युपीवर राज्य करायचं स्वप्न बघणाऱ्या वरुण गांधीनां हनीट्रॅपने अक्षरशः संपवलं

भिडू नुकतंच आपण एक स्टोरी केली होती ‘नेव्ही वॉर रूम‘ लीक वर. भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम म्हणून याला ओळखलं जातं. रवी शंकरन नावाच्या एक्स ऑफिसरनेच हा घोटाळा घडवून आणला होता. यात अगदी नौदल प्रमुखांपासून ते तेव्हाचे संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या पर्यंत अनेकांची नावे आली होती.

सगळा किस्सा त्याकाळी गाजला. इंग्लंडमध्ये लपून बसलेला रवी शंकरन सापडलाच नाही. विरोधकांनी गोंधळ घातला, सत्ता आल्यावर मात्र त्यांनी पुढे कारवाई केलीच नाही. सगळं अगदी शिरस्त्याप्रमाणे झालं.

या सगळ्या घडामोडीमध्ये एक नाव चमकत होतं, “अभिषेक वर्मा “

भारतातला आजवरचा सगळ्यात वादग्रस्त आर्म्स डीलर. कित्येक घोट्याळ्यात तो अडकला, कित्येक ठिकाणी कांड केले हे सगळं त्यालाच ठाऊक. सगळ्या पक्षांपर्यंत याचे हात पोहचलेले आहेत. कुठून कधी कस काम काढून घ्यायचं हे अभिषेक वर्मा चांगलंच ओळखतो.

मूळचा दिल्लीचा. त्याचे वडील श्रीकांत वर्मा हे हिंदी मधले खूप मोठे कवी होते. दिनमान या वर्तमापत्रात लिहायचे. वर्मा यांचे आईवडील स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होते. यातूनच त्यांची ओळख राजकारणाशी झाली. इंदिरा गांधींनी या संवेदनशील कवीला राजकारणात आणलं. ते आणीबाणीच्या काळात राज्यसभेचे खासदार देखील बनले. १९८०च्या निवडणुकीत काँग्रेसचं प्रचार गीत श्रीकांत वर्मा यांनी लिहिलं होतं. ते काँग्रेसचे प्रवक्तेदेखील बनले.

आधी संजय गांधी व नंतर राजीव गांधी यांच्या खास वर्तुळातले म्हणून श्रीकांत वर्मा यांना ल्यूटन्स दिल्लीमध्ये ओळखलं जात होतं .

छोट्या अभिषेकच्या समोरच श्रीकांत वर्मांचं राजकीय करियर फुलत होतं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत जे शिखांचे शिरकाण झाले त्यात जगदीश टायटलर यांचं नाव पुढं आलं. जगदीश टायटलर यांच्या दंगलीतील सहभागाचा साक्षीदार म्हणून पंधरा वर्षांच्या अभिषेक वर्माला उभं करण्यात आलं.

तेव्हापासूनच हा अभिषेक वर्मा चुकीच्या गोष्टीसाठी चर्चेत येऊ लागला.

श्रीकांत वर्मा यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचा राजकीय वारसा अभिषेकच्या आईने उचलला. अनेक वर्ष त्या खासदार व महिला काँग्रेसच्या पदावर होत्या. पण अभिषेक मात्र सक्रिय राजकारणापासून दूर राहिला.

त्याच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं. पैसे कमवणे..

अभिषेक दिल्लीच्या हिंदू कॉलेजमध्ये शिकला. पुढच्या शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेला गेला. तिथे काँग्रेसचे नेते कमल दंदोना यांनी सुरु केलेलं मॅगझीन इंडिया वर्ल्ड वाइड चा त्याला संपादक बनवण्यात आलं. या मासिकाच्या निमित्ताने तो राजीव गांधींच्या नजरेत देखील भरला. इतक्या कमी वयात त्याची प्रगती, त्याची हुशारी राजीवजींना कौतिकास्पद वाटली.

पुढे जेव्हा पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान बनले व त्यांनी देशात आर्थिक सुधारणा केल्या तेव्हा या जागतिकीकरणाचा फायदा घेण्याऱ्या मध्ये अभिषेक वर्मा देखील आघाडीवर होता. त्याने या काळात कार्गो एयरक्राफ्ट ची कंपनी ईएसएएम उघडली. रशिया  व आखाती देशांसाठी तो सर्व्हिस पुरवू लागला.

आपल्या तीक्ष्ण बुद्धीच्या जीवावर त्याने रशियासोबतचा व्यापार इतका वाढवला की फक्त पाच वर्षात शेकडो कोटींमध्ये त्याची उलाढाल जाऊन पोहचली. इंडिया टुडेच्या कव्हर मॅग्झिनवर देखील झळकू लागला.

 

 

 

 

 

 

 

 

 

आपल्या वडिलांच्या गावी बिलासपूरला त्याने बरीच कामे केली. विहिरी, मेडिकल क्लिनिक,मध्यान्ह भोजन, कॅन्सर फंड अशा अनेक गोष्टींची सुरवात केली. तिथे त्याला सेलिब्रिटी प्रमाणे समजलं जात होतं.  त्याला नेहरू बाल सुधार समितीचा ट्रस्टी बनवण्यात आलं. सोनिया गांधी देखील या ट्रस्टशी अनेक दिवस जोडल्या गेलेल्या होत्या.

