पत्रकारांच आंदोलन झालं आणि दादांनी भारत पाकिस्तान मॅचची कॉमेंट्री मराठीत करायला लावली..

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. भारताचा कप्तान होता  विजेता कपिल आणि पाक टीमचं नेतृत्व करत होता झहीर अब्बास. दोन्ही टीम तुल्यबळ होत्या. भारताकडे सुनील गावस्कर, रवी शास्त्री, अंशुमन गायकवाड, मदनलाल यांच्यासारखे तगडे खेळाडू होते तर पाकिस्तान मध्ये देखील जावेद मिंयादाद, वसीम रझा, अझीम हाफिज अशी ताकदवान टीम होती.

त्या काळी देखील दोन्ही देशांमधील सामने एखाद्या महायुद्धाप्रमाणे खेळले जायचे.

तीन कसोटी आणि दोन वनडे सामने होणार होते. पाकिस्तान तेव्हा कधी भारताविरुद्ध हरायचा नाही पण कपिलची टीम फुल फॉर्म मध्ये होती.  त्यांनी पहिले दोन कसोटी सामने अनिर्णयीत राखण्यात यश मिळवलं.

तिसरा कसोटी सामना नागपूरला विदर्भ क्रिकेट मैदानात होणार होता. नागपूरसारख्या त्याकाळच्या छोट्याशा शहरात एवढी मोठी मॅच पहिल्यांदाच होत असावी. आयोजकांप्रमाणे नागपूरमधली क्रिकेटप्रेमी जनता देखील या मॅचसाठी प्रचंड उत्साहाने वाट बघत होती.

त्याकाळात टीव्हीचा इतका प्रसार झाला  नव्हता. त्यामुळे एकतर ग्राउंडवर जाऊन सामना पाहणे अथवा रेडिओवर कॉमेंट्री ऐकणे हाच पर्याय असायचा. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनी रोजच्या खेळाचे वर्णन वर्तमानत्रात लिहिण्याची पद्धत नव्याने सुरु झाली होती. 

नागपूरमध्ये तेव्हा नागपूर पत्रिका नावाचा वर्तमानपत्र फेमस होता. प्रवीण बर्दापूरकर त्याचे मुख्य वार्ताहर होते. त्यांनी मुंबई प्रमाणे आपल्या वर्तमानपत्रात देखील असा एक स्तंभ सुरु व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी ते जेष्ठ क्रिकेटपटू बाळ पंडित यांच्या कडे गेले. त्याकाळात बाळ पंडित हे आकाशवाणीवर समालोचन करत असत.

क्रिकेटविश्वामध्ये त्यांचं नाव दिग्गज समजलं जायचं. प्रवीण बर्दापूरकर थोडेसे भीतभीतच त्यांच्याकडे गेले. पण गंमत म्हणजे बाळ पंडितांनी आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारला. ते म्हणाले,

“नाहीतरी आता लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण मराठीतून कॉमेंट्री न करण्याचा निर्णय आकाशवाणीने घेतला आहे. त्यामुळे मी रिकामाच आहे.”

बर्दापूरकरांनी आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याचे फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये समालोचन करावे, प्रादेशिक भाषेतून करू नये असे आदेश दिल्लीच्या केंद्र सरकारकडून आले आहेत असं त्यांना सांगण्यात आलं.

दुसऱ्या नागपूर पत्रिकेमध्ये दिल्लीचे सरकार मराठी भाषेवर कसा अन्याय करत आहे याची सविस्तर बातमी छापून आली. संपूर्ण राज्यभरात याची चर्चा झाली. पण केंद्रातून या वर ढिम्म प्रतिक्रिया आली.

मॅचला अजून काही दिवस होते. जर जनमताचा रेटा लावला तर मराठीतून कॉमेंट्री अजूनही शक्य आहे असं नागपूरकरांना वाटत होतं. अखेर नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रकाश देशपांडे, प्रवीण बर्दापूरकर आणि इतर काही पत्रकारांनी आंदोलन उभा करायचं ठरवलं. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.वि.भि.कोलते यांनी करावं असावा प्रस्ताव समोर आला.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त भाऊराव कोलते हे महानुभाव पंथाचे मोठे संशोधक आणि महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील एक आदरणीय नाव होतं. सर्व पत्रकार मंडळी त्यांच्याकडे गेली. एक दिवसाचे धरणे आंदोलन आणि नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनावर मराठी भाषिकांचा मोर्चा असं स्वरूप निश्चित झालं. भाऊराव कोलते या आंदोलना साठी आनंदाने तयार झाले.

या मोहिमेला राज्यभरातील साहित्यिकांनी पाठिंबा दिला. ठरल्याप्रमाणे आकाशवाणी चौकात आंदोलक धरण्यासाठी बसले. भाऊराव कोलते हे चक्क प्रवीण बर्दापूरकर यांच्या स्कुटरवर मागे बसून आंदोलनासाठी दाखल झाले. विदर्भातील काही नेत्यांनी देखील या आंदोलनाची दाखल घेऊन केंद्रात पत्र पाठवलं. वसंत साठे यांनी यात पुढाकार घेतला पण केंद्रातून काही प्रतिसाद आला नाही.

अखेर नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु झालं. पत्रकारांनी विधिमंडळावर मोर्चा नेला. यात तीनशे साडे तीनशे मोर्चेकरी सामील होते. पंचाहत्तर वर्षांचे वयोवृद्ध भाऊराव कोलते स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करत होते.

विधानसभेच्या दाराशी जेव्हा मोर्चा येऊन पोहचला तेव्हा पाहतात तर तिथं मुख्यमंत्र्यांचे सचिव शामकांत सोहनी या मोर्चाच्या स्वागताला हजर होते.

अतिशय अदबीने त्यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्त्र्यांच्या दालनात नेलं. ते खुर्ची वर बसतात इतक्यात सभागृहातील काम आटपून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील धोतराचा सोगा सावरत आपल्या केबिनमध्ये आले. आल्या आल्या त्यांनी भाऊराव कोलते यांना लावून नमस्कार केला आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत न बसता ते भाऊराव कोलते यांच्या शेजारी जाऊन बसले.

मोर्च्याचे प्रयोजन समजावून घेतलं. तिथूनच त्यांनी दिल्लीला पंतप्रधान कार्यालयाला फोन लावला. तिथे कोणाला तरी आपल्या खास परिचित हिंदी शैलीत त्यांनी निक्षून सांगितलं,

”  मराठी में क्रिकेट की कॉमेंट्री होनी चाहिए.”

फोन झाल्यावर त्यांनी शिष्टमंडळाला समालोचन मराठीतच होईल याची ग्वाही दिली. आग्रहाने चहानाश्ता दिला. शिष्टमंडळाला सोडण्यासाठी ते विधिमंडळाच्या दारापर्यंत आले. आंदोलकांना अगत्याने वागवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृतपणाचा अनुभव तेव्हा नागपूरकरांना घेता आला.

दादांनी सांगितल्या प्रमाणे घडलं. एका रात्रीत दिल्ली वरून आदेश आले.

५ ऑक्टोबर १९८३ रोजी झालेल्या भारत पाकिस्तान कसोटी मॅचच समालोचन हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषेत झालं. 

ही घटना प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या डायरी या पुस्तकात सांगितली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.