वरुण गांधी आंदोलन करणाऱ्या शीख शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत याला एक कारण आहे…

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरीमधील हिंसाचारानंतर सध्या इथल्या शेतकऱ्यांच्या बाजूने देशातील बहुतांश सर्व विरोधीपक्ष आणि विरोधी पक्षातील नेते उभे आहेत. यात अगदी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे.

मात्र यात अजून एक नाव दिसत आहे ते म्हणजे भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी यांचं. वरुण गांधी देखील सध्या इथल्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वरुण गांधी यांनी या घटनेबद्दल उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र देखील लिहिलं आहे.

या पत्रातून त्यांनी हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि कुटुंबाला एक-एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. इतकंच नाही तर या घटनेनंतर त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजपचा उल्लेख हटवला आहे.

त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो कि वरुण गांधी भाजपमध्ये असून देखील स्वपक्षाच्या बाबतीमध्ये इतके आक्रमक का झाले आहेत?

तर याच उत्तर सापडत आपल्याला अगदी भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात. भारत स्वातंत्र्य झाला आणि फाळणीमध्ये पाकिस्तानच्या सिंध आणि पश्चिम पंजाबमधील शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होऊन या पिलिभीत-लखीमपूरच्या विरळ लोकवस्तीच्या भागात येऊन वसला. याशिवाय बरेली, शाहजहांपुर, रामपुर, सीतापुर, बहराइच, गोंडा या भागात पण शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर आला.

उत्तरप्रदेशमधील उत्तराखंडला काहीसा लागून असलेला हा सगळा भाग तराई क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या पायथ्याशी दगडगोटे व भरडरेती यांच्या जाड्या गाळाने तयार झालेल्या भाबर या भागाच्या पुढे असलेला मातीच्या बारीक गाळाने तयार झालेला हा पट्टा. भाबरमध्ये भूमिगत झालेले जलप्रवाह तराईत भूपृष्ठावर येतात त्यामुळे हा भाग काहीसा दलदलयुक्त आहे.  

पोटापाण्याच्या आणि छताच्या शोधात आलेल्या शीख समुदायाने तराईच्या भागातील मोकळ्या पडलेल्या जमिनीची नाडी ओळखली आणि कवडीमोल भावात त्या खरेदी केल्या. जीवतोड मेहनत करत जमीन शेतीउपयोगी बनवली आणि इथं अक्षरशः सोन पिकवायला लागले. ऊस पट्टा, भाताचा पट्टा अशा वेगवेगळ्या पिकांची माध्यमातून उत्तरप्रदेशचा हा भाग ओळखला जाऊ लागला.

यामुळे या भागातील साखर कारखान्यांपासून बाजार समित्या, सोसायट्या इथं सगळीकडे शीख समुदायाचा वर्चस्व दिसून येते. अगदी इथल्या राजकारणावर देखील. त्यामुळेच या भागाला मिनी पंजाब असं पण म्हंटले जाते. 

८० च्या दशकात जेव्हा पंजाबमध्ये दहशतवादाने डोकं वर काढलं तेव्हा उत्तरप्रदेशमधील शीख समुदायाने स्वतःला या दहशतवादापासून लांब ठेवले. मात्र त्यानंतर देखील याचा फटका इथल्या शीख समुदायाला बसलाच. खलिस्तान चळवळीशी संबंधित लोक मदतीसाठी संपर्क करायचे त्यामुळे प्रशासनाची या समाजावर सातत्यानं संशयाची सुई राहिली.

याच सगळ्या घडामोडींमुळे गांधी घराण्याचा या भागाशी संबंध आला. इथल्या शीख समुदायाला कळून चुकले कि जर आपल्याला या घडामोडींमधून बाहेर पडायचे असेल तर आपली लोक सत्तेत असायला हवी. आणि इथूनच इथल्या शीख समुदायाच्या राजकीय महत्वाकांक्षा जाग्या झाल्या.

त्यानंतर पीलीभीत, बदायूं आणि लखीमपुर या जागेंवरून शीख समुदायाचे आमदार निवडून जाऊ लागले. आज देखील इथून शीख समुदायाचे आमदार आणि मंत्री आहेत.

याच काळात दिवंगत संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी याच भागातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. आता मनेका गांधी यांनी या भागाला आपली कर्मभूमी का बनवली तर लग्नाच्या आधीची मनेका गांधी यांची ओळख म्हणजे त्यांचा जन्म दिल्लीमधील एका सुखवस्तू शीख कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सैन्यात होते. 

याच भावनिक नात्यामुळे १९८९ साली त्या पिलिभीतमधून पहिल्यांदा खासदार झाल्या. पुढे देखील २ वेळा त्यांनी पिलिभीतच प्रतिनिधित्व केलं आणि सुलतानपूरमधून एकदा. सध्या पिलिभीतमधून वरुण गांधी खासदार आहेत. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात जे शेतकरी आघाडीवर आहेत त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शीख समुदायातील शेतकरी आहेत.

एकूणच काय तर शेतकरी आंदोलनाभोवती फिरणार शीख समुदाय आणि शीख समुदायाभोवती फिरणार वरुण गांधी यांचं सगळं राजकारण. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये इथल्या शीख समुदायाला नाराज करत नाहीत.

उत्तरप्रदेशमध्ये अंदाजे कुठे किती शीख समुदाय आहे? 

पीलीभीतमध्ये ३० हजार, बरखेडामध्ये २८ हजार, पुरणपूरमध्ये ४० हजार, बिसलपूरमध्ये १५ हजार, पुवयनमध्ये ३० हजार, शाहजहांपूरमध्ये १५ हजार, बहेरीमध्ये ३५ हजार, बरेली कॅंटमध्ये २० हजार, रामपूर १६ हजार, लखीमपूर खेरीमध्ये २३ हजारसागत आसपास शीख समुदाय आहे. याशिवाय उर्वरित ठिकाणी देखील ५ ते १५ हजारांच्या दरम्यान शीख समुदाय आहे.

उत्तराखंडच्या राजकारणात देखील शीख समुदायाचे वर्चस्व

उत्तराखंडमधील अर्धा डझन जागांवर शीख समुदायाचा प्रभाव आहे.

उत्तराखंडच्या तराई भागातील जसपूर, काशीपूर, रुद्रपूर, गदरपूर, बाजपूर, सितारगंज आणि नानकमत्ता या जागांवर शीख समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या या समुदायाची इथली राजकीय समीकरण बनवण्यात आणि बिघडवण्यात महत्वाची भूमिका आहे. याशिवाय शीख समुदाय देहरादून आणि हरिद्वार परिसरातही स्थायिक आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.