पुढे २००४ साली टेलिकॉम इंडस्ट्रीचा बूम आला तेव्हा त्याच्या कंपनीने बीएसएनएलशी मोठा करार केला व त्यांचा तो सर्व्हिस प्रोव्हायडर बनला. पुढच्यावर्षी जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष वेन जियाबाओ भारतात आले तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या  ZTE कंपनीबरोबर आजवरचा सर्वात मोठा करार अभिषेक वर्माने केला.

त्याच्याबद्दलची पहिली काँट्रोर्व्हरसी २००६ साली समोर आली. तेव्हाचे विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने अभिषेक वर आरोप लावला कि त्याने  फ्रान्स बरोबर भर्तरीय नौदलाच्या झालेल्या स्कॉर्पीन मरिन्स डीलमध्ये ५०० कोटी रुपयांची दलाली खाल्ली आहे.

या निमित्ताने कळले हे अभिषेक वर्माचा हत्यारांच्या दलालीचा सुद्धा बिझनेस होता. यात त्याने बरेच गोंधळ घातले. वर उल्लेख आलेल्या नेव्ही वॉर रूम स्कॅम मध्ये देखील त्याच नाव आलं. भाजपच्या नेत्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. पण हा गडी इतका पुढं गेलेला होता कि त्याने थेट लालकृष्ण अडवाणी यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला.

त्याला जेल झाली. सीबीआय पासून ईडी पर्यंत सगळ्यांनी धाडी मारल्या. अगदी तिहार तुरुंगाची हवा खाऊन आला पण सुधारला बिलकुल नाही.

जेव्हा जेव्हा भारतात कोणताही संरक्षण दलाशी जोडला गेलेला घोटाळा झाला त्यात याच नाव सर्वात पुढं आलं. असं म्हणतात की मोठमोठ्या अधिकाऱ्यांना खास उझबेकिस्तानवरून आणलेल्या पोरी पुरवायचा  नंतर तो त्यांना ब्लॅक मेल करायचा.

२०१० साली रक्षामंत्री एके एंटनी यांना एक चिठ्ठी मिळाली होती ज्यात लिहिलं होतं कि अभिषेक ने अनेक इयर फोर्स ऑफिसरच्या सेक्स सीडी बनवल्या आहेत व त्याचा वापर करून हवी ती इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून उकळवून घेत आहे.

जगभरातल्या अंडरवर्ल्ड शी त्याचे संबंध असल्याचे सीबीआयवाले खात्रीपूर्वक सांगतात.

एवढे आरोप होत असूनही त्याच्या शानो शौकीत कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. महागड्या गाड्या, अति महागडी दारू, पार्ट्या यासोबतच त्याचे फोटो फेमस होत राहिले. रोमानियाच्या अंका नेक्सू नावाच्या मुलीशी त्याने लग्न केलं होतं. हि बया देखील त्याच्या काळ्या धंद्यात तितकीच गुरफटलेली होती.

असं म्हणतात की याच अभिषेक वर्माने वरुण गांधीला अडकवलं. 

२०१६ साली अभिषेकचा जुना साथीदार एडमंड्स ऍलन याने हे आरोप केले. त्याच म्हणणं होतं कि अभिषेक वर्माने आपली एक डील फायनल करण्यासाठी भाजप नेते वरुण गांधी यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले. वरुण गांधी तेव्हा संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांचे व्हिडीओ लीक झाल्याची बातमी मीडियामध्ये पसरली. काही फेक फोटो देखील व्हायरल झाले.

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पहिल्यांदाच एका भाजप नेत्यावर मोठे आरोप झाले होते. अभिषेक वर्मा आणि वरुण गांधींनी या आरोपांचे खंडन केले, मात्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या सीडीच्या खमंग चर्चा सुरूच राहिल्या. या आरोपातुन सिद्ध काही झाले नाही पण वरुण गांधी यांना खूप मोठा पोलिटिकल सेटबॅक बसला.

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वरुण गांधी हे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा करणार होते. पिलभीत सुलतानपूर या आपल्या पारंपरिक मतदार संघातून त्यांनी आपले पाय मजबूत रोवले होते. उत्तरप्रदेशच्या तरुणाईत त्यांची मोठी हवा देखील होती. संजय गांधींचा भाजपमय अवतार म्हणून वरून गांधींना ओळखलं जात होतं .

मात्र दुर्दैवाने त्याच्यावर हनीट्रॅपचे आरोप झाले आणि ते राजकारणाच्या केंद्रावरून बाहेर फेकले गेले.

इकडे अभिषेक वर्माची ऐश आजही सुरूच आहे. फक्त भारताचं नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे तरी त्याच्या नावाची बोंबाबोंब सुरूच असते. आणि हा पठ्ठ्या आपल्या फॉरेनर बायको सोबत शॅम्पेन उडवत न्यू ईयर सेलिब्रेट करत आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.