वाजपेयी लातुरात एक वाक्य बोलले आणि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला.

1998 साली निवडून आलेले केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए चे सरकार सुरळीत चालू असताना अचानक एआयएडीएमके च्या सर्वेसर्वा जयललिता यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलं. पण विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने अटलबिहारी वाजपेयी हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिले.

1999 च्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय निवडणूक आयोगाने 13 व्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली,

देशात त्यावेळी काँग्रेस अक्षरशः विखुरलेली होती, तिचं नेतृत्व नुकतंच राजकारणात पदार्पण केलेल्या सोनिया गांधी ह्या करत होत्या. शिवाय पक्षातून शरद पवार, संगमा व तारिक अन्वर यांची हकालपट्टी करण्यात आली होती त्यामुळे काँग्रेस पक्ष भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू शकणार नाही असे देशभर वातावरण निर्माण झाले होते.

अटलबिहारी वाजपेयी यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांची सर्वसमावेशक भूमिका भाजपच्या पथ्यावर पडणारी तर होतीच शिवाय 1996 ला व 1998 ला त्यांना त्यांच्याच सहकारी पक्षांनी दिलेल्या झटक्यामुळे त्यांच्या बद्दल जनसामान्यात एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते व भाजप याचा पुरेपूर फायदा उठवत अटलबिहारी वाजपेयी यांना देशभर फिरवत होते.

अशीच एक सभा घेण्यासाठी वाजपेयी लातूरला आले होते काही जण असे म्हणतात की वाजपेयी लातूरला सभा घेण्यास इच्छुक नव्हते पण काही कार्यकर्त्यांच्या खास आग्रहास्तव त्यांना लातूरला सभा घ्यावी लागली.

लातूर मधून काँग्रेसने शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली होती. चाकूरकर म्हणजे गांधी परिवाराशी सलोख्याचे संबंध असणारे पक्के काँग्रेसी शिवाय ते 1980 पासून सलग लातूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करत होते. यासह त्यांनी राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात विविध खात्याचे मंत्री पद सांभाळले होते अन 1991 ते 1996 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते.

या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष असतानाच लोकसभेचे व राज्यसभेचे दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण सुरू झाले तसेच संसदेत खासदारांसाठी ग्रंथालय देखील सुरू झाले होते. हुशार, विद्वान, संयमी,शांत अन कसल्याही भानगडीत न पडणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी चाकूरकरांची ओळख होती.

तर भाजपने लातूर शहरातील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ.गोपाळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती.

विशेष म्हणजे 1998 साली पण या दोघांतच लढत झाली होती त्यात डॉ.गोपाळराव पाटील यांनी चाकूरकर यांना जोरदार लढत दिल्याने ह्यावेळी डॉ.पाटील हे चाकूरकरांचा निश्चित पराभव करतील अशी चर्चा त्यावेळी पूर्ण मतदारसंघात होती असे आज ही लातूरचे नागरिक सांगतात. डॉ.गोपाळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी येणार असल्याचे स्पष्ट होताच डॉ.पाटील यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती असे सांगितले जाते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या त्या सभेचे ठिकाण होते लातूर शहरातील राजस्थान विद्यालयाचे मैदान.

त्यादिवशी हे मैदान तुडुंब भरले होते अनेक जण केवळ वाजपेयी काय बोलतात हे ऐकण्यासाठी आले होते. कारण म्हणजे चाकूरकर हे गेल्या वीस वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात होते त्यांचा अटलबिहारी वाजपेयी यांना चांगला परिचय होता ते चाकूरकरांबद्दल काय बोलणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती.

व्यासपीठावर भाजपचे उमेदवार डॉ.गोपाळराव पाटील यांच्या सह पहिल्या फळीतील सर्व नेते जातीने हजर होते, वाजपेयी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाला सुरुवात केली अन उपस्थित नागरिकांची मनं जिंकली. एक एक करत त्यांनी काँग्रेसवर आपले शाब्दिक बाण सोडले, पण स्थानिक उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बद्दल त्यांनी अजून चकार शब्द न काढल्याने भाजप समर्थकांत अस्वस्थता पसरली.

असं असतानाच अचानक वाजपेयी यांनी भर सभेत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बाबतीत ” शिवराज पाटील जी आदमी अच्छा है लेकीन पार्टी गलत है” असा उल्लेख केला.

सभेतील माणसे अक्षरशः निघून गेली अन भाजपच्या नेत्यांना नेमका अंदाज आला, मतदान झाल्यानंतर ज्या वेळी निकाल जाहीर करण्यात आला त्यावेळी अपेक्षेप्रमाणे शिवराज पाटील चाकूरकर हे सलग 7 व्यांदा लातूर मधून विजयी झाले होते.

नंतर काही दिवसानंतर वाजपेयी यांच्या नात्यातील एका मुलीने त्यांना ह्या बाबत विचारले असता वाजपेयी म्हणाले राजकीय फायद्यासाठी मी कधीच खोटं बोलणार नाही जे सत्य आहे ते मी बोलणारच.

याशिवाय पराभूत उमेदवार डॉ.गोपाळराव पाटील हे जेंव्हा नंतर अटलबिहारी वाजपेयी ह्यांना भेटले त्यावेळी माझ्या त्या एका वाक्यामुळे तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला असं वाजपेयी डॉ.पाटील यांना म्हणाले होते.

हल्लीच्या राजकारणात असं कुठं पहायला मिळत का? प्रत्येक जण सत्तेसाठी धडपडताना दिसतोय.

  • शिवशंकर वि बोपचंडे.
    मो.9834484743

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.