राज तिलक की करो तयारी आ रहे है अटलबिहारी

साल होतं एकोणीसशे ऐंशी. आणिबाणीच्या आठवणी धूसर झाल्या होत्या. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आरोळी ठोकत सत्तेत आलेल्या जनता पक्षाचे आपापसात भांडून अनेक तुकडे झाले होते. बॅकफूटला गेलेल्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी झोकात परतल्या होत्या. त्यांना पाठिंबा देणाऱ्या जनतेचा देखील भ्रमनिरास झाला होता. 

जनता पक्षाची जी अनेक शकले झाली त्यात भारतीय जनता पक्षाचा देखील समावेश होता. पूर्वाश्रमीचा हा जनसंघ. इंदिरा गांधींच्या हुकूमशाही विरुद्ध लढाईसाठी ते जयप्रकाश नारायण यांच्या झेंड्याखाली जनता पक्षात विलीन झाले होते. पण पुढे त्यांच्या हिंदुत्ववादी  विचारावरून वाद झाले आणि जनसंघाचे नेते पक्षातून बाहेर पडले.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नव्या भाजपची स्थापना केली. या पक्षाला कमळ हे चिन्ह मिळालं. भारतीय जनता पक्षाला तळागाळात पोहचवण्यासाठी वाजपेयी आणि अडवाणी प्रयत्न करत होते पण निवडणुकांमध्ये यश मिळत नव्हतं. नेतेच नाही तर कार्यकर्त्यांमध्ये देखील नैराश्य येत होतं.

अशातच १९८० च्या डिसेंबर महिन्यात भाजपचं एक अधिवेशन मुंबईत वांद्रे रेक्लेमेशनवर आयोजित करण्यात आलं. 

भाजपने अधिवेशन आयोजित केलं खरं पण त्याला किती लोक हजर राहणार याची कोणालाही शाश्वती नव्हती. राम नाईक, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते अधिवेशन यशस्वी व्हावं म्हणून झटत होते. देशभरातून फार तर १५ हजार कार्यकर्ते येतील, असा त्यांचा अंदाज होता. या साऱ्यांच्या मुक्कामासाठी तंबू उभारले होते.

राम नाईक आपल्या आठवणींमध्ये सांगतात,  

कधी नव्हे ती मुंबईत थंडी होती, त्यात तो खाडीचा भाग- त्यामुळं बोचरा वाराही. थंडीपासून तंबू किती बचाव करू शकतील, याबाबत मनात शंका होती. त्यात महाअधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्षात ५८ हजार लोक अधिवेशनाला आले. अक्षरशः उघड्यावर या लोकांच्या झोपण्याची सोय करावी लागली. 

अनपेक्षित पणे एवढी गर्दी झाल्यामुळे सगळेच गांगरून गेले होते. तेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते अटलबिहारी वाजपेयी. रात्र वाढू लागली तसे वाजपेयी बेचैन होऊ लागले. लोकांची व्यवस्था कशी झाली आहे, त्यांना थंडीचा त्रास होत आहे का हे पाहायला ते एकटेच चालू लागले.

राम नाईक, वामनराव परब, प्रकाश मेहता हे देखील आपल्या खोलीतून बाहेर पडले. इतक्‍या मध्यरात्री झोपेवर पाणी सोडून हिंडणाऱ्या या मनस्वी नेत्याबद्दल तिघांच्याही मनात अपार आदर व कौतुक दाटून आलं होतं. त्यांनी जीपमधून मैदानाला फेरी मारायचा निर्णय घेतला.

 वामनराव जीप हाकायला बसले आणि ते चौघे पाहणीला निघाले. थंडी वाऱ्यात प्रत्येक कार्यकर्त्याची राहण्याखाण्याची व्यवस्था झालीय का बघत हे नेते मध्ये रात्रीच्या अंधारात फिरत होते. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अधिवेशनातील मुख्य भाषणे सुरु झाली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले न्यायमूर्ती  एमसी छागला म्हणाले,

“मी उद्याच्या भविष्यातल्या रुलिंग पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत आहे आणि माझ्या शेजारी बसलेले अटलबिहारी वाजपेयी देशाचे भावी प्रधानमंत्री आहेत. “

हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खासदार निवडून येणाऱ्या पक्षाबद्दल हि भविष्यवाणी म्हणजे कोणाला तरी हास्यास्पद वाटली असती. पण त्यावेळी भाजप कार्यकर्ते दुर्दम्य आत्मविश्वासाने भारावून गेले होते.

 सूर्य मावळतीला निघाला होता. वाजपेयी भाषण करायला उभे राहिले,

“अरबी समुद्रातील हा सूर्यास्त होत आहे. त्याला साक्ष ठेवून मी देशाला सांगू इच्छितो की,

अंधेरा छटेगा कमल खिलेगा सूरज निकलेगा.”

वाजपेयींच्या जादुई शब्दांनी तिथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निराळाच उत्साह भरला. पराभवाचे सावट दूर करून नव्या आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ त्या शब्दांनी दिले.

“अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा…’ हे केवळ टाळीचं वाक्‍य नव्हतं, तर प्रचंड आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांची ती अभिव्यक्ती होती.

मुंबईमध्ये झालेल्या त्या अभूतपूर्व सभेनंतर कार्यकर्त्यांच्या एवढं लक्षात आलं भाजपची सत्ता येण्यासाठी पुढचं पाऊल पडलं आहे. त्या सभेमध्ये गजर होत असलेली “राज तिलक कि करा तयारी आ रहे है अटलबिहारी हि घोषणा फक्त काहीच वर्षात सत्यात उतरणार होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.