आधी म्हैस आता बैल धडकला की वंदे भारत एक्सप्रेसचं नाक तुटतंच त्यामागं हे जेन्युईन कारण आहे…

वंदे भारत एक्सप्रेस जेव्हा पहिल्यांदा सुरु झाली होती तेव्हा या ट्रेनने नुसता धुरळा उडवला होता. बुलेट ट्रेनची कार्बन कॉपी असलेली ही रेल्वे ५२ सेकंदामध्ये १०० किलोमीटर प्रतिघंटा वेग पकडू शकते, बाकी रेल्वेमध्ये डब्याचं वजन ४३० टन असत तर या ट्रेनच्या डब्याचं वजन ३९२ टन आहे. १८० डिग्रीवर फिरू शकणाऱ्या सीट्स आणि प्रत्येक डब्ब्यात ३२ इंचीचा टीव्ही या फीचर्समुळे या रेल्वेचा मोठा गाजावाजा झाला. 

या सगळ्या फीचर्सबरोबर रेल्वेत आणखी एक फिचर होता तो म्हणजे, ही रेल्वे एखाद्या गोष्टीला धडकली तरी ती रुळावरून खाली उतरणार नाही.

हे झालं सुरुवातीचं मात्र आता ही ट्रेन एकाच बातमीमुळे चर्चेत येते.

जनावरांच्या धडकेत वंदे भारत एक्सप्रेसचा समोरचा भाग पुन्हा तुटला….

मुंबई-अहमदाबाद रूटवर चालणारी वंदे भारत एक्सप्रेस आजपर्यंत पाच वेळ जनावरांना धडकली आहे आणि आतापर्यंतच्या पाचही धडकांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा पुढचा भाग तुटला आहे. एकीकडे ही ट्रेन किती मजबूत आणि उत्तम आहे याबद्दल चर्चा होते तर दुसरीकडे साध्या जनावरांच्या धडकेत एक्सप्रेसचा नाक तुटतो. 

पण प्रत्येक वेळी जनावरांच्या धडकेत एक्सप्रेसचा नाक का बरं तुटतो? 

तर याच कारण आहे या इंजिनाच्या बनावटीत. पारंपरिक रेल्वेचे इंजिन पाहिल्यावर ते एकदम सपाट पद्धतीने बनवलेले दिसतात, मात्र वंदे भारत एक्सप्रेसचं इंजिन मात्र नाकासारखं निमुळत्या आकाराचं दिसतं. त्यामुळे आपल्याला वाटत इंजिनाचा खराखुरा आकार तसाच असेल. 

परंतु वंदे भारत एक्सप्रेसच्या इंजिनाचा आकार पूर्णपणे तसा नाही. एक्सप्रेसच्या इंजिनचा फक्त काच लावलेला भाग हा मागे निमुळता झालेला आहे. तर खालचा भाग हा इतर ट्रेनसारखा सपाटच आहे, पण या एक्सप्रेसची स्पीड जास्त असल्यामुळे खालच्या भागाला सुद्धा फायबरचं नाक लावून निमुळता आकार देण्यात आला आहे. 

हे फायबरचं निमुळतं नाक लावण्यामागे सुद्धा एक कारण आहे.

ते असं की, जेव्हा ट्रेन एखाद्या जनावराला, गाडीला किंवा पडलेल्या झाडाला धडकते तेव्हा या धडकेमुळे संपूर्ण ट्रेनला धक्का बसतो. असा धक्का मोठा असेल तर ट्रेन रुळावरून घसरून जाते आणि मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची एरोडायनॅमिक डिजाईन करताना ही गोष्ट लक्षात घेण्यात आली आणि एक्सप्रेसला मजबूत नाक जोडण्याच्या जागी फायबरचं नाक जोडण्यात आलं.

या नाकामुळे एक्सप्रेसला हवेचा दाब सांभाळण्यात मदत तर होतेच, सोबतच एखाद्या जनावराला धडक झाल्यास हे नाक तुटून जातं त्यामुळे बाकी ट्रेनला याचा धक्का बसत नाही. म्हणूनच वंदे भारत एक्सप्रेस जेव्हा जेव्हा जनावरांना धडकते तेव्हा फक्त एक्सप्रेसचं नाक तुटत आणि बाकी ट्रेन सुरक्षित राहते.

जरी जनावरांच्या धडकेत एक्सप्रेसचं नाक तुटत असलं तरी रेल्वेला याची फारशी काळजी करण्याची गरज नाही.

कारण हे नाक तुटणारच आहे याबद्दल रेल्वेला आगोदरच माहित आहे. त्यामुळे रेल्वेने वंदे भारतची निर्मिती करतांनाच अधिकच्या १०-१० नाकाची निर्मिती करून ठेवली आहे. या एका नाकाची किंमत साधारणपणे १०-१५ हजार रुपये आहे. म्हणून जेव्हा वंदे भारतचं नाक तुटतं तेव्हा रेल्वेकडून तुटलेलं नाक काढलं जातं आणि नवीन नाक बसवलं जातं.

यासोबतच आणखी एक प्रश्न पडला असेल की, निव्वळ वंदे भारत ट्रेनचा जनावरांना धडकते का?

तर नाही, भारतातील सर्व प्रकारच्या ट्रेन जनावरांना धडकतात. या वर्षी भारतात एकूण ४,४३३ ट्रेन जनावरांना धडकल्या आहेत. त्यात जानेवारी महिन्यात ३६० घटना घडल्या होत्या तर सप्टेंबर महिन्यात ६३५ घटना घडल्या होत्या. ज्या काळात जनावरांच्या मोकळं फिरायला जागा असते तेव्हा धडक कमी होतात. तर जनावरांना फिरण्यासाठी जागा कमी असली की ते रेल्वे रुळावर येतात आणि जनावरांच्या धडक वाढतात.

परंतु बाकी ट्रेनचे इंजिन तुटत नाहीत त्यामुळे बाकी ट्रेनची जास्त चर्चा होत नाही, पण वंदे भारत नेहमी चर्चेत येते.  

वंदे भारत एक्सप्रेस आणि जनावरांची धडक होण्याचे प्रकार मुंबई-अहमदाबाद मार्गावर मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर कुंपण करण्यात आलंय. परंतु अनेक गावं रेल्वे रुळाच्या एका बाजूला आहेत तर त्या गावातील लोकांचे शेत दुसऱ्या बाजूला आहेत. त्यामुळे जनावरांच्या धडका होत आहेत.

या धडक रोखण्यासाठी प्रशासनाकडून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात या धडक कमी होण्याची शक्यता आहे. पण चुकून पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेस जनावरांना धडकली आणि तिचं नाक तुटलं तर यात मोठं भारी नुकसान झालं असं समजू नका.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.