वरुण गांधी कुठल्यातरी एका काँग्रेसमध्ये जाणार अशी शक्यताय

गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी आणि भाजपचे सूर जरा बिघडलेलेच आहेत. शेतकरी आंदोलन आणि लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेनंतर वरुण गांधी यांनी भाजपवर डायरेक्ट टीका केली होती. त्यानंतर, जाहीर झालेल्या भाजपच्या ८० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही वरुण गांधी यांचं नाव नव्हतंच.

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागं घेतल्यावर वरुण गांधी यांनी त्यांना पत्र लिहिलं. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ करोड देण्यात यावे आणि किमान आधारभूत किंमत नक्की करणारा कायदा करा, अशा मुख्य मागण्या त्यांनी पत्रातून केल्या आहेत. त्यामुळं या पत्रामुळंही राजकारण तापण्याची शक्यता आहेच.

थोडक्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्हीकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खुन्नस दिली जात होती, त्यामुळं कायतरी गंभीर विषय होणार याची कुणकुण लागली होतीच. आता गंभीर विषयाकडं पाऊल पडायला सुरुवात झाली आहे.

सध्या मार्केटमध्ये चर्चा सुरू आहे की, वरुण गांधी भाजप सोडणार. पण खरा हॉट टॉपिक असाय की, वरुण गांधी जाणार कुठं?

तृणमूलमध्ये प्रवेश करणार का?

बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी गोव्यातही दमदार शड्डू ठोकला आहे. त्यांचा गोव्यातला प्रचार बघता पश्चिम बंगालच्या बाहेर झेप घेण्यासाठी ममता आतुर असल्याचं दिसतंय. हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याकडे ताकदवान नेता असणं अत्यंत गरजेचं आहे. उत्तरप्रदेशमधले काँग्रेस नेते ललितेश त्रिपाठी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला असला, तरी वरुण यांचा प्रभाव पाहता त्यांच्या प्रवेशानं तृणमूलला दणक्यात फायदा होऊ शकतो.

येत्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर येऊ शकतात. त्यावेळी वरुण गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट होऊ शकते असे संकेत तृणमूल काँग्रेसच्या गोटातून दिले जात आहेत. बातम्यांनुसार टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं वरुण गांधी भाजप सोडण्याच्या मनस्थितीत असून ते टीएमसीच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

प्रियांका गांधींसोबत भेट

गांधी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. या दोघांमध्ये जेवणादरम्यान चर्चा झाल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळं ते भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असा हवाला भाजप नेतेच देत आहेत. वरुण गांधी काँग्रेसमध्ये गेले, तर उत्तरप्रदेशच्या निवडणुकांआधी काँग्रेसला मोठा बूस्टर मिळू शकतो.

त्यामुळं सध्यातरी वरुण गांधी दोन्ही काँग्रेसचे पत्ते ओपन ठेवतायत असं चित्र दिसतंय. भाजप त्यांची मनधरणी करणार का आणि केलीच तर ती यशस्वी ठरणार का? आणि जर वरुण गांधी यांनी भाजपला कल्टी द्यायचं ठरवलं, तर त्यांच्या आई मनेका गांधी कुठल्या पक्षात जाणार हे पण बघावं लागंलच की…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.