मुंबईचा डॉन थेट राजीव गांधीच्या सभेत स्टेजवर उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसला होता.

मुंबई, मायानगरीची ओळख ही एकेकाळी अंडरवर्ल्डची राजधानी अशी होती. अनेक हाजी मस्तान पासून अरुण गवळीपर्यंत सगळे या शहरात मोठे झाले. प्रत्येकाने एक काळ गाजवला. पण यात मुंबईमध्ये राहून मुंबईचा डॉन होणं ही तशी सोपी गोष्ट होती. पण हजारो किलोमिटर लांबून येवून मुंबईवर राज्य करणारे क्वचितच.

असाच एक तरुण तमिळनाडूनमधून मुंबईत आला आणि इथला पहिला हिंदू डॉन बनला. इथल्या गुन्हेगारी क्षेत्रात त्याने आपल्या नावाची ओळख बनवली. ज्याला मुंबईमध्ये तमिळांचा मसिहा म्हणून संबोधल गेले. ज्याला स्वतः हाजी मस्ताने मायानगरीचा माफिया बनवले.

१९७०च्या दशकतील मुंबईचा बाहुबली, ताकतवान गँगस्टर असा सगळाच असलेला वरदराजन मुदालियर उर्फ वरदा भाई….

हमाली ते मुंबईचा माफिया…

‘वरदा भाई’चा जन्‍म १९२६ मध्ये तमिळनाडूच्‍या तूतीकोरिन मधला. वडिल लहानपणीच गेल्याने ६० च्या दशकात तो रोजगारासाठी मुंबईत आला. सुरुवातीला व्‍ह‍िक्टोरिया टर्मिनन्सवर (आताचे छ. शिवाजी महाराज टर्मिनन्स) कुली म्‍हणून काम केले. लोकांची ओझी उचलत स्वतःच्या आयुष्याचा गाडा ओढत होता.

हिंदू असतानाही जवळच असलेल्य बिस्मिल्ला दर्ग्‍यावर त्‍याची विशेष श्रद्धा होती. तो रोज ‘नियाज़’ अदा करत असे. आपले महत्‍त्‍वाचे काम होताच या दर्ग्‍यावर जायचा. हमाली करत असला तरी तिथे तो गरीबांना मोफत जेवण द्यायचा.

याच स्टेशनवरुन त्याचे नशिब पलटायला सुरुवात झाली. एकदा स्टेशनवर ओझं उचलत असताना त्याची ओळख दारुची तस्करी करणाऱ्यांसोबत झाली. पैशांच्या आशेने तो या क्षेत्रात ओढला गेला.

दारुच्या धंद्यातुन चिक्कार पैसा मिळायला लागल्यावर कालांतराने याच स्‍टेशनवरून त्‍याने सर्व प्रकारच्या अमली पदार्थांची तस्‍करी सुरू केली. नंतर चोरी, कॉन्‍ट्रॅक्ट किलिंगचे काम करु लागला. यातुन त्याचे बिल्डर, राजकारण्यांशी संपर्क वाढत होता आणि त्यांच्या रोजच्या उठण्या-बसण्यातील होता. त्याच्या नावाचा बोलबाला पंचक्रोशित होवू लागला.

अंडर वर्ल्ड डॉन हाजी मस्तानची भेट…

गुन्हेगारीच्या लाईनला आला म्हणजे अंडर वर्ल्डशी संबंध आपसुक आलाच. त्याकाळी मुंबईत हाजी मस्तान आणि करीम लाला यांच नाणं चालायचे. पहिल्यांदा तर वरदराजन एजंट म्हणून तस्करीत काम करायचा. नंतर पैसा आणि डेअरिंग वाढल्यावर त्याने स्वतःचा तस्करीचा उद्योग चालू केला.

त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी तमिळ लोकांविरुद्ध उघडलेले आंदोलन ऐन भरात होते. वरदराजन देखील तमिळनाडूचा आणि तमिळच. त्याने आता तमिळ अस्मितेला पुढे करत मुंबईत राहणाऱ्या तमिळ लोकांच संघटन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातुन आपला उद्योग वाढवत होता.

