आता तर कन्फर्म झालंय युपीमधून सोयीस्कररित्या या माय-लेकराला बाजूला केलं जातंय

आठवतंय का मागे एकदा भाजप नेते वरुण गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा एक व्हिडिओ ट्वीट केला होता. जेंव्हा लखीमपूरच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता तेंव्हा त्यांनी हि पोस्ट करून त्यांनी या पोस्ट मध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केला आहे कि, या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हाच व्हिडिओ त्यांच्या राजकीय कारकीर्दसाठी नुकसानदायक ठरतोय कि काय अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.

बरं एवढंच नाही तर आत्ताची ताजी बातमी ज्यावरून हे स्पष्ट होतंय कि, भाजप वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना कसं सोयीस्कररित्या बाजूला करतंय…बघू टप्या-टप्याने …

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्याचा पहिला टप्पा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने  अलीकडेच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यासह भाजपच्या ३० नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

बरं लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणामुळे वादात सापडलेले केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे नाव या यादीत नाही….हे तर सोडाच पण याच हिंसाचार प्रकरणावर बोट ठेवणारे माय -लेक देखील यात कुठेच तुम्हाला दिसणार नाहीत. मेनका गांधी आणि वरुण गांधी यांना स्थान मिळाले नाही.

यादीत कोणत्या नावांचा समावेश आहे ?

WhatsApp Image 2022 01 20 at 11.35.31 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राधामोहन सिंग, मुख्तार अब्बास नक्वी, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय यूपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, मुझफ्फरनगरचे भाजप खासदार संजीव बालियान, जसवंत सैनी, मथुरेच्या खासदार हेमा मालिनी, अशोक कटारिया, सुरेंद्र नागर, जनरल व्हीके सिंह, भूपेंद्र सिंह चौधरी यांचाही भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे.

स्टार प्रचारकांचं जाऊच द्या पण भाजपने मेनका गांधी आणि वरुण गांधी यांना पक्षाच्या महत्वाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन यादीत देखील समाविष्ट केलं नव्हतं. त्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी याचं नाव तर आहेच. तसेच या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा नंबर या यादीत आल्याचं समोर आलं होतं.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांचा देखील या यादीत समावेश आहे. तसेच गेल्या यादीच्या मानाने  पंकजा मुंडे आणि विनोद तावडे याचं नाव आणि जबाबदारी कायम केली आहे. 

मात्र या ८० जणांच्या सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत मात्र, वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांची नावे नाहीतच.

आणि हे नावं या यादीत का समाविष्ट केली नाहीत तर त्याचं कारण स्पष्ट आहे. त्यांनी मागे केलेलं ट्वीट जे आपण वर पाहिलं.  कृषी कायदे असोत किंवा लखीमपूर खेरी हिंसाचार…वरुण गांधी नेहमीच आपलं परखड मत मांडत आले आहेत.  यूपीच्या लखीमपूर खेरीच्या घटनांचा निषेध करत वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांची नावे भाजपच्या या ८० सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून वगळण्यात आली होती.

आपण पाहतच आलो आहोत कि, सुरुवातीपासूनच वरुण गांधी हे एकमेव भाजप नेते होते ज्यांनी हा शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला होता. केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान वरुण गांधी सातत्याने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलत होते. त्यांची आई मनेका गांधी देखील शेतकऱ्यांच्या हिताबद्दल सहानुभूती दाखवत आल्या आहेत.

बरं फक्त वरून गांधी आणि मनेका गांधीच नाही तर इतरही काही नावे आहेत, ज्यांनी किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे त्यांचं देखील नाव या यादीतून वगळण्यात आलं आहे. ती नावं म्हणजे,  माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह, सुब्रमण्यम स्वामी ज्यांना पक्षाचे टीकाकार म्हणून पाहिले जात होते. या दोघांना देखील या यादीतून वगळण्यात आले होते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टी साठी अत्यंत महत्वाच्या आहेत.   त्यात वरून गांधींची सुरुवातीपासूनची परखड भूमिका आणि त्यांनी हिंसाचार बद्दल सरकारवर केलेली टीका ही पक्षाला परवडण्यासारखी नाही आणि पक्ष देखील सद्याच्या या गरम वातावरणात रिस्क घेऊ शकणार नाही म्हणून पक्ष नेतृत्वाने या टीकाकारांची नवे वगळली होती.

त्यात मनेका गांधी आणि वरून गांधी या शेतकऱ्यांच्या पाठीशी होते.लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण सोडलं तर, यूपीटीईटी पेपर लीक, शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, महागाई आणि बेरोजगारी अशा सर्व प्रकरणांमध्ये वरुण गांधी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आलेत. त्यामुळे आधी कार्यकारणीच्या यादीतून नाव वगळणे आणि आत्ता स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळणे हे अप्रत्यक्ष वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बेदखल करण्यासारखंच आहे.

आधी कार्यकारिणी यादी आणि स्टार प्रचारक यादीमधून बाहेर काढल्यामुळे वरुण गांधी आणि मनेका गांधी हे कधीही भाजप मधून बाहेर पडू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी त्यात भर म्हणजे त्यांची कार्यकारणीच्या यादीतून वगळले असल्यामुळे त्यांना विरोध करण्याचे निमित्त देखील मिळाले आहे…आणि आत्ता निवडणूक काहीच दिवसात आल्यामुळे त्यांची राजकीय भूमिका काय असू शकते हे येत्या काही दिवसात कळेलच…

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.