आज वामन जयंती; वामन देवाने बळी राज्याच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवले त्याची ही कथा

भाद्रपद शुक्ल द्वादशीला भगवान विष्णूचा पाचवा समजला जाणाऱ्या वामन देवांची जयंती साजरी केली जाते. आज ७ सप्टेंबर रोजी देशात अनेक ठिकाणी वामन देवाची विशेष पूजा केली जाते. अनेक भक्त उपवास सुद्धा करतात.

श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान विष्णूने इंद्राला स्वर्गाचा अधिपती बहाल करण्यासाठी वामन म्हणून अवतार घेतला. ऋषी कश्यप आणि देव माता अदिती यांचा मुलगा म्हणून भगवान विष्णूने बटू ब्राह्मण म्हणून जन्म घेतला. ते वामन अवतार म्हणून ओळखले जातात, ते विष्णूचे पाचवे अवतार होते.

पौराणिक कथेनुसार,

शक्तिशाली राजा बळीने इंद्रदेवाचा पराभव केला आणि स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जेव्हा असुरराज बळीने आपल्या तप आणि पराक्रमाने स्वर्ग लोक, भू लोक आणि पाताळावर ताबा घेतला. जेव्हा इंद्रदेवाचा अधिकार स्वर्गातून हिरावून घेतला गेला तेव्हा इंद्रदेव इतर देवांसह भगवान विष्णूंकडे पोहोचले. भगवान विष्णूला आपली वेदना सांगून इंद्रदेवांनी मदतीची याचना केली.

देवतांची अशी अवस्था पाहून भगवान विष्णूंनी राजा बळीच्या अत्याचारातून तिन्ही लोकची मुक्तता करण्यासाठी माता अदितीच्या गर्भातून वामन अवतार म्हणून जन्म घेण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाचवा जन्म घेतला.

असुर राजा बळी हे विष्णू भक्त प्रल्हाद यांचा नातू होते. आणि त्याच्या वचनबद्धतेसाठी आणि परोपकारासाठी प्रसिद्ध होते. राजा बळी नर्मदा नदीच्या काठी अश्वमेध यज्ञ करत होते. भगवान वामन त्या यज्ञाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. बाल ब्रह्मचारी वामनाला पाहून राजा बळीने त्यांचे स्वागत केले आणि दान मागण्यास सांगितले.

भगवान विष्णूने  ब्रह्मचारी वामनाच्या रूपात असुरराजांना फक्त तीन पावले जमीन दान करण्यास सांगितले. असुरांचे गुरु शुक्राचार्यांना यात कपटाची जाणीव होती, त्यांनी राजा बळीला दान देण्यास नकार दिला. आणि राजा बळीला सुद्धा देऊ नकोस असे सांगितले. 

राजा बळीने विचार केला की मी तिन्ही जगाचा स्वामी आहे, मी सहज तीन पावले जमीन देऊ शकतो. असुर राजा दानधर्माप्रती असलेले कर्तव्य पाहून  तीन पावले जमीन दान करण्यास तयार झाले. तेव्हा वामन भगवानांनी आपले विशाल रूप दाखविले. भगवान वामनाने एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात आकाश व्यापले. आणि तिसरी पाऊल ठेवण्यासाठी असुर राजाकडे जमीन मागितली.

राजा बाली यांच्याकडे आता कुठलीच जागा उरली नव्हती. त्यामुळे त्यांनी भगवान वामनासमोर आपले डोके ठेवले. भगवान वामनाने वामनदेवाने राजा बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवताच ते पाताळात गेले. भगवान वामन त्याच्या दानावर प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा बळीला पाताळलोकाचा स्वामी बनविल्याचे पुराणकथेत आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.