वाजपेयी स्वतःच म्हणाले, “मला मत देऊ नका, माझ्या विरोधकाला प्रचंड मतांनी विजयी करा.”

एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण  त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती.

भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु संसदेचे नेते होते. त्यावेळी संसदेत काँग्रेसकडे प्रचंड बहूमत होतं. विरोधी पक्ष फक्त नावापुरतेच होते. अनेक विरोधी पक्ष नेत्यांमध्ये देखील नेहरूंच्या नेतृत्वाविषयी एक आदरपूर्वक दरारा होता. त्यामुळे विरोधी नेते दचकून असायचे. अशावेळी संसदेत फक्त ४ सदस्य असणाऱ्या पक्षाचा तरुण खासदार पाठीमागच्या बेंचवर वरून नेहरुंवर प्रश्नांची सरबत्ती करायचा.

तो तरुण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.

ते वर्ष होत १९५७. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे तळागाळात जाऊन कार्य करणाऱ्या व श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे भावी वारसदार म्हणवल्या जाणाऱ्या वाजपेयींना पहिल्यांदाच लोकसभेचं तिकीट मिळालं होतं. जनसंघाने त्यांना दोन ठिकाणी उभं केलं होतं. एक म्हणजे बलरामपूर आणि दुसरं म्हणजे मथुरा. दोन्ही देखील उत्तरप्रदेश मधील मतदारसंघ होते.

स्वातंत्र्यलढ्याला फार काळ उलटला नव्हता त्यामुळे काँग्रेसची प्रचंड मोठी लाट होती.  तरीही जनसंघाला ज्या मोजक्या उमेदवारांकडून अपेक्षा होत्या त्यात होते अटलबिहारी वाजपेयी.

वाजपेयी आपल्या जबरदस्त वक्तृत्व शैलीने सभा जिंकत. त्यांची शुद्ध मिठास वाणी हिंदी वर असलेली पकडीमुळे युपीच्या मतदारांना जिंकत चालले होते. बलरामपूरमध्ये त्यांची जोरदार हवा होती पण मथुरेत त्यांच्या समोर आव्हान होतं ते म्हणजे राजा महेंद्रप्रताप सिंग यांचं.

राजा महेंद्र प्रताप हे मूळचे हाथरसचे. स्वातंत्र्यलढ्याचे मोठे क्रांतिकारक. पहिल्या महायुद्धाच्या काळात अफगाणिस्तानमध्ये त्यांनी भारताचं पहिलं अंतरिम सरकार बनवलं होतं आणि ते देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष देखील बनले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते जपान मध्ये गेले होते. तिथल्या सरकारच्या मदतीने आझाद हिंद साठी त्यांनी प्रयत्न केले होते.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला. आणि अपक्ष राहून राजकरणात उतरले. १९५२ सालच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. एवढा मोठा क्रांतिकारक लोकसभेत जावा अशीच कित्येकांची इच्छा होती. त्यात स्वतः वाजपेयी देखील होते. राजा महेंद्र प्रताप सिंह यांचा झालेला पराभव त्यांना देखील पटलं नव्हता.

वाजपेयींनी मथुरेतून फॉर्म भरल्यानंतर त्यांना कळलं कि आपल्या विरुद्ध राजा महेंद्र सिंह उभे आहेत. पक्षाचा आदेश असल्यामुळे त्यांना तिकट देखील मागे घेता येत नव्हतं. 

मथुरेतल्या गांधी पार्कमध्ये वाजपेयींच्या प्रचाराला सभा भरली. प्रचंड गर्दी जमली होती. अटलजी आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष होतं. ते बोलण्यासाठी उभे राहिले.

 मथुरेतील लोकांनो तुम्ही जसं माझ्यावर प्रेम करत आहात तसंच प्रमे मला बलरामपूर इथंही मिळत आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही राजा महेंद्र प्रताप यांना विजयी करा. माझी काळजी करू नका. देवाला वाटत असेल तर मी बलरामपूरमध्ये जिंकेन.

 आपली पहिलीच निवडणूक असूनही त्यांनी क्रांतिकारकासाठी स्वतःची पणाला लावलेली खासदारकी लोकांना भावली. त्यांनी वाजपेयींच्या या आवाहनाचा आदर केला. राजा महेंद्र प्रताप सिंग यांना प्रचंड प्रमाणात मतदान करण्यात आलं. संघाच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांनाच मतदान केलं. महेंद्र प्रताप सिंग यांनी काँग्रेसच्या प्रो. कृष्णराय यांचा मोठा पराभव केला. 

वाजपेयी मथुरेत चौथ्या स्थानावर राहिले. त्यांचं डिपॉजिट देखील जप्त झालं होतं. पण बलरामपूर मध्ये मात्र त्यांनी निसटता विजय मिळवला आणि लोकसभेत पोहचले. एक उमेदवार स्वतःच मला मत देऊ नका म्हणून प्रचार करतोय हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आणि शेवटचं घडलं होतं.

हे हि वाच भिडू :

  

Leave A Reply

Your email address will not be published.