वंजारी आणि बंजारा समाजातील फरक काय ?

सह्याद्री -सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यात वसलेला कृष्णा गोदा भीमा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. छत्रपतींच्या काळापासून अठरापगड जाती जमाती, भाषा, संस्कृती असणारे लोक इथे गुण्या गोविंदाने नांदतात. आधुनिक जीवनात या संस्कृतींमधील फरक मिटत जात असला तरी आजही काही संस्कृती आहेत ज्यांनी आपला शेकडो वर्षांचा वारसा जपून ठेवला आहे.

यातच येतात वंजारा आणि बंजारा समाज.

अनेकदा वंजारा आणि बंजारा यांना एकच समजण्याची गल्लत आपल्या पैकी अनेकांकडून केली जाऊ शकते. मात्र नामसाधर्म्य सोडल्यास या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत.

बंजारा समाज :

गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखला जाणारा हा समाज. देशभरात विखुरलेला तांड्याने फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बंजारी समाजाचा सिंधू संस्कृती पर्यंत  इतिहास जोडला जातो. एकेकाळी हि व्यापारी जात होती. बैलांच्या पाठीवर मिठ लादून हजारो किलोमीटर प्रवास करत ते मिठाचा व्यापार करायचे. लवणाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लमाण असे म्हटले जाते.

हजारो वर्षांपासून बंजारा फक्त व्यापार करत नव्हते तर वेगवेगळ्या लढाईमध्ये गुंतलेल्या सैन्याला रसद पोहचवण्याचंही काम करत होते.  ते युद्ध प्रसंगी तटस्थ असत. दोन्ही बाजूच्या सैन्याला धान्य पुरवण्याचे काम ते निष्ठेने करत. डोक्यावर लावलेल्या लिंबाच्या डहाळीवरून ओळखत असे कि सैन्याला रसद पुरवणारे लमाणी आले आहेत. त्यांना कोणताही सैनिक इजा करत नसे.

मुघलांच्या काळात राजस्थानमधून बंजारा महाराष्ट्रात आले. इथे मराठा साम्राज्याच्या सैन्याला देखील त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात बंजारा तांडा ज्या भागातून फिरायचा तेथे रस्ता तयार व्हायचा. त्यांनी शेकडो तळी, विहिरि बांधल्या. धर्मशाळा उभारल्या. किल्ले बांधले.

एकेकाळी अतिशय श्रीमंत असणारा बंजारा समाज इंग्रजांच्या काळात रेल्वे आल्यामुळे व्यापार बंद पडला आणि देशोधडीला लागला. जंगलात लाकूड फाटा गोळा करणे व इतर कामे करून गुजराण करू लागला.

पण कंपनी सरकारने त्यांचं नाव गुन्हेगारी जमातीमध्ये टाकलं. जंगल कायद्यामुळे गोंद चारोळी, मोळ्या विकण्यावर देखील घातली. पोटापाण्याचा हा उद्योग देखील हिरावून घेण्यात आला.

या कारणामुळे तत्कालीन बंजारा समाजातील तरुण गुन्हेगारी कडे वळला.

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भागोजी नाईक यांच्या सारखे स्वातंत्र्ययोद्धे निर्माण झाले. बंजारा समाजाला संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र त्यांना देखील चिरडून टाकण्यात आले.

महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा खानदेश भागात लमाणी तांडे कायमचे वसले. काही तांडे शेती व्यवसाय करू लागले. स्त्रियापुरुष बांधकामाच्या कामावर मजुरी करू लागले. विहिरी फोडू लागला. अलीकडच्या काळात ऊसतोड कामगार म्हणून देखील बंजारा समाज काम करताना दिसतो.

बंजारा समाजाची ओळख म्हणजे हडप्पा काळापासून चालत असलेली विशिष्ट आभूषणे अलंकार आणि रंगेबीरंगी वस्त्रे. मागच्या पिढीच्या बंजारा स्त्रिया आजही या लमाणी वेशात दिसतात. त्यांचा संवाद देखील गोर भाषेमध्ये चालतो. चौहान, राठोड, राणावत, परमार हे राजपुतांशी नाते सांगणारे आडनाव हि देखील बंजारांची ओळख.

विदर्भ मराठवाड्याच्या सीमांवर हे तांडे पाहवयास मिळतात. सेवालाल महाराजांचा भक्त असणारा बंजारा समाज त्यांच्या हजारो वर्षांच्या परंपरा,नृत्य, गाणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न आजही करत असतो. १९५२ साली स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यामुळे या जातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला  गेला. आरक्षणाचे लाभ मिळाले. शेतमजुरी मागे पडून हा समाज प्रगतिशील शेती करू लागला.

वंजारी :

वंजारी समाजाचा इतिहास थोड्याफार प्रमाणात बंजारा समाजाप्रमाणेच आहे असं सांगितलं जातं. ही देखील व्यापारी जमात. देशभर बैलांच्या पाठीवर मालवाहतूक करून भटकंती केली जायची. फक्त व्यापारीच नाही तर ही लढाऊ जमात मानली जायची. राजस्थानमध्ये असं मानलं जातं की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत. राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे प्रधान सेनापती होते. त्यांना कडवे योद्धे मानले जायचे.

इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी आपल्या एका लेखात सांगितल्यानुसार अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत.

वंजारी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश होता असा दावा केला जातो.  

इंग्रजांच्या काळात या समाजावरही गुन्हेगारीचा शिक्का पडला. नाईलाजाने या लोकांना शेतमजुरीकडे वळावे लागले. धर्माजी मुंडे सारख्या स्वातंत्र्यसैनिकाच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केले.

स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का हटून या समाजाला आरक्षण मिळाले. बीड परभणी पाथर्डीच्या भागात मोठ्या प्रमाणात बहुसंख्यने वंजारी समाज राहतो. काही प्रमाणात शेतजमिनी देखील असून दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन उसतोडीवर आपला उदर निर्वाह करत होत्या.

गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव वाढला आणि या परिस्थितीमध्ये फरक पडत गेला. आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर वंजारी समाजाने प्रगती साधलेली पाहावयास मिळते.

वंजारा आणि बंजारा एकच आहे कि वेगळे?

पूर्वापार हा वाद चालत आलेला पाहावयास मिळतो. वंजारी आणि बंजारा यांच्यात नामसाधर्म्य असलं तरी दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत असं मानलं जातं. दोन्ही समाजाच्या भाषा, संस्कृती वेगवेगळया आहेत. दोन्ही समाजातील आडनावे देखील वेगळी आहेत. वंजारी समाज भगवान बाबांचा अनुयायी असला तर बंजारा समाज संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो.

दोन्ही समाजातील रीतिरिवाज, मंदिरे, परंपरा वेगवेगळ्या आहेत. दोन्ही जमातींमध्ये रोटी बेटीचा व्यवहार होताना दिसत नाही. अनेक अर्थाने वेगळ्या असल्या तरीही काही अभ्यासक सामाजिक दृष्ट्या दोन्ही जमातींचा उगम एकच असण्याची शक्यता आहे असे सांगतात.  

१९३२ सालच्या जनगणनेमध्ये इंग्रजांनी या दोन्ही जमाती एक असल्याचं मानलं होतं. स्वातंत्र्यानंतर वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नामुळे बंजारा समाजाचा समावेश विमुक्त जाती प्रवर्गात केला. वंजारी समाज मात्र ओबीसी मध्ये राहिला. पण १९७४ सालात सरकारने भटक्या व विमुक्त जातींना पदोन्नती मध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर टायपिंग मिस्टेक,नामसाधर्म्य यामुळे वंजारा- वंजारी ऐवजी बंजारा असे ऊल्लेख असलेल्या अनेक अधिकारी-कर्मचारी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत अनेक वाद निर्माण होऊन न्यायालयीन लढायांना सुरुवात झाली. बंजारा समाजाप्रमाणे वंजारी सुद्धा भटक्या विमुक्त जाती आहे या मुद्द्यावर समाजाने लढा दिला.

१९८० च्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रभाव वाढल्यावर या न्यायालयीन लढ्याला बळ मिळाले. राजेश्वरी देशपांडे यांनी लिहिलेल्या Caste Associations in the Post-Mandal Era: Notes from Maharashtra या संशोधन प्रबंधामध्ये लिहिलेलं आहे कि काँग्रेस आणि मराठा राजकारणाला तोंड देण्यासाठी भाजपने माधव माळी धनगर वंजारी या जातींना ताकद देण्यास प्रारंभ केला.

 १९९१ साली मंडल आयोगामुळे इतर मागासांना आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने ओबीसी १०% वरुन १७% तर भटक्या विमुक्त प्रवर्गास ४% वरुन १०% इतके आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

यातुन निर्माण एका खटल्या दरम्यान अचानक १९९२ साली नागपुर च्या मॅट प्राधीकरणाने ‘वंजारी व बंजारा एक की वेगळे’ याचा अभ्यास करण्याची राज्य सरकारला सुचना केली. पवार मुख्यमंत्री असलेल्या तत्कालिन सरकारने पुणे येथील गोखले इन्स्टिट्युट च्या डाॅ.डी.सी.वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली.

या वाधवा समितीने वंजारी व बंजारा यांचा ऊगम एकच असला तरी ते भिन्न आहेत असा अहवाल राज्यसरकारला दिला. पुढे युतीचे शासन आल्यावर भटके विमुक्त प्रवर्गात आंतरपरिवर्तनाचा शासन निर्णय घेऊन वंजारी समजला NT (D) आरक्षणाचा लाभ मिळवून दिला.

 हे ही वाच भिडू.

 

 

 

2 Comments
 1. Lad Laxman D says

  धर्माजी प्रतापराव मुंडे नसून धर्माजी प्रतापराव गर्जे आहे
  संदर्भ हातोला व नागझरी ता आष्टी जि बीड या ठिकाणी त्या चे वंशज आहेत

 2. Lad Laxman D says

  भिडू,
  धर्माजी प्रतापराव मुंडे नसून धर्माजी प्रतापराव गर्जे आहे
  संदर्भ हातोला व नागझरी ता आष्टी जि बीड या ठिकाणी त्या चे वंशज आहेत
  व त्यांच्या गढी आहेत चुकिची माहिती पसरवू नका
  वंशज-नागनाथ भारतराव गर्जे
  9284539509

Leave A Reply

Your email address will not be published.