वंचित आघाडीमुळे या जागांवर बसला फटका ? किती खरं ?
बहुप्रतिक्षित २०१९सालचा लोकसभा निकाल हाती येतोय. अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. मोदी लाट अजून ओसरली नाही हे दाखवून देणारा हा निकाल होता. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी हा मोठा फॅक्टर ठरणार ही चर्चा होतीच आणि घडलेही तसेच.
सध्या आरोप होतोय की वंचित आघाडीचा सर्वात मोठे बळी ठरले ते म्हणजे कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे. त्यातही अशोक चव्हाणांचा पराभव कॉंग्रेसला जिव्हारी लागणारा आहे.
२०१४ साली जेव्हा मोदी लाट आली तेव्हा कॉंग्रेसकडून फक्त अशोक चव्हाण या लाटेला सामना करून निवडून आले आणि शिवाय त्यांनी आपल्या शेजारच्या मतदारसंघातून राजीव सातव यांना देखील निवडून आणलं होतं. नांदेड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मागे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही नांदेडकरांनी दाखवून दिल होतं की फक्त अशोक चव्हाणाचा आदेश नांदेड मध्ये चालतो. पण या निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले.
अशोक चव्हाणांच्या विरुद्ध भाजपने प्रतापराव पाटील चिखलीकर यानां उमेदवारी दिली होती. त्यांची स्वतःची लोकप्रियता, मोदींची सुप्त लाट यामुळे चिखलीकर हे अशोक चव्हाणांना जड जाणार हे दिसत होतंच. ही लढत काट्याची झाली. चव्हाणांना भाजपपेक्षा जवळपास चाळीस हजार मते कमी पडली. याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना १ लाख ३१ हजार मते मिळाली.
चव्हाणांना पाडण्यात वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला.
बुलढाणा, गडचिरोली, हातकणंगले, माढा, परभणी, नांदेड, सांगली, यवतमाळ आणि सोलापूर या मतदार संघात वंचित आघाडी तिसऱ्या नंबरवर राहिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला की वंचितने या निवडणुकीत भाजपची बी टीम म्हणून काम केलं आणि महाआघाडीची मते खाल्ली. पण चन्द्रपूर, रायगड इथे भाजपाचे ही उमेदवार पाडण्यात वंचित फॅक्टर कारणीभूत ठरला होता.
या उलट वंचित आघाडीला जागेवर विजयाचा आत्मविश्वास होता त्या सोलापूर आणि अकोला या दोन्ही जागेवरून खुद्द प्रकाश आंबेडकर पराभूत झाले. फक्त औरंगाबाद येथून एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले.
आज अनेकजण प्रश्न विचारत आहेत. खरोखर वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम म्हणून ही निवडणूक लढली का? जर कॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांची आघाडी झाली असती तर याचा फायदा वंचितला ही झाला असता काय? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या पक्षांचा रोल काय असेल??
येणारा काळचं या प्रश्नांना उत्तर देईल.