डॉनने मुंबई कमिशनरच्या बदलीसाठी दिल्लीत पैसे पाठवले, मुख्यमंत्र्यांनी डाव हाणून पाडला

वरदराजन मुदलियार ‘वरदा भाई’च्‍या नावाने या डॉनला मुंबई ओळखत असे. त्‍याचा जन्‍म तमिलनाडूच्‍या ‘तूतीकोरिन’ मध्‍ये झाला. रोजगारासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला व्‍ह‍िक्टोरिया टर्मिनल स्टेशनवर त्‍याने कुली म्‍हणून काम केले. याच स्‍टेशनवरून त्‍याने अमली पदार्थांची तस्‍करी सुरू केली.

पुढे त्‍याचा दबदबा वाढला. नंतर त्‍याने चोरी, कॉन्‍ट्रॅक्ट किलिंगचे काम सुरू केले. त्याचा दबदबा पूर्ण शहरात पसरला.

ऐंशीच दशक उजाडेपर्यंत हाजी मस्तानने गुन्हेगारी विश्वातून निवृत्ती स्वीकारली होती. करीम लाला, दाऊद सारखे डॉन होते पण दाऊद अजून तितका मोठा व्हायचा होता  आणि करीम लैलाच्या पठाण गॅंगची सगळी ताकद दाऊदच्या गॅंग बरोबर लढण्यात गुंतली होती.

या सगळ्यामुळे मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये स्वतःला हिंदू डॉन म्हणवून घेणारा वरदराजन मुदलियार हे सर्वात मोठे नाव बनले होते.

माटुंगा परिसरात त्‍याचा बंगला होता. दरवर्षी या ठिकाणी तो अंत्‍यत भव्‍यतेने गणेशोत्‍सव साजरा करत होता. त्याची दहशत वाढतच चालली होती. त्‍यामुळे पोलिस त्रस्‍त झाले होते.

अखेर वरदाला आवर घालण्यासाठी समोर आले तेव्हाचे पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो.

रिबेरो आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जायचे. मुंबईच्या अंडरवर्ल्डची पाळेमुळे खणून काढण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली होती. वरदराजन मुदलियारची केस एका तरुण अधिकाऱ्याकडे सोपवली होती. त्यांचं नाव वाय.सी.पवार.

पवार यांनी सगळ्यात पहिल्यांदा वरदराजनचा अहंकार मोडित काढला ते तो करत असलेला गणपती पुजा थांबवून. माटुंगा भागात स्टेशनच्या बाहेर तो खूप मोठी गणेश पुजा करायचा. आणि नेमकी तीच त्यांनी सगळ्यांसमोर दम देवून थांबवली.

यानंतर पवारांनी एक-एक करून वरदराजनच्‍या सर्वच गँगमेंबरला एक तर ठार केले किंवा जेलमध्‍ये डांबले.

असं म्हणतात की रिबेरो आणि वाय.सी.पवार यांना वरदराजनने मोठी रक्कम ऑफर दिली होती. पण त्याचा फायदा शुन्य. वरदा भाईचे सगळे अवैध उद्योग बंद पाडले. दारुची ठिकाणी बंद पाडली. त्याचं साम्राज्य संपुष्टात येण्याच्या मार्गावर आलं. या घटनेमुळे मुंबईतील हा सर्वात मोठा डॉन प्रचंड घाबरला, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने मुंबई सोडून गावाकडे पबोरा केला.

त्याला माहित होतं वाय सी पवार यांच्या कारवाया रोखायच्या असतील तर सर्वात आधी त्यांना फ्री हॅन्ड देणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांचा बंदोबस्त केला पाहिजे.

बातमी मागची बातमी या पुस्तकात पत्रकार जयप्रकाश प्रधान सांगतात की रिबेरो यांना या पदावरून कस हटवता येईल यासाठी जबरदस्त हालचाली सुरु झाल्या. पैशाच्या थैल्या दिल्लीपर्यंत पोहचल्या आणि अखेर तो डाव यशस्वी झाला. रिबेरो यांनीच दिलेल्या सूत्रानुसार त्यांची बदली झाली आहे आणि ऑर्डर दोन दिवसात येतील ही माहिती प्रधान यांना मिळाली.

१३ जुलै १९८४ रोजी तेव्हाच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रधान यांनी एक्सक्लुजिव्ह बातमी लावली,

“रिबेरो यांची बदली “

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील नेमणुकीविषयक उचकाधिकार समितीने रिबेरो यांच्या हवाई अपहरणविरोधी दलाचा प्रमुख या पदावर बदलीचा घाट घातला होता. अजून अधिकृत बातमी आली नव्हती पण मुंबईत मात्र या रिबेरो यांच्या बदलीच्या शक्यतेने खळबळ उडाली.

त्या दिवशी सकाळीच ही बातमी वाचून तेव्हाचे गृहराज्यमंत्री शिवाजीराव देशमुख यांनी रिबेरो यांना फोन केला आणि बातमी खरी आहे का विचारले. रिबेरो यांनी बातमी खरी आहे असं सांगितलं. लगेच शिवाजीराव देशमुख यांनी सूत्रे हलवण्यास सुरवात केली.

राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील तेव्हा योगायोगाने दिल्लीतच होते. त्यांना देशमुख यांनी फोनवर हि बातमी वाचून दाखवल्यावर धक्काच बसला.  एक तर महाराष्ट्र सरकारला डावलल्याचा त्यांना राग आला होता शिवाय आत्ताच मुंबईची गाडी अंडरवर्ल्ड वॉर मधून रुळावर येत होती. अशा परिस्थितीत रिबेरो याना आयुक्तपदावरून हलवणं योग्य नाही असं त्यांचं ठाम मत होतं.

प्रकाशचंद्र सेठी नावाचे नेते तेव्हा केंद्रीय गृहमंत्री होते. एक अत्यंत विक्षिप्त माणूस म्हणून त्यांची प्रतिमा होती. वसंतदादा सकाळीच तडक त्यांच्या बंगल्यावर गेले. रिबेरो यांची बदली करणे सद्या तरी हिताचे नाही असं त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण सेठी ऐकेचनात. आता पंतप्रधानांचीहि स्वाक्षरी झाली आहे, त्यामुळे ते शक्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं.

अखेर वसंतदादा चांगलेच संतापले,

“तुम्ही तयार नसलात तर मी इथूनच तडक पंतप्रधानांकडे जातो. कारण मला राज्य चालवायचंय.”

असं बोलत बोलत दादा उठले. ते इंदिरा गांधींकडून ऑर्डर रद्द करून घेऊ शकतात हे लक्षात आल्यानं सेठींनी दादांना थांबवलं आणि रिबेरोंची बदली रद्द केली. वसंतदादा तिथून महाराष्ट्र सदनावर आले आणि पत्रकार परिषद बोलावली. तेथे त्यांनी सांगितलं की,

“रिबेरो मुंबईत उत्तमप्रकारे कामगिरी बजावत असताना सध्या त्यांची बदली करणं योग्य होणार नाही असं मी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितलं असून त्यांनी ते मान्य केलं आहे.”

वरदराजनचं मुंबईत परतण्याचं स्वप्न भंग झालं होतं.  दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रात वसंतदादांनी मुंबई आयुक्तांच्या बदलीचा डाव कसा हाणून पाडला पहिल्या पानावर याची बातमी झळकली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.