पण अडचन अशी होती की हाजी मस्तान शिवाय या क्षेत्रातल पान पण हालत नव्हते. त्यामुळे त्याला भेटून त्याची परवानगी घेणे वरदराजनसाठी गरजेचे होते.

वरदराजने हाजीची भेट घेतली, त्याचा विश्वास जिंकला अन् मुंबईच्या बंदरावर काम करण्यासाठी हाजी मस्तानने वरदराजनला परवानगी दिली. इथून त्याने आता परदेशातुन तस्करी सुरु केली. मग त्याची भेट झाली करीम लालाशी. त्यानंतर त्याने जमिनींचे देखील व्यवहार सुरु केले. जमिनी विकणे, अतिक्रमीत प्रॉपर्टी मोकळ्या करणे, फ्लॅट रिकामे करणे अशी काम करु लागला.

बंदरावर काम करताना त्याने आता ड्रग्जची देखील तस्करी चालू केली. ७०च्या दशकात हाजी मस्तानने मुंबईच्या दोन वाटण्या केल्या. ईस्ट आणि नार्थ मुंबईची जबाबदारी वरदराजन मुदालियरला तर साउथ आणि सेंट्रल मुंबईचे काम करीम लाला याला संभाळायला दिली. तर तस्करी आणि अवैध उद्योग स्वतः हाजी मस्तान संभाळायचा. या वाटण्यांनंतर वरदराजन अधिकृतरित्या मुंबईवर राज्य करु लागला.

राजकारणात देखील क्लोज कॉन्टॅक्ट…

यानंतर गुन्हेगारी क्षेत्रासोबतच त्याचे राजकारणातील देखील संपर्क वाढत होते. ते ही इतके जवळजे होते की जाहिर सभांमध्ये त्याला महत्वाच्या नेत्यांशेजारी बसायला जागा मिळायची. त्याच्या म्हणण्यानुसार त्या सभांना देखील तोच पैसे पुरवत असे.

१९८० मध्ये संजय गांधी यांच्या मृत्यु झाल्यानंतर १९८१ राजीव गांधी यांचा हळू हळू राजकारणात प्रवेश होत होता. त्या दरम्यान त्यांची धारावी इथे एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत कॉंग्रेसची सगळी जेष्ठ मंडळी हजर होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले रामराव आदिक यांच्या अगदी शेजारीच वरदराजन अर्थात वरदभाई पायावर पाय टाकून बसला होता.

मुंबई पालिकेत त्यावेळी वॉर्ड ऑफिसर असलेल्या आणि पुढे उपायुक्त झालेले गोविंद राघो खैरनार आपल्या ‘एकाकी झुंज’ या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला आहे. धारावीमधील त्या सभेसाठी अतिक्रमण हटवून जागा करण्याची जबाबदारी खैरनार यांच्यावर होती. तो पक्षाचा कार्यक्रम असल्याने आणि ते महापालिकेच्या सेवेत असल्याने ते लांबुनच हा सगळा प्रकार पाहत होते.

मात्र एका कुख्यात डॉनला उपमुख्यमंत्र्याच्या शेजारी बसलेले बघून आपण पुरते गोंधळून गेलो होतो. असे खैरनार सांगतात.

पुढे वरदाभाई एके दिवशी खैरनार यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी आला. खरतर तो ‘मदत’ करण्याची व जुळवून घेण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. त्यावेळी खैरनार यांनी राजीव गांधींच्या सभेमधील उपस्थितीबाबतीत आणि ते ही उपमुख्यमंत्र्यांशेजारी बसण्यासाठी विचारले असता वरदभाईने सांगायला सुरुवात केली,

माझ्या शिवाय ती सभा झालीच नसती. खरतर सगळी सभा ही माझ्या पैशावरच झाली होती. त्यामुळे मला उपमुख्यमंत्र्याशेजारी जागा मिळाली म्हणून आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते.

त्याची दहशत एवढी होती की खैरनार यांना एकदा एका बडय़ा पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच वरदाभाईच्या उपस्थितीत, ‘वरदाभाईशी जुळवून घ्या,’ असा सल्ला देण्यात आला होता. असं म्हणतात की पोलिस देखील त्याच्या धारावी आणि माटुंगा एरियामध्ये जात नव्हते. जर कधी जायची गरज पडलीच तर त्याची परवानगी घेवून जाणं व्हायचे.

