथिल्य झटकून आंदोलन तीव्र करणे गरजेचे आहे हे महाजन यांनी अडवाणी यांना पटवून दिले.

अखेर लालकृष्ण अडवाणी, गोविंदाचार्य या नेत्यांनी पालमपूर अधिवेशनात ठरल्याप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनासाठी देशभरात यात्रा काढायचं ठरवलं. ही जबाबदारी दिली प्रमोद महाजन यांच्या कडे. महाजन यांच्या प्लॅननुसार देशाच्या चार दिशांहून वाजपेयी, अडवाणी, विजयाराजे शिंदे आणि सिकंदर बख्त या नेत्यांनी एकात्मता यात्रा काढायचं ठरलं.

गोरखपूरचे स्वामी अवैद्यनाथ यांनी ३० ऑक्टोबर १९९० ला राम मंदिराचे निर्माण सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. भाजपचा प्रयत्न होता की त्यापूर्वी देशभर यात्रा करून अयोध्येत पोहचायचे जेणे करून याचं श्रेय आपल्याला देखील मिळेल.

पण अडवाणी सोडले तर बाकीचे नेते यात्रेसाठी उत्सुक नव्हते. विजयाराजेंनी आजारी पडल्याच कारण देत यात्रेतून अंग काढून घेतलं. सिकंदर बख्त यांनी देखील नकार दिला.  

आता उरले वाजपेयी आणि अडवाणी.

महाजन यांचं मत होत की जम्मूमधून अटलजी आणि कन्याकुमारी येथून अडवाणी यांनी अर्धा अर्धा देश कव्हर करायचा. ते जेव्हा हे सांगायला वाजपेयी यांच्या कडे गेले तेव्हा वाजपेयी त्यांना गुश्श्यात म्हणाले,

“मै ये सब नौटंकी के उपर विश्वास नही करता.”

आता उरले फक्त लालकृष्ण अडवाणी. त्यांना एकट्यालाच अख्खा देश फिरावे लागणार होते. सोमनाथ ते अयोध्या हे १०००० किमी अंतर पदयात्रा काढायचं ठरल. महाजन यांनी त्यांना पदयात्रा काढण्याऐवजी टेम्पोसारख्या वाहनाने फिरायचा सल्ला दिला. त्यांनी स्वतः विचार करून ही गाडी डिझाईन केली.

या गाडीला नाव दिले, “राम रथ”

गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून रामरथ यात्रा सुरु झाली. या यात्रेला अपेक्षेपेक्षाही प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. जिथे जिथे जातील तिथे अडवाणी यांचे जोरदार द्वाग्त करण्यात येत होते. ही यात्रा जबरदस्त यशस्वी ठरली.

आता रथयात्रेचा अंतिम टप्पा होता. बंगाल,बिहार आणि शेवटी उत्तरप्रदेश. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव तर युपीमध्ये मुलायमसिंग यादव हे मुख्यमंत्री होते. या दोघांनीही अडवाणी जर रथयात्रा घेऊन आले तर त्यांना अटक करणार अशी घोषणा केली होती.

तेव्हा अडवाणी महाजन यांनी ठरवलं जर अस झाल तर जनतादलाचा केंद्रातला पाठींबा काढून घ्यायचा व व्ही.पी.सिंग सरकार पाडायचं.

अटलजींना जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांना हे आवडल नाही. त्यांना वाटत होत की रामजन्मभूमीचा तोडगा काढण्यासाठी व्ही.पी.सिंग सरकारचे प्रयत्न चालू आहेत. फक्त अयोध्येनंतर काशी, मथुरा इथले वाद उकरून काढायचे नाहीत या मुद्द्यावर घोडे अडले होते.

भारतीय जनता पार्टीची कार्यकारी मिटिंग बोलवण्यात आली.

वाजपेयी यांच्या गटातील अप्पा घटाटे बोलण्यास उठले तेव्हा महाजनांना कळाल की हा कोणता विषय काढणार आहेत. घटाटे बोलण्याआधी महाजन त्यांना तुमचं समर्थन आहे की नाही हे विचारू लागले.

आता मात्र वाजपेयी यांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी महाजन यांना खडसावले. घटाटे काय बोलत आहेत ते ऐकून तरी घ्या अस सुनावलं. अटलजींचा हा आक्रमक पवित्रा पहिल्यांदाच पाहणारे प्रमोद महाजन वरमले. काही न बोलता आपल्या खुर्चीत बसले.

त्या दिवशी भाजपच्या त्या मिटिंगमध्ये बरीच गरमागर्मी झाली. दोन्ही बाजूनी अनेक मुद्दे मांडले गेले पण अखेर निष्कर्ष काही निघाला नाही.

पुढे लालू यादव यांनी रथयात्रा अडवली आणि अडवाणी यांनी व्हीपी सिंग यांना पंतप्रधानपदावरून खाली खेचलं. येत्या काळात राजकीय गणिते बदलत गेली. अडवाणी यांच्या रथयात्रेचा परिणाम सगळीकडे राममंदिराचा वारं घुमू लागल. पुढच्या दोनच वर्षात कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.

भाजपच्या राजकारणात बाजूला पडलेले वाजपेयी काहीही करू शकले नाहीत. भाषणातून ते राममंदिराचे समर्थन करत होते पण मशीद पाडण्याच्या घटनेपासून त्यांनी स्वतःला लांब ठेवलं होतं हे मात्र नक्की.

एकदा त्यांना कोणी तरी पक्ष सोडण्याबद्दल विचारलं तेव्हा ते फक्त इतकच म्हणाले होते,

“जाये तो जाये कहां?”

पण योगायोग असा की पुढच्या काही वर्षांनी अशी वेळ आली की सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ कमी पडत असल्यामुळे भाजपला इतर पक्षांचा सहारा घ्यावा लागला. सर्वमान्य नेता म्हणून अडवाणी यांनी आपल्या ऐवजी वाजपेयींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ घातली. राजकारणातून निवृत्तीच्या तोंडावर असलेल्या वाजपेयींनी झोकात कमबॅक केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.