ऑडियो कॅसेट्स आलेला मराठीतला पहिला लेखक म्हणजे वपु काळे

जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर असाल तर तुम्हाला सकाळ सकाळी एका माणसाचे बरेच सुविचार विविध पेजवर दिसतात. मानवी भावभावनांचे विचार असो किंवा प्रेयसी, बायको, प्रेम अशा हजारो गोष्टींवर लिहून ठेवलय ती व्यक्ती म्हणजे वपु काळे. त्यातही जर तुम्ही वाचक चांगले असाल आणि वपु काळेंच पुस्तक जर तुमच्या वाचनात आलं नसेल तर तुमच्या वाचनावर शंका घेतली जाते.

तर आज वपु काळेंबद्दल माहिती करून घेऊया. मराठी भाषेला आणि मराठी मनाला खऱ्या अर्थाने कोणी समृद्ध केलं असेल आणि वाचनाची गोडी लावली असेल तर ते वपु काळे या लेखकाने. वपु काळेंचं पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. २५ मार्च १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबई महानगरपालिकेत ते होते पण पेशाने ते आर्किटेक्चर होते म्हणजे वास्तुविशारद.

ते विशेष म्हणजे चांगले श्रोते होते. त्यांना व्हायोलिन वाजवायची आवड होती. पण आर्किटेक्चर असलेला हा माणूस पुढे मराठीतला सगळ्यात प्रसिद्ध लेखक बनला. कथाकथनकार, कादंबरीकार अशी अनेक बिरुदं लावता येतील इतका प्रतिभावान लेखक मराठी भाषेला लाभला होता.

एक वाक्य तर सोशल मीडियावर कायम फिरत असतं

मला एकाने विचारलं कि वपु म्हणजे काय ? तर मी म्हणालो वपु म्हणजे जीवनाचे सार.

यावरून वपु काळेंच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. म्हणजे जर तुम्ही वपु काळेंच्या एखाद्या कट्टर वाचकाकडे वपुंच्या कथा असलेलं पुस्तक पाहिलं तर त्यात बऱ्याच वाक्यांना अंडरलाईन केलेलं असतं. वपुंच्या कादंबऱ्यामधली वाक्ये हि परत परत वाचावी वाटतात.

बऱ्याचदा एखाद वाक्य वाचून झाल्यावर जर पुढे गेलो तर ते वाक्य पुन्हा वाचावं वाटतं. एखाद वाक्य त्यांनी इतक्या सहजपणे मांडलेलं असतं पण त्याचा अर्थ बराच खोल असतो आणि ते वाक्य मनाला लागतं. वपुर्झा आणि पार्टनर या त्यांच्या दोन कादंबऱ्या अगदी अत्युच्च दर्जाच्या आहेत. आपण सारे अर्जुन, वन फॉर द रोड, दोस्त, पाणपोई, वपु ८५ , सखी, महोत्सव, गुलमोहर अशी दर्जेदार पुस्तक त्यांनी लिहिली. 

चंद्र,सूर्य, लोकल, सेक्स, धर्म, दारू अशा सगळ्या गोष्टींवर वपुंनी भरभरून लिहिलं. त्यांच्या कथांच्या आकंठ प्रेमात बुडालेली माणसे आहेत, त्यांचे विचार अनेकांना जगण्याची उमेद देतात. रूपकांमधून मांडणी करून ते खऱ्या आयुष्याचा अर्थ लावायला शिकवतात. ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तब्बल ६० पुस्तके लिहिली. सगळीच्या सगळी पुस्तके बेस्टसेलर ठरली.

वपुंचे कोट्स सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्ध आहेत. मराठीमध्ये पहिल्यांदा एखाद्या लेखकाचं ऑडिओ कॅसेट आलं ते वपु काळेंच्या रूपाने. पुलं देशपांडेनासुद्धा वपु काळेंनी प्रसिद्धीच्या बाबतीत मागे टाकले होते. वपुंची काही निवडक वाक्य आहेत जी बऱ्याच ठिकाणी आढळतात, काहींना त्या ओळी सुखावतात तर काहींना गंभीर करतात, काहींना प्रेरणादायी ठरतात तर काहींना त्यांचं लेखन म्हणजे स्वतःच आयुष्य वाटू लागतं. 

वपुंची काही गाजलेली वाक्य –

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!

जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!

खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती….

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.