शेवटी एका पोलिसानेच संपवले भय…

सत्तर – ऐंशीच्‍या दशकात त्‍याची दहशत वाढतच होती. त्‍यामुळे पोलिस त्रस्‍त झाले होते. त्याचे वाढते साम्राज्य ही मुंबईसाठी चिंतेची गोष्ट बनली होती. त्‍यावेळी त्‍याच्‍या गँगला संपवण्‍याचा विडा उचलला तो वाय. सी. पवार या धडाडीच्या पोलिस अधिकाऱ्याने.

पवार यांनी सगळ्यात पहिल्यांदा वरदराजनचा अहंकार मोडित काढला ते तो करत असलेला गणपती पुजा थांबवून. माटुंगा भागात स्टेशनच्या बाहेर तो खूप मोठी गणेश पुजा करायचा. आणि नेमकी तीच त्यांनी सगळ्यांसमोर दम देवून थांबवली.

८० चे दशक मुंबईसाठी एक असा काळ होता, ज्यात करीम लालाची पठान गँग आणि दाऊद इब्राहिमची गँग या दोघांमध्ये गँगवॉर पेटलेले असायचे. आता पर्यंत शांत असणारे मुंबईचे रस्ते रक्ताने लाल होवू पाहत होते. पेपरच्या रोजच्या पानावर याच गँगवॉरच्या बातम्या असायच्या.

त्यामुळे या दोन्ही गँगना यातच संपावयच असा प्लॅन पोलिसांनी तयार केला. आणि जी गँग राहिल तिला आपण संपवू. हाजी मस्तान तर आधीच ही लाईन सोडून समाजसुधारक झाला होता. राहिला प्रश्न वरदराजनचा. आणि तोच नेमका पोलिसांचा रडारवर आला होता.

यानंतर पवारांनी एक-एक करून वरदराजनच्‍या सर्वच गँगमेंबरला एक तर ठार केले किंवा जेलमध्‍ये डांबले. वाय. सी. पवारांना मोठी रक्कम ऑफर करण्यात आली. पण त्याचा फायदा शुन्य. वरदा भाईचे सगळे अवैध उद्योग बंद पाडले. दारुची ठिकाणी बंद पाडली. या अधिकाऱ्याला मुंबईतील हा सर्वात मोठा डॉन प्रचंड घाबरला आणि १९८३ च्या आसपास जीव वाचवण्यासाठी त्‍याने मुंबई सोडून चेन्नईमध्‍ये आश्रय घेतला.

पण शेवटी मुंबईच….

२ जानेवारी १९८८ रोजी चेन्नईमध्ये वरदराजनचा हार्टॲटकने मृत्यु झाला. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार हाजी मस्तानने त्याचा मृतदेह इंडियन एयरलाइंसच्या एक चार्टर्ड विमानाने अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणला. तेव्हा माटुंगा, सायन, कोळीवाडा या सगळ्या भागातील हजारो लोक वरदभाईच्या अंत्यसंस्कारासाठी जमले होते.

आयुष्यावर चित्रपट देखील निघाले आहेत….

वरदराजनच्या आयुष्यावर साऊथमध्ये अनेक सिनेमे बनले आहेत. १९८७ मध्ये मणिरत्नमने नागायन नावाचा तमिळ चित्रपट बनवला. त्यानंतर १९८८ मध्ये हिंदी फिल्म दयावान मध्ये वरदराजनचा रोल विनोद खन्नाने केला होता.

१९९१ मध्ये मल्यालम फिल्म अभिमन्यु मध्ये एक रोल वरदराजनवर होता. अमिताभ बच्चनने एकदा एका मुलाखतीमनमध्ये बोलताना सांगितले होते की अग्निपथमध्ये काही डायलॉग त्यांनी वरदराजनच्या स्टाईलमध्ये बोलले होते. २०१३ मध्ये थलाईवा या तमिळ चित्रपटामध्ये सत्यराज नावाचे एक कॅरॅक्टर वरदराजनवर आधारित होते. २०१५ मध्ये रिलीज झालेली तमिळ फिल्म ‘यागावाराईनम ना कक्का’ मध्ये मिथुन चक्रवर्तीने वरदराजनचा रोल केला होता. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.