वर्षा उसगावकर सोबत तो सीन करायला मोहन जोशी तयार नव्हते
सिनेमांमधला रोमान्स कोणाला नाही आवडणार? नायक-नायिका एकमेकांच्या मिठीत, त्यांचे एकमेकांसोबतचे प्रेमळ संवाद, स्वप्नाळू जगात दोघेही रममाण असं त्याचं एक वेगळंच विश्व असतं. असे सीन मोठ्या पडद्यावर अनुभवताना आपण सुद्धा त्यांच्या जागेवर स्वतःला ठेवून बघतो.
पण असे प्रसंग कॅमेऱ्यासमोर करणं हे एका हिरो-हिरॉईन साठी कितपत सहज असू शकतं, याचा विचार आपण करू शकत नाही. प्रेक्षक म्हणून आपण त्या प्रसंगांचा आनंद घेतो. परंतु हीरो – हीरोइनला असे प्रसंग करताना निश्चितच मजा येत असावी, असं आपण गृहीत धरतो.
पण अभिनेते मोहन जोशींच्या बाबतीत मात्र काहीतरी वेगळंच घडलं.
वर्षा उसगावकर सोबत एक रोमँटिक सीन करताना मोहन जोशी का तयार नव्हते? याचा किस्सा तुम्हाला सांगणार आहे.
मोहन जोशी यांना आपण सर्वच ओळखतो. ट्रक ड्रायव्हर पासून सुरू झालेला त्यांच्या आयुष्याच्या प्रवास अनपेक्षित रित्या सिनेमाक्षेत्रामध्ये येऊन स्थिरावला. ‘एक डाव भुताचा ‘ सिनेमात एक छोटीशी भूमिका करून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर मोहन जोशी यांनी मागे वळून बघितलं नाही.
मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सिनेमांमध्ये मोहन जोशींनी उत्तमोत्तम भूमिका साकारून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
कधी मोहन जोशी अनेक सिनेमांमधून खलनायक म्हणून समोर आले तर त्याच ताकदीने त्यांनी ‘देऊळ बंद’ सिनेमातली स्वामी समर्थांची भूमिका साकारली.
“मला रोमँटिक सीन करणं फारसं जमत नाही”,
असं मोहन जोशींनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. याच मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा उलगडला होता.
हा किस्सा होता ‘सवत माझी लाडकी’ या सिनेमा दरम्यान घडलेला.
स्मिता तळवलकर दिग्दर्शित या सिनेमाची वेगळ्या कथानाकामुळे फार चर्चा झाली होती.
१९९३ साली ‘सवत माझी लाडकी’ सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. या सिनेमात मोहन जोशींसोबत नीना कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर या दोन नायिका होत्या. विवाहबाह्य सिनेमाची मजेदार गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली होती.
रोमँटिक भूमिका करणं मोहन जोशींना तसही जमायचं नाही. या सिनेमात मोहन जोशींना एक नव्हे तर दोन नायिकांसोबत रोमान्स करायचा होता. त्यांच्यासाठी हे खऱ्या अर्थाने आव्हान होतं.
नीना कुलकर्णी आणि मोहन जोशी यांनी एका नाटकात एकत्र काम केलं होतं.
त्यामुळे नीना सोबत मोहन जोशींची तशी मैत्री आणि ओळख होती. त्यामुळे ‘सवत माझी लाडकी’ मध्ये नीना सोबत रोमँटिक प्रसंग करणं, त्यांच्यासाठी इतकी कठीण गोष्ट नव्हती. पण मोहन जोशींना खरी अडचण होती ती वर्षा उसगावकर सोबत सीन करण्याची.
‘गंमत जंमत’ सिनेमा मुळे वर्षा उसगावकर हे नाव लोकप्रिय झालं होतं. मराठी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून वर्षाची ओळख झाली होती.
एका सीन मध्ये मोहन जोशींना वर्षा उसगावकर यांना उचलून बेडवर ठेवायचं होतं.
लेखकाने सीन फर्मास लिहिला होता. पण सीन वाचताना ‘हा सीन कसा करणार’ असा विचार करून मोहन जोशींच्या समोर अडचण उभी राहिली. कारण याआधी काही सिनेमांमध्ये मोहन जोशींनी वर्षाचे बाबा , मामा अशा भूमिका केल्या होत्या.
त्यामुळे तिच्यासोबत एकदम रोमँटिक सीन करायला त्यांचं मन तयार नव्हतं.
ते सरळ लेखकाला भेटायला गेले. ‘अरे काय, काही पण सीन लिहितोस तू’ मोहन जोशी लेखकांना म्हणाले. आत्ता रोमँटिक सिनेमा असल्यामुळे लेखकाने मोहन जोशी आणि वर्षामध्ये घडणारा फक्कड रोमँटिक सीन लिहिला होता.
मोहन जोशी असा सीन करायला तयार नव्हते. सिनेमाच्या दिग्दर्शक स्मिता तळवलकर आल्या. त्यांनी मोहन जोशींना समजावलं. पण मोहन जोशी सीन करणार नसल्याच्या त्यांच्या बाजूवर हटून बसले होते.
अखेर हे प्रकरण वर्षापर्यंत गेलं.
वर्षा उसगावकर यांचं स्वतःचं एक वलय होतं. त्या ताडताड चालत मोहन जोशींजवळ आल्या. वर्षाने सरळ समोर येत मोहन जोशींना विचारलं,
“मोहनजी काय अडचण आहे तुम्हाला. सिनेमासाठी हा सीन करणं गरजेचं आहे. प्लीज आपण हा सीन लवकर करू. मला पुन्हा शुटिंग संपवून निघायचं आहे.”
वर्षा उसगावकर यांचं म्हणणं ऐकून त्याविरुद्ध मोहन जोशी काहीच बोलू शकत नव्हते.
मोहन जोशींनी वर्षाला उचलून बेड वर ठेवलं. हा सीन अखेर शूट झाला.
‘मी एरवी सुद्धा स्त्रियांशी बोलण्यात काहीसा बुजरा असतो. त्यामूळे हा सीन करताना माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या.’,
अशी गमतीदार आठवण मोहन जोशींनी या मुलाखतीत सांगितली होती. त्यामुळे मोहन जोशींच्या बाबतीत घडलेला हा किस्सा वाचून तुम्हाला कळालं असावं की, प्रत्येक वेळी रोमँटिक सीन करताना हिरोला मजा येईल असं नव्हे.
काहीवेळा अशा सीनमध्ये मनामधली घालमेल कळू न देता चेहऱ्यांवर रोमँटिक भाव आणणं, ही कलाकारासाठी सुद्धा एक अवघड गोष्ट असते.
हे ही वाच भिडू.
- रजनीकांत जसा कंडक्टर पासून सुपरस्टार झाला तसेच मोहन जोशी ट्रक-ड्रायव्हर पासून स्टार झाले
- आज मी २९ वर्षांचा आहे, तरिही मी आज तिरंगाच बघणार कारण
- म्हणून अश्विनी ये ना गाण्यात च आणि ळ हे शब्द नाहीत