पदवीधर निवडणूकीत वंचित फॅक्टर संपला का..?

मागच्या दोन वर्षात प्रत्येक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चर्चा होती. २०१८ साली ऍड.प्रकाश आंबेडकरांनी धनगर, माळी, ओबीसी, भटके व विमुक्त जाती जमाती आणि दलितांची मोट बांधून ही आघाडी निर्माण केली होती. २०१९ च्या निवडणुकीत असादुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने त्यांना पाठिंबा दिला.

प्रकाश आंबेडकरांनी २०१९च्या निवडणुकीत  काँग्रेसबरोबर आघाडी करताना १२ जागा मागून खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसने त्याला नकार दिला आणि वंचितचे ४८ उमेदवार निवडणुकीला उभे राहिले. जेव्हा निकाल हाती आला तेव्हा त्यांचा एकच उमेदवार म्हणजे एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले.

खुद्द प्रकाश आंबेडकर दोन जागी पडले पण वंचित फॅक्टर संपूर्ण राज्यभरात दिसून आला.

अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन माजी मुख्यमंत्री वंचितने मते खाल्ल्यामुळे आपटले. बहुजन व ओबीसी समाजातील बरीच मते वंचितने आपल्याकडे वळवून घेतली. प्रकाश आंबेडकरांनी केलेला आक्रमक प्रचार देखील याला कारणीभूत ठरला होता.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी वंचितला भाजपची बी टीम ठरवलं.

हाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकीवेळी दिसून आला. वंचीत ने तब्बल २३४ जागी आपले उमेदवार दाखल केले होते. हे सर्व जण पडले मात्र प्रत्येक ठिकाणी दलित, मुस्लिम व इतर बहुजन मते वंचितने खेचून आणली. दहा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना क्रमांक दोनची मते मिळाली होती, तर अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वंचितचा फॅक्टर कमी प्रमाणात का असेना कायम राहिला.

यावेळच्या विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

पदवीधर साठी औरंगाबादमधून नागोराव पांचाळ पुणे येथून सोमनाथ साळुंखे तर नागपूर राहुल वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर सम्राट शिंदे यांना पुणे शिक्षकची उमेदवारी देण्यात आली.

कोरोना काळात पंढरपूर येथील मंदिर उघडण्याच्या मुद्दयावरून आक्रमक झालेले प्रकाश आंबेडकर हे पूर्ण शक्तीनिशी या निवडणुकीत उतरतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिमा एक अभ्यासू नेता म्हणून ओळखली जाते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारे प्रकाश आंबेडकर उच्चशिक्षितांना आकर्षित करून घेण्यात यशस्वी होतील असाच अंदाज केला जात होता.

या निवडणुकीसाठी सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करून आंबेडकरांनी वंचित फॅक्टर दाखवून देण्याची चांगली तयारी देखील केली होती. विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अरुण लाड विरुद्ध भाजपच्या संग्राम देशमुख या हाय व्होल्टेज सामन्यात प्रा.सोमनाथ साळुंखे चमत्कार दाखवू शकतील अशी चर्चा होती. कमीतकमी दुसऱ्या पसंतीची मते मिळवून आपला दबाव गट कायम आहे हे दाखवण्याचा वंचितचा प्रयत्न असणार होता.

पण अगदी सुरवातीच्या प्रचारापासून वंचितचा आक्रमकपणा दिसलाच नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे धुरळा उडवला आहे हे दिसले नाही. त्यांच्या आक्रमकतेच्या अभावामुळे वंचित फॅक्टर दिसलाच नाही.

पुण्याच्या पदवीधरचा निकाल जाहीर झाला तेव्हा अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाला.

त्यांना १,२२,१४५ मते मिळाली, तर विरोधात असलेल्या भाजपच्या संग्राम देशमुख यांना ७३,३२१ मते मिळाली. लाड यांनी ४८ हजारांची आघाडी घेतली. पण विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे वंचितच्या सोमनाथ साळुंखे यांना फक्त ३,१३९ मते मिळाली. त्यांच्या पेक्षा मनसेच्या रुपाली ठोंबरे व जनता दलाचे प्रा.शरद पाटील यांना जास्त मते मिळाली.

अपक्ष असलेल्या श्रींमंत कोकाटे यांनी देखील वंचितच्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली. अरुण लाड यांची मते खाण्यासाठी उभे असलेले डमी उमेदवार अरुण अण्णा लाड यांनी जवळपास सोमनाथ साळुंखे यांच्या इतकी मते मिळवल्या मुळे वंचित फॅक्टर संपूर्ण पणे फेल गेला असल्याचे दिसून आले. दुसऱ्या पसंतीची मते मिळवण्यात त्यांना अपयश आले.

हीच गोष्ट औरंगाबाद पदवीधरची

इथे देखील  महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे थेट बहुमत मिळवत निवडून आले. त्यांना १,१६,६३८ मते मिळाली तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना जेवळपास निम्मी म्हणजे ५८ हजार मते मिळाली.

मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये वंचितचा जोर दिसून आला होता मात्र या पदवीधर निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला. त्यांच्या नागोराव पांचाळ यांनाफक्त ८,९९३ मते पडली. प्रहार संघटनेकडून उभ्या असलेल्या सचिन ढवळे यांना त्यांच्यापेक्षा जवळपास दोन हजार मते जास्त मिळाली आहेत.

नागपूर पदवीधर मध्ये वेगळी परिस्थिती नाही.

तिथला फायनल निकाल अजूनही हाती आला नसला तरी तिसऱ्या फेरी अखेर अभिजित वंजारी १५ हजारांच्या मोठ्या आघाडीवर होते. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांनी संदीप जोशींचा पराभव निश्चित केला आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार नितेश कराळे, परिवर्तन आघाडीचे उमेदवार अतुलकुमार खोब्रागडे यांनी या फेऱ्यांमध्ये वंचितच्या राहुल वानखेडे यांच्यापेक्षा जास्त मते मिळवलेली दिसत होती.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर होते.

दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत हे होते तर भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती होते. येथे देखील काँग्रेस उमेदवाराचा विजय होताना दिसून येत आहे.

याचाच अर्थ वंचितच्या हक्काच्या मतांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. वंचित फॅक्टर या निवडणुकीत तरी फेल गेला आहे असेच म्हणावे लागेल.

हे ही वाच भिडू.

   

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.