राजकीय संन्यासाची वस्त्रे कृष्णेत फेकून आलेला हा सांगलीचा वाघ मुख्यमंत्री बनला.

वसंतदादा पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातल आभाळाएवढ उत्तुंग व्यक्तिमत्व.  स्वातंत्र्यलढयावेळी  सांगली भागात  पत्रीसरकारच्या माध्यमातून  ब्रिटिशांना सळो की पळो करण्यापासून ते राज्याचा तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवण्यापर्यंत जवळपास पन्नास वर्ष हे वादळ  महाराष्ट्राच्या राजकारणात भिरभिरत राहीलं.

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या दादांच शिक्षण जास्त झालं नव्हत पण मातीतल्या माणसांमध्ये राहून एक व्यवहारी शहाणपण त्यांच्याजवळ होत.

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर त्यांनी व त्यांच्या क्रांतिकारक सोबतीनी शस्त्र टाकून विधायक राजकारण करण्याच व्रत स्वीकारलं. कॉंग्रेसच्या विचारसरणीवर त्यांचा विश्वास अढळ होता. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा सांगली परिसरातील हे तरूण सहकाराच्या माध्यमातून आपआपल्या भागात विकासाची गंगा आणण्यासाठी राबू लागले.

सहकार क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्यांमध्ये वसंतदादांचं नाव सर्वात वर होत. त्यांच्या कर्तुत्वामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातही महत्व प्राप्त झालं होतं. वसंतदादांच संघटना बांधणी कौशल्य पाहून यशवंतरावानी त्यांना साठच्या दशकात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली देखील. पुढे वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये पाठबंधारे खात्याचा मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली.

सिंचन आणि पाटबंधारे या शेतीशी निगडीत दोन क्षेत्रांमध्ये पूर्ण राज्यात कुठल्याच नेत्याला आपल्या इतकी अक्कल नाही असं वसंतदादांचं ठाम होत.

बांधावरच्या शेतकऱ्यांशी थेट जोडला गेलेला हा नेता होता. वसंतराव नाईकांच्या नंतर मराठवाड्याच्या शंकरराव चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. वसंतदादा त्यांच्याही मंत्रीमंडळात पाटबंधारे खात्याचे मंत्री बनले. आपल्या करड्या शिस्तीमुळे हेडमास्तर अशी ओळख शंकरराव चव्हाणांची झाली होती. त्यांचाही पाटबंधारे खात्याचा  अभ्यास मोठा होता. यामुळेच त्यांच्यात व वसंतदादा पाटलांच्यात मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होऊ लागली.

एका म्यानात दोन तलवारी राहणे अशक्य होते.

शंकरराव चव्हाणांनी आपला मुख्यमंत्री म्हणून अधिकार वापरला व डोईजड होऊ पाहणाऱ्या वसंतदादा पाटलांना राजीनामा देण्यास सांगितले. असं म्हणतात वसंतदादाना बातमी मिळाली तेव्हा ते एका लग्नसमारंभात होते. तिथूनच त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना पाठवला. सरकारी गाडी सोडली आणि रेल्वेने सांगलीला आले.

याचे पडसाद राज्यभर उमटले. दादांच्या भवितव्याबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. अखेर  ३ नोव्हेंबर १९७६ या ६० व्या  वाढदिवसादिवशी दादांनी आपल्या विधानपरिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि घोषणा केली,

राजकीय संन्यास.

हा निर्णय कळताचं दादांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. दादांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी हजारो कार्यकर्ते सांगलीत दाखल झाले. दादांचा तो वाढदिस अभूतपुर्व असा साजरा करण्यात आला .

त्या दिवशी सांगली शहरात दादांची काढण्यात आलेली मिरवणूक ऐतिहासिक अशी होती.  दोन किलोमीटरचे अंतर गर्दीने व्यापले होते. हजारो लोक दादांना शुभेच्छा देण्यासाठी चौकाचौकांत उभे होते. या मिरवणुकीत ढोल-ताशे, ले झीम, झांज  अशी जवळपास ५० पथके दाखल झाली होती. शेकडो गाड्यांचा ताफा होता.

यावेळी भाषण करताना दादा म्हणाले,

“महाराष्ट्रात बेरजेचे राजकारण व्हावे, वजाबाकीचे नको. माणसे न सांभाळणाऱ्या माणसांशी माझे पटत नाही. माझा निवृत्तीचा निर्णय मी विचारपूर्वकचं घेतला आहे. यापुढे सत्तेबाहेर राहूनही समाजकार्य करता येते हे दाखवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.”

एकेकाळी राज्याच्या राजकारणावर वचक असणाऱ्या वसंतदादांनी कॉंग्रेससह राजकारणाचाचं रामराम ठोकला याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर पडणे साहजिक होते. जेष्ठ नेत्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण स्वाभिमानी असणाऱ्या दादांनी आपला निर्णय मागे घेणे शक्य नव्हते.

राजकारणापासून दूर होऊन ही दादांनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही. याच काळात दादांची संपूर्ण देशाच्या साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या ‘नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरीज्’ या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. साखर क्षेत्रातले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांच्या अनुभवाचा उपयोग झाला.

आणीबाणीच्या उत्तरार्धाचा हा काळ. जनमानसात हळूहळू इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात आक्रोश वाढत चालला होता. याच पार्श्वभूमीवर १८ जानेवारी १९७७ रोजी इंदिराजींनी  आणीबाणी मागे घेऊन लोकसभा निवडणुका घेणारं असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अखंड भारतभर रान उठवले. आणीबाणीत घडलेल्या कृष्णकृत्यांचा परिणाम निवडणुकीवर होणे सहाजिक होते. कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला.

पूर्ण देशपातळीवर कॉंग्रेस संघटना खिळखिळी झाली होती. जनता पक्षाचं वादळ महाराष्ट्रातही घोंगावत होतं. राज्यभरातील कॉंग्रेसजनांची मती गुंग झाली. या पराभवास मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हेच जबाबदार आहेत असे चित्र उभे राहिले. आयुष्यभर कॉंग्रेस उभारण्यात घालवलेले वसंतदादा शांत बसने शक्य नव्हते. त्यांनी गर्जना केली.

“काँग्रेसच्या घराला आग लागली असताना मी स्वस्थ बसू शकत नाही”

आपल्या अंगावरील राजकीय संन्यासाची वस्त्रे त्यांनी सांगलीहून मुंबईला येतानाच आयर्विन पुलावरून कृष्णेच्या पात्रात भिरकावून दिली होती. पुढच्या काही दिवसातच हा सांगलीचा वाघ आपल्या राजकीय हितशत्रूंना मागे सारून राज्याचा मुख्यमंत्री बनला होता. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.