गुलाबाचा इमोजी नसता.. तर रोझ डे लय भारी साजरा झाला असता भिडू

सकाळ सकाळ कुठंतर तुम्ही रोझ डे बद्दल वाचलं असणार, आयुष्यात कोण असेल तर त्याला/तिला गुलाब दिला असणार, काहीच नाही तर व्हॉट्सअपवर तरी गुलाब आला असणार… आणि या गटात कुठंच बसत नसाल तर रांझनामधला कुंदन बनून कुणाला तरी गुलाब दिला असणार… यातलंही काहीच केलं नसेल..

तर जरा लाजा धरा लाजा!

आज आहे रोझ डे. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या सात दिवसांच्या व्हॅलेंटाईन वीकमधलं पहिलं पुष्प आज असतंय. एवढा मोठा आठवडा म्हणल्यावर वातावरण गुलाबी होणार, जुन्या विषयांची आठवण होणार.. काळजाच्या तारा छेडल्या जाणार आणि कुठंतरी नवी कळी फुलणार. त्यामुळं या सगळ्यात थोड्या आठवणी, थोड्या टिप्सची ही काळजात घुसणारी गोष्ट…

आता कसंय आपल्याकडं दार पाच वर्षांनी पिढी बदलत असती आणि जास्त आगाऊ होत असती… त्यामुळं प्रत्येकाचा एक्सपिरीयन्स वेगळाय… जितका आमच्या डोळ्यांनी, कानांनी आणि काळजानी अनुभवला तेवढा सांगतो…

तर आधी कसं हे रोझ डे वैगरेचं फॅड नव्हतं. घरच्या लँडलाईनवर मिस कॉल देऊन पोरी पटवणाऱ्यांचे हात वरती!!! हा आली का आठवण आता चला पुढं… तेव्हा पोरीशी नुसतं बोललं तरी लय भारी वाटायचं आणि शेकहँड केला तर हात धुताना पण हजार वेळा विचार करावा लागायचा. तरीही डेरिंगबाज पोरांनी दिलजमाई केली. तेव्हा नुसती तिची वही मिळाली तरी खुश होणारी ही पोरं मोठी होईपर्यंत हे रोझ डे वैगेरे काय आलं नव्हतं… त्यामुळं यांचे रोझ डे सात फेब्रुवारीला नसतात.

एक दोस्त सांगत होता… ‘ती एकदा विहिरीपाशी भेटली, मी म्हणलं छान दिसतियेस, लई वेळ हातात हात घेऊन परशा-आर्ची सारखं थांबलो, जाताना केसातला गुलाब हातात देऊन गेली. त्यादिवशी तारीख होती, १८ ऑगस्ट… माझ्यासाठी तोच रोझ डे आहे भावा. फेब्रुवारीचं कौतुक नाय.’

पुढची पिढी म्हणजे ऑनलाईन शिक्षण सुरू व्हायच्या आत कॉलेज केलेली लकी गॅंग. ही गाभडी आत्ता नव्या नव्या जॉबला आहेत. यांनी लय जीवाचा व्हॅलेंटाईन वीक केला. सात तारखेला तिला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला दहा रुपयाचा गुलाब दिला असणार. त्या एवढ्याश्या गुलाबात थर्माकोलचे गोळे, वरनं चमकी आणि पोरीचं दिलखुष… आता ती गुलाबवाली एका पोराची आई झाली… तरीही ते गुलाबवालं आपल्याला विचारतं… दादा घ्या की गुलाब! लय दर्द ओ… तसा १० रुपयांचा खर्च काय जड गेला नाय.. पण बोटाला लागलेली चमकी अधूनमधून आठवते आणि आपला बाजार उठतो.

मनं जुळली किंवा नाय जुळली या दोन पिढ्यांनी प्रेम लय भारी केलं.. घरच्यांपासून लपवून, चोरून… कधी मार खाऊन आणि कधी रडून. जे काय केलं.. शंभर टक्के अनुभवलं. या पिढीनं खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन वीकचा ट्रेंड मार्केटमध्ये आणला. सात दिवस सात गिफ्ट, डेट, किस डे च्या आधी लिप बाम घेणं असले लय उद्योग यांनी एन्जॉय केले.

त्यानंतरची पिढी मात्र सोशल मीडियानं पार बाद केली आणि या डेजमधली सगळी मजाच गेली…

हजार मॅटर करुन हे दिवस साजरे करण्यातली मजा सोशल मीडियामुळं पार सपक झाली. म्हणजे बघा एक दोस्त सांगत होता… ‘एका पोरीसाठी लय दिवस झाले गळ टाकलाय, जरा कुठं टप्प्यात विषय आलाय. रोझ डे आहे म्हणल्यावर भेटू ठरवलं होतं, तेवढीच गुलाबाची देवाणघेवाण होईल. तिला म्हणलं आज भेटूयात का? तर पोरगीनं रिप्लाय दिला… ”हॅप्पी रोझ डे. हा माझ्याकडून तुला 🌹” इतक्या दिवसाची मेहनत पोरीनं एका इमोजीवर पाण्यात घालवली बघ…’

आजच्या दिवसात अशा लय स्टोऱ्या घावतील, ज्यांचं इमोजीवर भागलंय. त्यात दुसरी जनता आपली लाडकी… दिलजले मित्रमंडळ. ज्यांचा गुलाब घेतला पण काही न बोलताच बॅगेत, रस्त्यावर गेला. ज्यांच्या हॅप्पी रोझ डे 🌹 या मेसेजला 👍 हा असला रिप्लाय आला. त्यांच्यासाठी दोन मिनिटं शांतता. आज इमोजीच नसते तर पोरांना भेटायचं कारण घावलं असतं आणि लव्हस्टोरीला सुरुवात झाली असती. पण चालायचंच… ज्यांचा ज्यांचा बाजार उठलाय त्यांनी त्यांनी कुठंतर लिहून ठेवा…

शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही…

अजूनही सहा दिवस उरलेत भिडू, हिम्मत हरू नका. लग्न झालेलं असलं तरी नवरा-बायकोला खुश करण्याचा चांगला चान्स आहे. इमोजीत गुंतून राहू नका… जरा शायऱ्या शोधा, आठवणी जागवा… कुठलं तर पुस्तक चाळताना सुकलेल्या पाकळ्या सापडल्या.. तर त्या तेवढ्या जपून ठेवा. 

बाकी प्रेम ही लय भारी गोष्ट आहे… नाद नाहीच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.